31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeनोकरीनाशिक मनपात नोकर भरतीला पुढच्या वर्षीचाच मुहूर्त !

नाशिक मनपात नोकर भरतीला पुढच्या वर्षीचाच मुहूर्त !

नाशिक महापालिकेत चोवीस वर्षापासून नोकर भरती झालेली नसल्याने यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. दरम्यान बंपर भरती न करता, अग्निशमन व वैद्यकिय विभागातील 586 पदांची भरती तरी होइल. अशी शक्यता होती. कारण गेल्या वर्षभरापासून महापालिका प्रशासन भरतीची तयारी करत आहे. मात्र संथ गतीमुळे महापालिकेने हातातली संधी घालवल्याने भरतीचा मुहूर्त हुकल्याचे बोलले जात आहेत. भरतीकरिता राज्य शासनाकडे पालिकेने पाठवलेल्या प्रस्ताला मंजुरी न मिळाल्याने त्याचा फटका भरतीला बसला. दरम्यान लोकसभा निवडनुकीची नुकतीच आचारसंहिता लागू झाल्याने भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला थेट पुढच्या वर्षाचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

गेल्या दहा वर्षात शहराचा विस्तार होण्याबरोबरच लोकसंख्या वाढली आहे. परिणामी महापालिकेवर रस्ते, पाणी, स्वच्छता, पथदीप, आरोग्य या मुलभूत सुविधा देण्याकरिता ताण वाढला आहे. सध्याच प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. यामुळे दैनंदिन कामावर मर्यादा येत आहेत. भाजपाचे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी विशेष महासभा घेउन नोकर भरतीला मंजुरी दिली होती. परंतु त्यावेळी आस्थापना खर्च पस्तीस टक्याच्या पुढे असल्याने नोकर भरती रेंगाळ्ली. नंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महापालिकेत नोकर भरती होण्याच्या अपेक्षा वाढल्या. तसेच आस्थापना खर्चावरील मर्यादा हटवती. याकरिता डिसेंबर पर्यतची मुदत होती. असे असतानाही पालिका स्तरावर कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरु होते. महापालिकेत तीन हजार पदे भरावयची असून एकाचवेळी एवढे पदे शक्य नाही. त्यामुळे अत्यावश्यक असलेली अग्निशमन व वैद्यकिय विभागाला राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने प्राधान्य देत 586 पदंना मंजुरी दिली. यानंतर मात्र पालिका प्रशासन स्तरावरील संथ गतीचा फटका भरतीला बसला. जलद गतीने कामे झाली असती तर भरती प्रक्रिया पूर्ण करता आली असती. भरतीचा प्रस्ताव जाउनही शासनाकडे दोन-अडीच महिने तसाच पडून राहिल्याने शासनाच्या उदासिनतेचाही फटका पालिका नोकर भरतीला बसल्याचे बोलले जात आहे. महापालिकेचा ज्या टीसीएस कंपनीसोबत करार झाला. या कंपनीकडून ही भरती बाबत दिरंगाई नडली. या कंपनीकडे नाशिक महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांमधील भरतीचे काम असल्याने त्याचा फटका बसला.

सर्व निवडणुकांनतरच भरती ?

गेल्यावर्षीच नोकर भरतीचा बार उडेल. अशी शक्यता वर्तवली होती. परंतु पालिका स्तरावरील कमालीच्या संथ प्रक्रियेमुळे भरती होउ शकली नाही. दरम्यान जुन च्या पहिल्या आठवडयापर्यत आचारसंहिता असेल. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणुकीचे वारे फिरतील. विधानसभा होताच पुढील वर्षीच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीत महापालिका निवडणुका होइल. त्यामुळे या सर्व निवडणुका होत नाही, तोवर भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळ्णार नसल्याची दाट शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी