27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररानकवी ना. धों. महानोर यांचे निधन

रानकवी ना. धों. महानोर यांचे निधन

सत्तरच्या दशकात आपल्या मातीचा सुवास घेऊन आलेल्या कविता लिहिणारे रानकवी नामदेव धोंडी महानोर उर्फ ना. धों. महानोर यांचं शुक्रवारी (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात
निधन झाले. ते 81 वर्षाचे होते. औरंगाबादच्या पळसखेड या त्यांच्या गावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, यावर अनेक प्रतिकिया येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील ट्वीट करत, ‘ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ‘अशा शब्दात ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली. ना. धों. महानोर आणि शरद पवार यांचे कौटुंबिक संबध होते. ‘अबोली’ या चित्रपटासाठी महानोर यांनी ‘तुझ्या वाटेला ओले डोळे, सुकून गेले पानमळे’ असे गीत लिहिले होते. महानोर आता नसल्याने या ओळी मनाच्या कोपऱ्यातून थेट माजघरात आल्यासारख्या वाटत आहेत. महानोरप्रेमी वाचकांना या ओळी आठवल्यावर काळजात कालवाकालव होत आहे.

सत्तरच्या दशकात साहित्य, कला, नाटक, अध्यात्म अशा विविध  क्षेत्रात विविध बदल घडत होते. राज्यात दलित पॅंथर ही दलितांवरील अन्याय अत्याचारविरोधात लढणारी चळवळ तेजीत होती. साम्यवादी, समाजवादी, दलित यांची युवक क्रांति दल, मागोवा आदी चळवळींनी वेग घेतला असतानाच, विशेषतः प्रस्थापित साहित्याला सुरुंग लावण्याचे काम याच दशकात लघु अनियतकालिकांनी केले. याच दशकात मराठीत दलित, ग्रामीण साहित्याचे प्रवाह संम्मीलित झाले. लघु अनियतकालिकांचे मुंबई, पुणे आदी जिल्ह्यात प्रयोग सुरू असतानाच, औरंगाबादच्या पळसखेड या खेड्यात शेती करता करता ना. धों. महानोर कविता लिहीत होते. ‘आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना, गाभुळ्या चिंचेला नवतीचा भर पोटी धरवेना’ अशा कविता असो, वा ‘नभ उतरु आलं.. अंग झिम्माड झालं..’, ‘मी रात टाकली..’ ‘गोऱ्या देहावरती कांती..’ असे एकाहून एक सरस आणि सर्वांगसुंदर गाणी त्यांनी मराठीला दिली. पळसखेडमधील या कवीच्या कवितांनी पु. ल. देशपांडे आणि सुनीता देशपांडे यांनाही मोहित केले. देशपांडे दाम्पत्य पळसखेडला मुक्कामी होते. तिथे त्यांनी महानोर यांच्या कवितांचा आस्वाद घेतला. पळसखेड येथे जन्माला आलेल्या महानोर यांनी त्यांचे पुढील शिक्षण जळगाव घेतले. मात्र त्यांना शहरांची ओढ कधीच नव्हती. मातीशी आणि शेतीशी नाळ जुळली असल्याने त्यांनी आयुष्यभर शेती करण्यातच धन्यता मानली. त्यांनी संपूर्ण आयुष्यात शेतीमध्ये अनेक प्रयोग केले सुमारे 40 वर्षांपूर्वी त्यांनी पळसखेडमध्ये अनेक बंधारे आणि तलाव बांधून शेती कसण्यास योग्य केली. शेतीतील अनेक प्रयोग त्यांनी शेतकऱ्यांसाठी केले. सव्वा लाख रुपयांमध्ये शेतकरी कसा उभा राहू शकतो याचे उदाहरण देत शेतीला नवसंजीवनी देण्याचा त्यांनी आपल्या परीने प्रयत्न केला.
1978 मध्ये ना. धो.महानोर यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला आणि साहित्य क्षेत्रातून विधान परिषदेवर निवड करण्यात आली. विधान परिषदेतील आपल्या कारकिर्दीमध्ये महानोर यांनी शेती शेतकरी आणि निसर्ग तसेच पाणलोट आणि पर्यावरण याबाबत सातत्याने आवाज उठवला. विधान परिषदेतील त्यांची कारकीर्दही त्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या भाषणांनी प्रभावी ठरली. ना. धो महानोर यांना जनस्थान पुरस्कार, विंदा करंदीकर पुरस्कार कृषी भूषण पुरस्कार, वनश्री पुरस्कारतसेच प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले होते.

भिडे गुरुजी आम्हाला गुरुजी वाटतात; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संभाजी भिडे प्यारे
प्रबोधनकार असते तर त्यांनी भिडेसारख्या वृत्तीला सोलपटून काढले असते; बाळासाहेब थोरातांनी एकनाथ शिंदे अजित पवार, भुजबळांनादेखील सुनावले
गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावरुन प्रवासी विमानांच्या फेऱ्या वाढणार

‘अखेर हा वृक्ष उन्मळून पडला…’; शरद
पवारांकडून ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली

शरद पवार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले, पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.’, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्वीट करत ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. हि आम्हा सर्वांसाठी व्यक्तिगत हानी आहे. महानोरांनी खऱ्या अर्थाने मराठी साहित्यात बालकवी आणि बहिणाबाई यांचा समृद्ध वारसा जीवंत ठेवला. कवितेतून माती, शेती आणि संस्कृतीची नवी ओळख करुन दिली. त्यांच्या ‘पानझड’ , ‘तिची कहाणी’ ‘रानातल्या कविता’ आदी अनेक रचना अजरामर आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त म्हणून देखील काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे साहित्याला मातीशी जोडून ठेवणारा साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला.या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण महानोर कुटुंबियांसोबत आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली…’ असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी