32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअरे बापरे : महिनाभरात हरवलेले १०० मोबाइल पोलिसांनी केले परत

अरे बापरे : महिनाभरात हरवलेले १०० मोबाइल पोलिसांनी केले परत

चोरीस गेलेले मोबाईल फोन पुन्हा परत मिळतात यावर कोणाचा विश्वास बसत नाही. मात्र, पंचवटी पोलिसांनी महिनाभरात नागरिकांचे हरवलेले १०० मोबाईल फोन परत मिळविले आहे. हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावर विश्वास बसत असल्याचे उद्गार आमदार राहुल ढिकले यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून नागरिकांना हस्तांतरित करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी काढले. या कार्यक्रमामध्ये १०९ नागरिकांना दागिने, चारचाकी वाहन, मोबाईलसह दुचाकी चोरीला गेलेला तब्बल २४ लाखांचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे उपस्थित होते.

चोरीस गेलेले मोबाईल फोन पुन्हा परत मिळतात यावर कोणाचा विश्वास बसत नाही. मात्र, पंचवटी पोलिसांनी महिनाभरात नागरिकांचे हरवलेले १०० मोबाईल फोन परत मिळविले आहे. हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावर विश्वास बसत असल्याचे उद्गार आमदार राहुल ढिकले यांनी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून नागरिकांना हस्तांतरित करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी काढले. या कार्यक्रमामध्ये १०९ नागरिकांना दागिने, चारचाकी वाहन, मोबाईलसह दुचाकी चोरीला गेलेला तब्बल २४ लाखांचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे उपस्थित होते.

पंचवटी पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीकांत साळवे, पोलीस नाईक मंगेश काकुळदे यांनी विशेष परिश्रम घेत सीईआयआर संकेतस्थळ तसेच पोलीस आयुक्तालयातील तांत्रिक विश्लेषण विभाग यांच्या मदतीने पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील चोरी गेलेल्या मोबाईल फोन पैकी १०० मोबाईलचा शोध लावण्यात यश मिळवले. तर तांत्रिक विश्लेषण विभागाच्या सहा. पोलीस निरीक्षक नेहा सुर्यवंशी आणि त्यांच्या टीमने देखील या कामात विशेष सहकार्य केले. यावेळी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते श्रीकांत साळवे आणि नेहा सुर्यवंशी व टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी सांगितले की, आजपर्यंत मोबाईल हरवला की तो परत मिळतो याची खात्री नागरिकांना नसते. परंतु पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड आणि कर्मचाऱ्यांनी शंभराहून अधिक हरवलेले व चोरीला गेलेले मोबाईल शोधून तक्रारदारांना बोलून परत दिले याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र आता नागरिकांनी देखील आपले वाहन व मोबाईल चोरीला जाणार नाही याची सजग नागरिक म्हणून काळजी घ्यावी असा कानमंत्र दिला.

तसेच, मालेगाव स्टॅंड पोलीस चौकी समोरील होळकर पुलाला लागून गोदाघाटावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्यांजवळ रविवार (दि.१०) रोजी अज्ञात इसमाचा काही अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केल्याची घटना घडली होती. याठिकाणी सुनील देशपांडे यांच्या दुकाना बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली होती. त्याचा आधार घेऊन अवघ्या काही तासात आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. याठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हा उघड करण्यास मदत झाली म्हणून सुनील देशपांडे यांचा आमदार ॲड राहुल ढिकले व पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच ज्यांना आपले दागिने, वाहन व मोबाईल मिळाले त्यांच्यातील काही नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत पहिल्यांदा जेव्हा पोलीस ठाण्यातून पोलीस कर्मचाऱ्यांनी फोन करून तुमची वस्तू सापडली असून ती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात यावे लागणार असल्याचे सांगितले त्यावर विश्वास बसत नव्हता असे सांगत पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस उपनिरीक्षक विलास पडोळकर, बापू गायकर, पोलीस उओनिरीक्षक पंकज सोनवणे आदींसह पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुद्देमाल घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केले तर सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन पोलीस उप निरीक्षक वर्षा पाटील यांनी मानले.

१ लाख २१ हजार रुपये किंमतीचे ४४.८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ६ लाख ५० हजार रुपयांची १ इनोव्हा कार, ८० हजार रुपये किंमतीची १ ऑटो रिक्षा, १ लाख २२ हजार रुपयांच्या ६ दुचाकी आणि १४ लाख २८ हजार ९०८ रुपयांचे १०० मोबाईल फोन असा एकूण २४ लाख १ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आला.
गेल्या महिन्यात देखील १५ तारखेला पंचवटी पोलिसांनी ३० मोबाईल, चार दुचाकी आणि सोन्याचे २९.७ ग्रॅमचे दागिने, चांदीचे अडीचशे ग्रॅम वजनाचे दागिने असा एकूण ७ लाख २७ हजार १०४ रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आला होता. त्यामुळे पंचवटी पोलिसांकडून नागरिकांना एकप्रकारे दिलासा देण्याचे काम केले जात असल्याबाबत नागरिकांनी या कार्यक्रमा दरम्यान आपल्या मनोगतातून बोलून दाखविले आहे.

पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल परत करण्यासाठी अनेक तक्रारदारांना फोन करून पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र, शनिवार दि. १६ रोजी अकरा वाजून गेल्यानंतर देखील अनेक तक्रारदार पोलीस ठाण्यात आले नसल्याने शेवटी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस वाहन घेऊन जात तक्रारदारांना पोलीस वाहनात बसवून पोलीस ठाण्यात घेऊन येत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे एकीकडे पोलीस डोळ्यात तेल घालून चोरीस गेलेला मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत करत आहे. तर दुसरीकडे गेलेला मुद्देमाल घेण्यास तक्रारदारांकडून वेळ काढू पणा दिसत असल्याने पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी