28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeआरोग्यLockdown21 : माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घरातील एक दिवस

Lockdown21 : माजी आयएएस अधिकाऱ्याच्या घरातील एक दिवस

Lockdown21 : बरंच काही शिकवतोय

सौ. अनुराधा प्रभाकर देशमुख

मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना’ विषाणूवर मात करण्यासाठी 21 दिवस ( Lockdown21 ) संपूर्ण देश लॉकडाउन करण्याचा मोठा निर्णय घेतला. स्वतःच्या,  समाजाच्या व देशाच्या रक्षणासाठी या गंभीर परिस्थितीत जबाबदारीने व सतर्क राहून घरीच राहण्याचा सल्ला दिला. तीन वेळा पंतप्रधानांनी हात जोडून विनंती केली. याचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

पंतप्रधान चक्क ‘घरात थांबा’,  ( Lockdown21 ) असे आर्जव करत होते. चीन,  इटली, जर्मनी इत्यादी देशांतील हॉस्पिटल्सची अद्ययावत सुविधा असलेल्या या देशांची दुरावस्था दूरचित्रवाणीवर पाहिली. मग आपली तर काय अवस्था होईल ?  सर्व जगाची नजर आता भारताकडे लागून राहिलेली आहे की, भारत ( over crowded असल्यामुळे) आता या संकटाला कसा तोंड देतोय ते. हे संकट किती भयानक असू शकते, याचा विचारच करवत नाही.

काल गुढीपाडवा. सकाळी उठल्यावर मनाला वारंवार बजावावे लागत होते की, आज गुढीपाडवा आहे.  गूढीपाडवा असूनही त्या झेंडूच्या फुलांच्या माळा नव्हत्या, की साखरेच्या गाठी नव्हत्या. तरी पण गुढी उभी करण्यासाठी तयारी सुरू केली, तेवढ्यात सोसायटीमधील मैत्रिणीचा फोन आला ,’ ‘social distance ठेवून  आपण खाली सोसायटी मध्ये फिरुया का ? ‘मी लगेच तयार झाले. मनात म्हटले ‘ आरोग्याची गुढी प्रथम उभारू.  नाहीतर दिवसभर काही व्यायाम होणार नाही. रेल्वेत बसल्यासारखे होणार आहे. आता फिरून परत एकाच जाग्यावर टिव्हीसमोर. असे 21 दिवस ( Lockdown21 ) काढायचे आहेत. चालायला गेले खरी, पण माझे मन चालताना साथ देत नव्हते. सारखे guilty वाटत होते.  मन म्हणत होते ‘आधी गुढी उभारून यायला हवे होते’. आपण अजूनही किती रूढी – परंपरामध्ये अडकलो आहोत. नाही का ?

आमच्या सोसायटीच्या खाली watchman रूम मध्ये एक खानदानी व्यक्ती temporary राहात आहेत. दारूचे खूपच व्यसन असल्यामुळे त्यांना मुलांनी बाहेर काढले आहे. फिरता फिरता watchman विचारत होते, आता त्या काकांचे काय करायचे ? एक मन म्हणत होते, त्यांना त्यांच्या घरी जा म्हणावं. दुसरे मन म्हणत होते, मुलांनी त्यांना नाही घरात घेतले तर अशा परिस्थितीत ( Lockdown21 ) ते कुठे जातील ? आणि एक जाणवले ,जेव्हा निर्वाणीची वेळ येते तेव्हा माणूस प्रथम आपला स्वार्थ बघतो. मला त्या पुरात अडकलेल्या झुडुपावर बसलेल्या माकडीणीची गोष्ट आठवली.

सोसायटीमध्ये एक रिकामा फ्लॅट आहे. चार – पाच जणांनी ठरविले, तिथे योगा करूया.  आमच्या सोसायटीमध्ये नवीन लग्न होऊन आलेल्या सुनबाई आहेत. त्या योगा घेणार होत्या. चालून आले आणि  त्यांच्याबरोबर योगा जॉईन केला.  सुनबाई खूप छान योगा शिकवत होत्या. पण प्रत्येकाच्या लक्षात येत होते, आता ही निर्वाणीची वेळ आली आहे , कुणाला ढेरी मुळे पुढे वाकता येत नव्हते. कुणाला बाजूला वळता येत नव्हते आणि बरंच काही. माझे मन मात्र परत परत गुढी जवळ जात होते.

घरी आले, आंघोळ केली व प्रथम सर्वांनी गुढी उभी केली. मग मन शांत झाले.

पुरणपोळीचा बेत केला होता.  खूप दिवसांनी मी, माझे पती प्रभाकर देशमुख व मुलगा राज आम्ही तिघांनी एकत्र जेवण केले. तेही चक्क निवांत गप्पा मारत. एरवी तिघांना एकत्र यायला वेळ मिळतच नाही. तो सुद्धा निवांत.

दुपारी म्हटले सर्वाना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देऊया. सर्वाना फोन झाल्यावर लहान बहिणीला फोन केला. तिने फोन उचलल्या उचलल्या म्हटले, ‘गो कोरोना, कोरोना गो ( हॅलो ऐवजी ), जरा हंसी – मजाक झाल्यावर बहीण म्हणाली, या लॉकडाऊनचा ( Lockdown21 ) एक चांगला फायदा झाला आहे. एरवी नोकरदारांमुळे मुलांना काही कामे सांगण्यासारखी नसतात. आता घरी कुणी मदत करण्यासाठी नसल्यामुळे तिने मुलीला सांगितले, तू घर झाडून घे.  ती पटकन तयार झाली. पण प्रत्यक्ष झाडताना तिला कळाले की साधे झाडून काढणे सुद्धा कला आहे. सुपलीत सर्व कचरा भरणे ही सोपी गोष्ट नाही.  तिची मुलगी तिला म्हणाली, मम्मा इथून पुढे मी कामवाली मावशींवर छोट्या गोष्टींसाठी कधीच चिडणार नाही. तिची मुलगी सहावीत शिकते. छोटी छोटी भांडी धुणे. टेबल आवरणे यासारखी कामे शिकवत असल्याचे बहिण मला सांगत होती. शेवटी मला म्हणाली, दीदी या गोष्टी मी मुलीला कधी व कशा शिकवल्या असत्या ग ?

आमच्या सोसायटीमध्ये आमचे बिल्डर बाळासाहेब कदम राहतात. ते ओशोंचे अनुयायी आहेत.  त्यांच्याशी बऱ्याच वेळा बोलताना ते ओशोंचे तत्वज्ञान सांगत असतात. त्यामुळे ओशोंबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता होती.  त्यांनी ‘ओशोंनी गौतम बुद्धांवर केलेले भाष्य ऐकविले. गौतम बुद्धांनी माणसाला सर्वात जास्त महत्व दिले आहे. सिद्धांत माणसासाठी असतात. परिस्थिती व काळानुसार ते बदलावे लागतात ( Lockdown21 ). हे  बुद्धांचे वेगळेपण पहिल्यांदाच ऐकले. नंतर मी व माझे पती प्रभाकर देशमुख यांनी त्यांच्याबरोबर ‘नादब्रह्म’  या ध्यानधारणेचा अनुभव घेतला. माझ्या एक डोक्यात होत की, ध्यानधारणा म्हणजे शांततेत बसणे. पण संगीत लावून ध्यानधारणा करण्याचा अनुभव आम्ही प्रथमच घेत होतो. एक तास स्वतःसाठी देणं हा अनुभव किती सुखद होता हे प्रथमच अनुभवले.

संध्याकाळी गॅलरीमध्ये भारतीय बैठकीत बसून ( Lockdown21 ) एकत्र जेवन केले. जेवणानंतर खूप दिवसांनी छान गप्पा झाल्या. मुलगा राज – चीन, जपान, अमेरिका इत्यादी देशांची आर्थिक परिस्थिती सांगत होता. जगात पुढे घडणाऱ्या बदलांची तो माहिती देत होता. आताची पिढी भविष्याबद्दल किती जागरूक आहे व किती जगाचे नॉलेज अपडेट ठेवत आहे, याचे कौतुक वाटले.

रिकामा वेळ मिळाला की TV चा रिमोट कसा हातात येतो ते समजतच नाही.  मी TV सुरू केला. समोर पवार साहेब चक्क सुप्रिया ताई व नातींसोबत बुद्धीबळ खेळत ( Lockdown21 ) असल्याचे पाहिले.

कोरोनाग्रस्तांचा आकडा 550 च्या पुढे गेलेला ऐकून मन खूप घाबरले. पण पुण्यातले दोन रूग्ण  बरे होऊन घरी गेलेले पाहून मनाला धीर आला. कोरोनामुळे आलेल्या वनवासातील एक दिवस कमी झाला.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो करा

हे सुद्धा वाचा

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

CoronaVirus : राजपुत्रालाही कोरोनाची लागण

Coronavirus Pandemic : उद्धव ठाकरे यांना अनावृत्त पत्र

भारत सरकारची ‘कोरोना’बद्दलची जनजागृती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी