27 C
Mumbai
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रअण्णा हजारे शेवटचं आंदोलन करणार

अण्णा हजारे शेवटचं आंदोलन करणार

टीम लय भारी

राळेगणसिद्धी : केंद्राने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनीही या आंदोलनाला पाठिबा देत राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण केले होते. त्यानंतर दिल्लीतील शेतक-यांच्या मुलांनी अण्णांची भेट घेतली. त्यावेळी शेतक-यांच्या प्रश्नावर दिल्लीत रामलीला किंवा जंतरमंतर येथे जागा मिळाल्यास आपण शेवटचे आंदोलन करणार आहोत, असे अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी म्हटले आहे.

अण्णांच्या मूळगावी राळेगणसिद्धी येथे जाऊन आंदोलक शेतकरी पुत्रांनी अण्णांची भेट घेतली. त्यावेळी शेवटचे आंदोलन करणार असल्याचं अण्णांनी म्हटलं. तसेच, मोदी सरकारने लेखी दिलेलं आश्वासन पाळलं नाही, असेही अण्णांनी सांगितले.

दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच आज २५ वा दिवस आहे. आजून तोडगा निघाला नाही. भाजपने आंदोलन मोडीत काढण्यासाठी देशात शेतकरी मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर तीन कायद्यांचा शेतक-यांना कसा फायदा होणं आर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दुसरीकडे २७ डिसेंबर रोजी मन की बात कार्यक्रमाच्या दिवशीच थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

अण्णा हजारे म्हणाले, स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव द्यायला पाहिजे. ही मागणी मोदी सरकारने गेल्या वेळेस मान्य केली. २३ मार्च २०१८ ला लिखित आश्वासन दिले, पण त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. मी सतत पत्रव्यवहार करत राहिलो; पण आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यानंतर मी ७ दिवस उपोषण केले. कृषिमंत्र्यांनी तेव्हाही लिखित आश्वासन दिले की, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याविषयी समिती बनवण्यात येईल. ३० ऑक्टोबर २०१९ ला समितीचा अहवाल येईल. त्यानंतर कार्यवाही करू. पंतप्रधान आणि दोन कृषिमंत्र्यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतरही स्वामीनाथन्‌ आयोगानुसार शेतमालाला भाव आणि कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळाली नाही, असेही अण्णांनी यापूर्वीच म्हटले होते.

अहिंसेच्या मार्गानं शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारने पाच वेळेस बैठका घेऊनही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. मला लिखित आश्वासनं देऊनही मागण्या मान्य केल्या नाहीत. आता कृषिमंत्री आश्वासने पूर्ण करणार का? असा सवालही अण्णा हजारे यांनी यावेळी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी