26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून मनसेचा शिवसेनेला टोला

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून मनसेचा शिवसेनेला टोला

टीम लय भारी

मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज दादर येथे पार पडत आहे. दादर येथील महापौर निवास्थानी ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पण कार्यक्रमापूर्वीच यावरून राजकीय वाद निर्माण झाले आहे.

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसेने ही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून शिवसेनेला टोला लगावला आहे. संदीप देशपांडे म्हणतात की, स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतेय महत्वाचे नाही असे सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचे आमंत्रण न दिल्याचे समोर आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, पण आता या स्मारकाचे भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम रखडले होते, या स्मारकासाठी मुंबईच्या महापौराचे निवासस्थान ताब्यात घेण्यात आले होते, परंतु याठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका पार पडतात, स्मारक अद्याप झाले नाही, शिवसेनेची सत्ता येऊनही काम रखडले आहे, शिवसेनेला महापौर बंगला बळकवायचा होता अशी टीका सातत्याने मनसेकडून केली जात होती, त्यानंतर आता या स्मारकासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात आला असून आज स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन होत आहे.

या स्मारकाबद्दल सुभाष देसाईंनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूस तर दुसऱ्या बाजूस अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिद्ध वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी