29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्राईमनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ९० लाखांची फसवणूक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ९० लाखांची फसवणूक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची (Agricultural Produce Market Committee ) फसवणूक करून ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा अपहार केल्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बाजार समितीच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हा जवळपास दोन वर्षानंतर दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश निवृत्ती घोलप, ५४, रा. प्लॉट नंबर २९५, गोकुळ नंद कॉलनी प्रशांत नगर पाथर्डी फाटा नाशिक(Nashik Agricultural Produce Market Committee duped of Rs 90 lakh )

यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी सुनील विश्वनाथ जाधव याने १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ या कालावधी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची एकूण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहार करून कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची फसवणूक करून आर्थिक नुकसान केले आणि विश्वासघात केल्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करीत आहे.

सुनील जाधव या कर्मचाऱ्याची नियुक्ती अनेक वर्षांपासून आडगाव येथील जकात नाक्यावर करण्यात आलेली होती. याठिकाणी अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून एक रुपया पाच पैसे याप्रमाणे बाजार फी वसूल करण्याचे काम केले जाते. त्यामुळे एका पावतीवर शंभर रुपयांपासून ते पंधरा वीस हजार रुपयांची वसुली केली जात होती. मात्र, जाधव यांच्याकडे देण्यात आलेल्या पावती पुस्तकांचा हिशोब कोणीच घेत नसल्याचे २०२२ दरम्यान प्रशासक काळात उघड झाले होते. आणि या प्रकरणाचा उलगडा सुरु करण्यात आला होता. मात्र, प्रशासक राजवट संपताच संचालक मंडळाने कारभार हाती घेत या कर्मचाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याला सेवेतून बडतर्फ करत आपली चमडी वाचविण्याचे काम केले होते.

सुनील जाधव या कर्मचाऱ्याने बाजार समिती कार्यालयाकडून १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ या कालावधीमध्ये पुस्तक क्रमांक ३०१, ३२३, ३४०, ३६५, ३६६, ३८९, ४३५, ४४२, ४५४, ४६९, ४९४, ५२८, ५२९ अशी एकूण १३ पुस्तके घेतली होती. त्यापैकी पुस्तक क्रमांक ४५४, ३४०, ४९४, ५२८ या पुस्तकांचा भरणा वेगवेगळ्या दिवशी कार्यालयात जमा केला असल्याचे आढळून आले होते. मात्र, उरलेल्या नऊ पुस्तकांचा भरणा कार्यालयात जमा केला नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे वसूल केलेल्या रक्कमेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे आणि शेतमाल वसुलीच्या अनधिकृत पावत्या व्यापाऱ्यांना दिल्याने बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाल्याचे चौकशी अहवालावरून सिद्ध झाल्याने सुनील जाधव याच्यावर प्रथम दर्शनी वसुलीच्या रकमेचा मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ३१ मे २०२२ रोजी निलंबनाची कारवाई करून खातेनिहाय चौकशीचे आदेश तत्कालीन प्रशासक फयाज मुलाणी यांनी दिले होते.

बडतर्फ कर्मचारी सुनील जाधव याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर जाधव याने न्यायालयासमोर आम्ही इंडस्ट्रियल कोर्टासमोर पुरावे देतो असा अर्ज दिला होता. त्यावर कोर्टाने अर्ज मंजूर केला होता. दरम्यान बाजार समितीने जाधव याला दोनदा नोटीस देऊन अपहाराची रक्कम भरण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र, त्याने नोटिसीला कुठलीही दाद न दिल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश घोलप, सचिव, नाकृउबा समिती या अपहार प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाल्यास बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळातील काही संचालक, तत्कालीन सचिव यांच्यासह काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, सुनील जाधव हा एक लहान मासा असून खोलवर चौकशी केल्यास मोठे मासे गळाला लागून अजून काही फसवणुकीचे प्रकार समोर येण्याची शक्यता असल्याची चर्चा बाजार समितीमध्ये सुरु आहे. तसेच, साधा एक कर्मचारी इतर अधिकारी आणि संचालक यात सहभागी असल्याशिवाय असा अपहार करूच शकत नाही. त्यामुळे जाधव याच्यावर कोणाकोणाचा वरदहस्त होता त्यांची देखील नावे समोर येणे गरजेचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी