30 C
Mumbai
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रCyclone Nisarga : शिवरायांच्या रायगडाला वादळ पचवणे काही नवीन नाही : उद्धव...

Cyclone Nisarga : शिवरायांच्या रायगडाला वादळ पचवणे काही नवीन नाही : उद्धव ठाकरे

टीम लय भारी

अलिबाग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींची मदत जाहीर केली (Uddhav Thackeray announces Rs 100 crore aid for Raigad district) असून पंचनामे झाल्यानंतर अंतिम मदत जाहीर करु असे सांगितले.

इतिहास पाहिला तर अनेक वादळे ज्यांनी पचवली त्या शिवरायांची ही राजधानी आहे. त्यामुळे वादळ पचवणे रायगडाला काही नवीन नाही, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले.

वादळाचा फटका बसलेल्या इतर जिल्ह्यांचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करु, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितले की, आपण पॅकेज जाहीर करणार नसून तातडीने रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारकडून १०० कोटी देत आहोत. एक अंदाज घ्यावा लागेल. उगाच वारेमाप घोषणा करण्यात अर्थ नाही. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानीकडे पाहत असताना पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर अंतिम मदत जाहीर करु, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

केंद्राकडे मदत मागण्यासंबंधी विचारले असता उद्धव ठाकरेंनी नुकसान झाल्यानंतर लगेच मागावे, असे होऊ नये. आपण व्यवस्थित आढावा घेऊन मदत मागू, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचे आश्वासन दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

अनेक ठिकाणी पडझड झाली असून स्वच्छता करावी लागेल. जनावरे मृत्यूमुखी पडलेली असतील तर रोगराई होण्याची शक्यता आहे. वीजेचा पुरवठा पूर्ववत झाला पाहिजे. घरे पडली आहेत, त्यांची सोय करण्यात येणार आहे. मदतीसाठी बाहेरुन टीम द्याव्या लागतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

आज जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीच रायगडमध्ये यावे लागले. निसर्गाचे रौद्ररुप आपण पाहिले पण रायगडने ते अनुभवले. ती दृष्य अत्यंत भीतीदायक होती. रायगडमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आलो आहे. जीवितहानी होऊ न देणे प्रशासनाचे काम असते. पण सहा जण मृत्यूमुखी पडले हे दुर्दैवं आहे. पैसे देता येतात पण घरातली गेलेली व्यक्ती परत येत नाही, अशी हळहळ उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी