26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रAcid attack : बीडमध्ये माणुसकीला काळिमा, दिवाळीच्या दिवशीच अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर पेट्रोल...

Acid attack : बीडमध्ये माणुसकीला काळिमा, दिवाळीच्या दिवशीच अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळले

टीम लय भारी

बीड : दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणा-या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला (Acid attack) करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना येळंबघाट (ता. बीड) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तरुणीवर अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना, अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली तरुणी

बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत 22 वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव (ता. देगलूर जि. नांदेड) येथील मयत तरुणी ही गावातीलच आरोपी तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सोबत (लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये) राहत होती. दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजेच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा – केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यानंतर त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी फरार, रस्त्याच्या कडेला ती तब्बल १२ तास तडफडत होती

तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. पहाटे 3 वाजता घटना घडलेली असतानाही अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी रस्त्या लगत तब्बल 12 तास पडून होती. दुपारी 2 वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर (ता. बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

उपचार सुरू असताना मृत्यू झाला

दरम्यान, उपचार सुरू असताना रविवार दि. 15 नोव्हेंबर रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला. सदर घटनेने खळबळ उडाली असून अत्यंत निर्दयीपणे तरुणीला जाळून लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे.

नराधम आरोपी २४ तासात गजाआड

फरार आरोपीला नांदेड पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आरोपी अविनाश राजुरे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर आरोपी अविनाश राजुरे फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला होता.

तसेच पीडित तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात होता. राजकीय वर्तुळातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती. अखेर आरोपी नांदेड पोलिसांच्या हाती लागला असून त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

Acid attack : बीडमध्ये माणुसकीला काळिमा, दिवाळीच्या दिवशीच अ‍ॅसिड हल्ला केल्यानंतर पेट्रोल टाकून तरुणीला जिवंत जाळले

ही घटना मानवतेला काळीमा फासणारी – देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. एका तरुणीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, १२ तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

दिवाळीच्याच दिवशी असे काही व्हावे आणि बोलावे लागणे दुर्दैवी – पंकजा मुंडे

बीडमध्ये तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर जिवंत जाळण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेवर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

“महाराष्ट्राला या घटना नवीन नाहीत, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. फक्त यासंबंधी बैठका न घेता माहिती घेऊन एक स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट घटना हाताळण्यासाठी लावली पाहिजे,” असं पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. “खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा दिली जावी,” अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांनी दिवाळीच्या दिवशी असं काही बोलावं लागणे दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण स्वत: यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि बीडच्या पोलीस महासंचालकांशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

या नराधमाना लगेच ठेचले पाहिजे – बाळा नांदगावकर

आज बीड येथे युवतीवर अ‍ॅसिड हल्ला करून हत्या करण्यात आली. फेब्रुवारी मध्ये हिंगणघाट येथे सुद्धा अशीच घटना घडली होती. या नराधमाना लगेच ठेचले पाहिजे अन्यथा त्यांना कायद्याचा धाक कसा बसेल? त्या हिंगणघाट वाल्या अपराधीला अजून शिक्षा झाली नाही. त्यामुळेच वरचेवर अशा घटना घडत असतात, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

महिलांवरील वाढते अत्याचार ही महाराष्ट्रात चिंतेची बाब – रामदास आठवले

बीड जिल्ह्यात येलंब घाटात तरुणीवर अ‍ॅसिड आणि पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याची अमानुष घटना घडली. या प्रकरणी गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी. महिलांवरील वाढते अत्याचार ही महाराष्ट्रात चिंतेची बाब झाली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने त्वरित कठोर पाऊले उचलावीत. ती मुलगी यातनांनी विव्हळत 12 तास पडून होती. तिला मदत लवकर मिळाली नाही. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना असून या प्रकरणी गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी