शहादा येथील राज्य परिवहन महामडंळातील वाहक राजेंद्र मराठे यांच्या हत्येची उकल करण्यात नंदुरबार पोलिसांना यश आले असून कौटुंबिक वादातून जावयानेच सासऱ्याच्या हत्येचा < Murder > कट रचल्याचे उघड झाले. सुमारे तीन लाख रुपयांची सुपारी हत्येसाठी देण्यात आली होती. या प्रकरणी जावयासह सहा मारेकऱ्यांना शहादा आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कांदिवली येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. यातील दोघे विधीसंघर्षग्रस्त बालक वगळता इतर चौघा संशयितांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. निवघेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.शहादा येथील राजेंद्र मराठे हे सदाशिवनगरमधील रहिवासी १४ मार्च रोजी दुचाकीने भाजी मार्केटमधील युनियन बँकेसमोर असलेल्या किराणा दुकानात खरेदीसाठी गेले होते.(Nandurbar: Son-in-law kills father-in-law over family dispute)
बराच वेळ होऊनही ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे पत्नी मीनाक्षी आणि मुलगा प्रद्युम्न मराठे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यामुळे शहादा पोलीस ठाण्यात मुलीच्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्यात आली होती. तपास सुरु असतांना १६ मार्चला तऱ्हावद ते नांदर्डे रस्त्यावरील फरशी पुलाखाली पोलिसांना एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हा मृतदेह त्याचा वडिलांचा असल्याचे प्रद्युम्नने ओळखले. राजेंद्र यांची हत्या करून अज्ञात व्यक्तीने त्यांचा मृतदेह जाळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. शहादा पोलिसांनी हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला पोलिसांंनी संशयितांच्या मोबाईल संदेशांवरुन मागोवा घेण्यास सुरुवात केली. संशयितांनी राजेंद्र मराठे यांची हत्या केल्यानंतर मध्य प्रदेशातील उज्जैन, त्यानंतर गुजरात राज्यातील सुरत व तेथून मुंबई येथील कांदिवली येथे गेल्याची माहिती निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनात एक पथक सुरत येथे पाठविले. नंदुरबार येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे एक पथक कांदिवली येथे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी पाठविले.
यादरम्यान, कांदिवली पोलिसांना संशयितांची माहिती देण्यात आली होती. संशयित एका मॉलमधील कर्तनालयात असताना त्यास ताब्यात घेतले. याच गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र मराठे यांचे जावई गोविंद सोनार यालाही ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही हत्या घडवून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये नीलेश उर्फ तुकाराम पाटील (२५, रा.सालदारनगर, शहादा), जयेश सुतार (३०, मुरली मनोहर कॉलनी, शहादा), लकी भिरारे (१८, भादा, ता.शहादा) यांच्यासह १६ आणि १७ वर्षांच्या दोन बालकांना ताब्यात घेण्यात आले. नंदुरबार येथून मयताचा जावई गोविंद सोनार (३४, ग़ुरुकुलनगर, नंदुरबार) यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राजेंद्र यांची सुपारी घेऊन हत्या केल्याची कबुली दिली. अटकेनंतर संशयितांना शहादा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व्ही.व्ही.निवघेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता चौघांना २२ मार्चपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक किरण खेडकर, शहाद्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहायक निरीक्षक दिनेश भदाणे, छगन चव्हाण, प्रवीण कोळी, हवालदार प्रदीप राजपूत, संदीप लांडगे,मुकेश पवार, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, दिनकर चव्हाण, भरत उगले, घनश्याम सूर्यवंशी, योगेश थोरात, मेरसिंग वळवी, योगेश माळी, किरण पावरा, कृष्णा जाधव, रामा वळवी, दीपक न्हावी, शोयब शेख, अभय राजपूत यांच्या पथकाने केली.