32 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरक्राईममहाराष्ट्र की महा'ड्रगनिर्मितीराष्ट्र'? नाशिकनंतर सोलापूरमध्येही ड्रग्जचा कारखाना

महाराष्ट्र की महा’ड्रगनिर्मितीराष्ट्र’? नाशिकनंतर सोलापूरमध्येही ड्रग्जचा कारखाना

महाराष्ट्रात ड्रग माफियांचे राज्य आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमधून ड्रग्जचे दोन कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले. त्यातील मुख्य आरोपी ललित पाटील पोलिसांना सापडत नसताना आता सोलापूरमध्ये एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई स्थानिक पोलिसांनी नाही तर मुंबई गुन्हे शाखेने केली आहे. तर नाशिकमधील शिंदे गावातील ललित पाटीलचा ड्रग्ज कारखाना मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. यातून एक बाब स्पष्ट होत आहे की महाराष्ट्रात खुलेआमपणे ड्रग्जची निर्मिती केली जाते आणि त्यावर स्थानिक पोलिसांचा अंकुश नाही. दोन आठवड्यांत नाशिकमधील दोन आणि सोलापूरमधील ड्रग्जच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीमधील बंद पडलेल्या एक कंपनीत ड्रग्ज निर्मितीचा काळा धंदा सुरू होता. याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यांनी गुप्तपणे इतर माहिती घेऊन अखेर कारवाई केली. १०० कोटींचा ड्रग्ज आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे याच चिंचोली एमआयडीसी परिसरात २०१६ मध्ये एव्हॉन लाईफ सायन्सेस कंपनीवर ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत इफेड्रीन ड्रग्जचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी २ हजार कोटींच्या इफेड्रीन पावडरचा साठा हस्तगत केला होता.

भूषण-बलकवडेला २० ऑक्टोबरपर्यंत कोठडी

नाशिकमधील ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि आणखी एक आरोपी अभिषेक बलकवडे यांना केल्या आठवड्यात उत्तर प्रदेशमधील बाराबांकी गावातून अटक केली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले. तेव्हा कोर्टाने २० ऑक्टोबरपर्यंत त्यांना कोठडी सुनावली. तर या प्रकरणी आज आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

नाशिकमधील ड्रग्जच्या दोन फॅक्टरी उद्ध्वस्त

७ ऑक्टोबरला मुंबईच्या साकीनाका पोलिसांना नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावातील श्री गणेशाय इंडस्ट्रीजच्या नावाने ड्रग्जची निर्मिती करणारी फॅक्टरी उद्ध्वस्त केली. पोलिसांनी तीन दिवस लक्ष ठेवल्यानंतर ही कारवाई केली. या कारवाईनंतर पोलिसांनी ३०० कोटींचे दीडशे किलो ड्रग्ज हस्तगत केले होते. नाशिकमध्ये ड्रग्जची फॅक्टरी असून नाशिक पोलिसांना याचा थांगपत्ताही नव्हता. ही फॅक्टरी ललित पाटील या ड्रग माफियाची असून तो सध्या फरार आहे. हाच ललित पाटील ९ महिन्यांपासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. साकीनाका पोलिसांनंतर नाशिक पोलिसांनीही दुसऱ्याच दिवशी याच ड्रग्ज फॅक्टरीजवळील दुसरी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केली.

हे ही वाचा

युद्ध का थांबत नाही?

गर्भपाताबद्दल काय आहे ‘सर्वोच्च’ निकाल?

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणचा उड्डाणपूल कोसळला, आसपासच्या परिसरात भितीचे वातावरण

एकाच गावात एमडी ड्रग्जचे दोन कारखाने खुलेआमपणे सुरू होते, हे उघड झाले आणि नाशिक ड्रग्ज निर्मितीचे हब असल्याचे धक्कादायक वास्तव जगासमोर आले. त्यानंतर आता सोलापूरमधील ड्रग्ज फॅक्टरीचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईनंतर नाशिक आणि आता सोलापूरमध्ये जर बिनबोभाटपणे ड्रग्जची निर्मिती होत असेल तर नशेच्या फॅक्टरी राज्यात इतर ठिकाणीही सुरू असतील. युवा पिढी बरबाद करणाऱ्या या ड्रग्जच्या फॅक्टरी उद्ध्वस्त करतानाच त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त होता, हेही उघड झाले पाहिजे. अन्यथा लवकरच राज्यातील तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी गेल्याचे चित्र पाहायची वेळ येऊ शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी