30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeसंपादकीयनरेंद्र मोदींनी जनतेला विचारावे, ‘अच्छे दिन आये क्या ?’

नरेंद्र मोदींनी जनतेला विचारावे, ‘अच्छे दिन आये क्या ?’

अॅड. विश्वास काश्यप

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी ही शिकवण देणारे आमचे जगतगुरु संत तुकाराम महाराज कुठे आणि मध्यरात्री झाडांची कत्तल करणारे नागपुरी संत कुठे ?

सध्या निवडणुकीचा महासंग्राम चालू आहे. आरे हा विषय मुंबई शहरातील निवडणुकीचा मोठा विषय होऊ शकतो. महाआघाडीचा सर्व पक्षीय मोर्चा आरेच्या दिशेने गेल्यास ह्या सरकारविरोधात मोठे वातावरण तयार होऊ शकते.

जर हाच विषय युतीच्या विशेषतः भाजपायीच्या हातात मिळाला असता तर त्यांनी सगळी मुंबई बंद करून टाकली असती. सरकारला सळो की पळो करून सोडले असते. ५०० झाडे कापल्यानंतर ५०,००० झाडे कापली असा अपप्रचार करायला हे मोकळे झाले असते. कारण या भाजपायीचे आकड्यांवर भरपूर प्रेम आहे .

आघाडी सरकारच्या काळात टू जी स्पेक्ट्रमचा घोटाळा ह्यांनी दोन लाख करोड इतका मोठा करून सांगितला होता. मुळात तो  घोटाळाच झाला नव्हता.

सिंचन घोटाळ्याचा आकडा हा महाराष्ट्राच्या संपूर्ण अर्थसंकल्पाच्या आकड्यापेक्षा  मोठा होता. ताजे उदाहरण शिखर बँकेचे. त्या बँकेचे संपूर्ण वर्षाचे ताळेबंद आणि ह्यांनी तयार केलेला २५,००० कोटींचा आकडा ह्याचा कोठेही मेळ बसत नाही. भाजपायी आकडेबहाद्दर हे रतन खत्री ला सुद्धा मागे टाकतील.

विकासाच्या  नावावर मुंबईचा सत्यानाश करण्याचा ह्यांचा धंदा चालला आहे. कोणत्याही सच्च्या माणसाला विशेषतः मराठी माणसाला अशा विकासाची गरजच नाही. त्याला मेट्रो / फेट्रो काहीही नको. त्याला फक्त लोकल सुविधा व्यवस्थित द्या. चांगल्या दर्जाचे रस्ते द्या. उत्कृष्ट सरकारी परिवहन सेवा द्या. उत्कृष्ठ दवाखाना द्या. आणखी काही नको. तो तुमच्यावर कायमच खुश राहील.

मुळात आता मराठी माणूस मुंबईत आहेच कुठे ? तो गेलाय वसई विरारच्या पण पुढे,  ह्या बाजूला कल्याणच्याही पुढे. हा मेट्रो / फेट्रो चा विकास फक्त आणि फक्त परप्रांतियांसाठीच केला जात आहे.

मोठ मोठे प्रकल्प राबवून  कोट्यावधींचा भ्रष्टाचार करण्याचा हायवे तयार केला जातोय. त्यातूनच मग १८०० कोटी किंवा भाजपायी आकडेबहादारांच्या आकड्यात १८, ००० कोटीच्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू होते. ती राज्यातील त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या दिशेने जाते. मीडियाला त्याची छोटीशी झुळूक सुद्धा लागत नाही. मीडियात कसे छान छान बोलले आणि दाखवले जाते.

मोदीसाहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. खरंतर प्रधानमंत्र्याच्या पदावरील व्यक्तीने त्यांच्या पक्षाचा प्रचार करायचा नसतो, असे संकेत आहेत. परंतु सध्याच्या वातावरणात इतक्या उच्च प्रतीच्या नैतिकतेची अपेक्षा ठेवणे म्हणजे तो राष्ट्रद्रोहच ठरावा.

मोदीसाहेब गेल्या निवडणुकीतील प्रत्येक जाहीर सभेत जनतेला एक प्रश्न विचारीत.. ‘अच्छे दिन …..’  ह्यावर जनता उत्स्फुर्तपणे उत्तर दयायची ‘आनेवाले है’.

मोदीसाहेबांच्या चरणी आम्हा मराठी जणांचे एकच मागणे आहे की, आता होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीच्या जाहीर सभेत मोदीसाहेबांनी जनतेला एकच प्रश्न विचारावयाचा आहे की,  ‘अच्छे दिन आये क्या ?’ ह्या प्रश्नावर जे काही उत्तर येईल त्यावरच निवडणुकीचा निकाल लागू द्या.

रात्रीतून झाडांची कत्तल करणाऱ्यांना मतपेटीतून उत्तर गेलेच पाहिजे . मुंबईतील ह्यांच्या उमेदवारांच्या मतांची कत्तल आपण दिवसाढवळ्या केलीच पाहिजे.

जय हिंद

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी