घर भाडेकरूंचा (Tenant dispute) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मखमलाबाद रोडवरील एका रहिवासी इमारतीमध्ये घरमालकांनी अनेक भाडेकरूंना घर भाड्याने दिले आहे. याचा मोठा त्रास येथे राहणाऱ्या सुशिक्षित कुटुंबाना सहन करावा लागत आहे. नुकत्याच काही भाडेकरूंनी इमारतीच्या गच्चीवर पार्टी करून बियरच्या बाटल्या रस्त्यावर फेकल्याने येथील रहिवाशांच्या गाडीच्या काचा देखील फुटल्या आहे. याबाबत येथील रहिवाशांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.(Tenant dispute reaches police station )
याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद रोडवर चंद्रकांत गॅस एजन्सी समोर असलेल्या परिसरात गॅलेक्सी अपार्टमेंट असून या इमारतीमध्ये १५ फ्लॅट आहे. यातील जवळपास ७ फ्लॅट मालकांनी आपले फ्लॅट भाडे तत्वावर काही लोकांना दिले आहे. मात्र, यातील काही भाडेकरू रात्री उशिरा दारू पिऊन येतात आणि इमारतीच्या खाली जोरात वाहनातील टेप जोरात आवाज करून धांगडधिंगा करतात. अनेकदा हातात बियरच्या बाटल्या घेऊन याच ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मद्यपान करीत धिंगाणा करीत असल्याने स्थानिक रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बुधवार दि. २5 रोजी मध्यरात्री या इमारतीच्या गच्चीवर काही भाडेकरूंनी एक पार्टी केली. पार्टी सुरु असताना झिंगलेल्या काही युवकांनी बियरच्या बाटल्या थेट गच्चीवरून थेट खाली फेकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. तसेच, यातील काही महाभागांनी गुटखा खाऊन थुंकल्याने याठिकाणी टाकण्यात आलेला मंडप रंगून गेला होता. तर बियरच्या बाटल्या फेकल्याने या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरच्या चारचाकी वाहनाची काच फुटली आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या रहिवाशांनी पोलीस मदत हेल्पलाईन ११२ या नंबरवर फोन करून माहिती दिली. त्यानंतर याठिकाणी पोलीस पोहचले मात्र, पोलिसांची चाहूल लागताच सर्वांनी येथून काढता पाय घेतला. त्यामुळे येथील रहिवाशांनी पोलिसांनी येथील भाडेकरूंचे व्हेरिफिकेशन कारण्याची मागणी केली आहे.
या इमारतीमध्ये आणि आजूबाजूच्या इतर इमारतीमध्ये अनेक फ्लॅट धारकांनी आली घरे भाडे तत्वावर दिलेली आहे. मात्र, त्यांची कुठलीच माहिती त्यांच्याकडे नाही. तसेच, भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असताना देखील याची कुठलीही माहिती पोलिसांना दिलेली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आत्ता म्हसरूळ पोलीस या भाडेकरू आणि फ्लॅट मालकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून येथील अपरिचित राहणारे भाडेकरूंचा स्थानिक घर मालकांना त्रास सुरु आहे. हे लोक रात्री बेरात्री दारू पिऊन धिंगाणा करतात. त्यामुळे यांना बोलण्यास कोणीही धजावत नाही. आरडाओरड सुरु असल्याने रात्रीच्यावेळी झोपणे अवघड झाले आहे. हे सर्व गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याशी भांडण करणे आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांना शक्य नाही. यांचा वेळीच पोलिसांनी बंदोबस्त करावा आणि फ्लॅट मालकांना योग्य समज द्यावी. : डॉ. विलास घुगे, स्थानिक रहिवासी