26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus : कोरोनाची आजची आकडेवारी धक्कादायक!

Coronavirus : कोरोनाची आजची आकडेवारी धक्कादायक!

टीम लय भारी

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत लक्षणीय वाढ सलग तिस-या दिवशी कायम राहिली. शुक्रवारी सकाळी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 10 हजार जण नवे बाधित आढळले. एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख 35 हजार 540 वर गेली आहे. तर देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची आकडेवारी 6 हजार 637 वर पोहोचली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना गेल्या चार दिवसांत 900 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर 1000 जणांच्या मृत्यूची नोंद होण्यासाठी 48 दिवस लागले होते. तिथे ही संख्या गेल्या चार दिवसांत पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरुनच ही बाब समोर आली आहे. यावरुन भारतात कोरोनाचा फैलाव अद्यापही नियंत्रणात नसल्याचे समोर येत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 हजारांवर पोहोचण्यासाठी 87 दिवस लागले होते. 26 एप्रिलला भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 हजार होती. पण यामध्ये वेगाने वाढ होत असून फक्त सहा आठवड्यात रुग्णसंख्या 2 लाख 26 हजार 770 वर पोहोचली आहे.

देशांत सध्या एक लाख 10 हजार 960 सक्रिय बाधित असून एक लाख नऊ हजार 462 जण बरे होऊन घरी गेले आहेत. देशांत सर्वाधिक बाधित महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 80 हजार 229 वर पोहोचली आहे. तर मरण पावलेल्यांची संख्या दोन हजार 849 आहे. तामिळनाडूत 27 हजार 256 जणांना लागण झाली असून 220 जणांचे मृत्यू झाले आहेत.

राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येने 25 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर तेथे 650 जण मरण पावले आहेत. गुजरातमध्ये बाधितांची संख्या 18 हजार 584 असून बळींची संख्या एक हजार 155 आहे. राजस्थानात 9862 बाधत असून मृतांची संख्या 213 आहे. उत्तर प्रदेशात नऊ हजार 237 केसेस आढळल्या असून मृत 245 आहेत. मध्य प्रदेशात आठ हजार 762 बाधित असून 377 मरण पावले अहोत.

पश्‍चिम बंगालमध्ये हीच संख्या अनुक्रमे सहा हजार 876 आणि 355 अशी असून बिहारमध्ये साडेचार हजार बाधित संख्या झाली आहे. तेवढेच बाधित कर्नाटकात आहेत. तेथे मरण पावलेल्यांची संख्या अनुक्रमे 29 आणि 57 अशी आहे.

दरम्यान, भारतात 12 मार्च रोजी पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद झाली होती. 29 एप्रिल रोजी भारतात मृतांची संख्या एक हजारावर पोहोचली होती. पण काही आठड्यातच ही संख्या 6075 इतकी झाली आहे. 4 जूनपर्यंतची आकडेवारी पाहता फक्त गेल्या चार दिवसांत 900 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाउनचे नियम शिथील करत असताना समोर येणारी ही आकडेवारी चिंताजनक असून भीती वाढवणारी आहे.

केंद्र सरकारने तब्बल दोन महिन्यांनंतर लॉकडाउन शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी काही नियम व अटी सरकारकडून घालण्यात आल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी