28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयडॉ. अनिलकुमार गायकवाड, स्थापत्यकला क्षेत्रातील 'विक्रमादित्य'

डॉ. अनिलकुमार गायकवाड, स्थापत्यकला क्षेत्रातील ‘विक्रमादित्य’

राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड हे आज सोमवारी (३० ऑक्टोबर) ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांचे कार्य- कर्तृत्व हे सरकारी सेवेपुरते सीमित नाही. सामाजिक- शैक्षणिक क्षेत्रातील विधायक कार्यात त्यांचा सहभाग- योगदान मोठे राहिले आहे. मराठवाड्याच्या भूमीतील या सुपुत्राच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त त्यादिवशी लातूर येथे एक शानदार अभिष्टचिंतन सोहळा केंद्रीय पर्यटन आणि जलमार्ग मंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे. त्यानिमित्ताने अनिलकुमार गायकवाड यांच्या कर्तबगारीवर टाकलेला प्रकाशझोत.

शासन- प्रशासनात ‘सचिव’ पदी आयएएस म्हणजे सनदी अधिकारी असतात. सरकारच्या विविध खात्यांचा कारभार प्रधान सचिव,सचिव म्हणून तेच हाकत असतात. पण सार्वजनिक बांधकामसारखी खाती त्याला अपवाद असतात. तिथे प्रशासकीय कौशल्याबरोबरच ‘तांत्रिक’ म्हणजे टेक्निकल ज्ञानाची,कल्पकतेची, प्रतिभेची गरज असते. त्यामुळे अशा खात्यात ‘आयएएस’ सचिवांसोबतच अभियांत्रिकी सेवेतील ज्येष्ठतम आणि अनुभवी अधिकाऱ्यांनाही ‘सचिव’पदी आणले जाते. हे अधिकारीही नियमानुसार,निर्धारित वयोमानानंतर सेवानिवृत्त होत असतात. नियुक्त्या आणि निवृत्तीचे हे चक्र सरकारी सेवेत सदासर्वकाळ सुरूच असते. त्यात नवलाई काहीच नाही.

पण त्याला सार्वजनिक बांधकाम सचिव या पदावरून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले डॉ. अनिलकुमार गायकवाड हे मात्र अपवाद ठरले आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून ते आजही कार्यरत आहेत. किंबहुना गायकवाड हे अनेक प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीतील नेत्रदीपक कामगिरीमुळे ‘विक्रमादित्य’ ठरले आहेत. ‘सर्वोच्च गुणवत्ता धारक’ बनून सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून पदार्पण केलेला हा अधिकारी अद्वितीयच म्हणावा लागेल. चार दशकांहून अधिक काळाची कारकीर्द असलेल्या गायकवाड यांच्या ठायी प्रचंड ऊर्जा आणि अफाट कार्यक्षमता आहे. रस्ते, इमारती आणि राज्य रस्ते विकास महामंडळ या तीनही विभागाचे सचिवपद त्यांनी एकाचवेळी समर्थपणे पेलण्याचा इतिहास घडवला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात यापूर्वी असे घडल्याचे उदाहरण नाही.

हे ही वाचा 

बीएमसीमध्ये राजकीय ‘प्रदूषण’; ठाकरे-शेलार आमने-सामने

आरक्षणाचे गौडबंगाल; रामदास आठवले काय म्हणाले नक्की?

महाघोटाळ्यातील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार? आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

सध्या राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) येथे व्यवस्थापकीय सहसंचालक असलेले अनिलकुमार गायकवाड यांचा प्रशंसनीय कामगिरीबद्दल राज्य सरकारने ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार देऊन दोनदा राज्यपालांच्या हस्ते गौरव केलेला आहे. तर, स्थापत्यकला क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीबद्दल गायकवाड यांना राजस्थानच्या पिलानी येथील श्रीधर युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित केलेले आहे.

मुंबईतील अनेक उड्डाणपूले, मुंबई फोर्ट येथील सार्वजनिक बांधकाम भवन, नवी दिल्लीतील दिमाखदार असे महाराष्ट्र सदन, आगीनंतर मंत्रालयाचे करण्यात आलेले आकर्षक मेकओव्हर, मोखाडा येथील वैतरणा प्रकल्पात २७६ फूटावर बांधलेला आव्हानात्मक पूल असे अनेक प्रकल्प अनिलकुमार गायकवाड यांच्या कल्पकतेतून साकारले आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक रोड , बांद्रा-वर्सोवा सी लिंक रोड, कोस्टल रोड अशा महत्त्वाच्या प्रकल्पानी आकार घेतला आहे. विशेष म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग या प्रकल्पांची जबाबदारीसुद्धा रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासोबत अनिलकुमार गायकवाड यांच्या खांद्यावर होती. त्याचबरोबर लवकरच सुरू होणारा पुण्यातील हजारो कोटींचा रिंग रोड हा प्रकल्पही गायकवाड यांच्याच अभियांत्रिकी प्रतिभेचेच अपत्य आहे. या प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रिया आता पूर्णत्वास आली आहे. त्यामुळे रिंग रोडचा प्रकल्पही त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरू होऊन यशस्वीपणे पूर्णत्वास जाईल, यात शंका नाही.

डॉ. अनिलकुमार गायकवाड हे वयाची ‘साठी’ ओलांडत असले तरी त्यांचे उमदे, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि अफाट कार्यक्षमता ही तरुणांनाही चकित करणारी आहे. त्यांचे कार्य- कर्तृत्व हे सरकारी सेवेपुरते मर्यादित अजिबात नाही. सामाजिक- शैक्षणिक क्षेत्रातील विधायक कार्यात त्याचा कायम मोठा सहभाग- योगदान राहिले आहे. येत्या सोमवारी (३० ऑक्टोबर) लातूरच्या ग्रँड हॉटेल येथे मातोश्री विजयाताई नाईक सामाजिक फाउंडेशन आणि डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड या संस्थांनी त्यांचा आयोजित केलेला अभिष्टचिंतन सोहळा ही त्याची पोचपावतीच म्हणावी लागेल.

अनिलकुमार यांचे वडील बळीराम गायकवाड हे स्वतः शिक्षक होते. पण आपल्या गावात शाळा नसल्याने पायी चालत दूरच्या गावातील शाळेत जाऊन त्यांना शिकावे लागले. त्यामुळे अनिलकुमार यांच्यासाठी गरीब,गरजू, होतकरू विद्यार्थी हा कायम अपार सहानुभूतीचा, जिव्हाळ्याचा विषय बनला. अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यास ते सदैव तत्पर राहिले आहेत. भुकेल्या माणसाला अन्न, रुग्णाला औषधे- उपचार, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य अशी मदत करण्यात गायकवाड यांनी हात कधीही आखडता घेतला नाही. विशेष म्हणजे, त्यांचे हे मदत कार्य अखंड, पण प्रसिद्धिविन्मुखपणे सुरू असते. या दातृत्वाच्या कहाण्या त्यांनी मदतीचा हात दिलेल्या लोकांकडूनच आपल्या कानी पडत असतात.

गायकवाड यांची सामाजिक बांधिलकी आणि दानी वृत्तीला अनुसरूनच त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आयोजक संस्थानी त्यादिवशी लातूर जिल्ह्यात अनेक सेवाभावी उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मंडतनिधीचे वाटप, बचत गटांतील महिलांना आरोग्य विमा, सरकारी शाळा- कॉलेजातील मुलींना सॅनिटरी नॅपकिन बॉक्सचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गोशाळांना लंपी लसीचे वाटप यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

निगर्वी अधिकारी, दिलदार मित्र

अनिलकुमार गायकवाड यांच्या मित्र वर्तुळात पत्रकारांची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची कमी नाही. पण माझी आणि त्यांची मैत्री ही पु. ल. देशपांडे यांनी ‘मैत्री’ च्या केलेल्या व्याख्येसारखी म्हणता येईल.
ते म्हणतात: माझी मैत्रीची एक सोपी व्याख्या आहे…
‘रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काहीच नाही;
पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि
तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री.’
शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्त्वाचं.

तर, अनिलकुमार आणि माझ्यातील संवाद आणि भेटीगाठीत सातत्य तसे नाहीच. पण त्यांच्याशी राजधानी दिल्लीत तब्बल १७ वर्षांपूर्वी झालेली एक भेट माझ्यासाठी संस्मरणीय ठरली. त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी जपणारा निगर्वी अधिकारी आणि दिलदार मित्राचे दर्शन तेव्हा घडले.

त्या दिल्लीतील भेटीला निमित्त होते तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी १० मार्च २००६ रोजी राजधानीत भरवलेल्या ओबीसींच्या देशव्यापी परिषदेचे. मी त्यावेळी ठाण्यातील दैनिक ‘लोकनायक’चा कार्यकारी संपादक होतो. त्या ओबीसी परिषदेनिमित ‘लोकनायक’ने विशेषांक काढला होता. त्यामुळे मी त्या परिषदेसाठी आवर्जून गेलो होतो. आम्ही राजधानीत पोहोचल्यावर आमच्या त्या विशेषांकाचे प्रकाशन भुजबळ यांनी स्वतः केले होते. त्यावेळी अनिलकुमार गायकवाड, फुले- आंबेडकरी इतिहासाचे संशोधक प्रा हरी नरके, ‘ ट्रुथ सिकर्स इंटरनॅशनल’ (सत्यशोधक समाज) चे निमंत्रक सुनील सरदार, नवी दिल्लीतील ग्लोबल स्पेक्टरम्स युनिव्हर्सिटीचे थॉम ओल्फ, ‘बहुजन संग्राम’चे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर हे आमच्यासोबत होते. महाराष्ट्र सदनातील आमच्या वास्तव्याची, खानपानाची आणि परतीच्या प्रवासाची व्यवस्था अर्थातच गायकवाड यांनीच केली होती. त्यावेळी महाराष्ट्र सदनात बराच वेळ त्यांच्यासोबत घालवण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे त्यांच्याशी दिल्लीत झालेली भेटच माझ्यासाठी संस्मरणीय ठरली.

[email protected]

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत)

जनावरं पाळली, दुध व्यवसाय वाढवला, अन् बंगला बांधला |

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी