नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, हि भरती प्रक्रिया संपूर्णपणे सदोष असल्याचा आरोप मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनी केला आहे. तसेच, भरती साठी आलेल्या उमेदवारांना साधे पिण्याचे पाणी देखील उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी बाजार समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी देत भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थेला बाजार समितीचे कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले होते.बाजार समितीमध्ये एकूण ५७ जागांसाठी भरती केली जाणार आहे. हि भरती प्रक्रिया सहकार प्रशिक्षण केंद्र, नाशिक या खासगी संस्थेमार्फत राबवली जात आहे. यासाठी शेकडो उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले होते.
त्यांची प्रत्यक्ष मुलाखत प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, शनिवार दि. ३ रोजी जवळपास १८८ उमेदवार प्रत्यक्ष मौखिक मुलाखतीसाठी हजर झाले होते. मात्र, हि भरती प्रक्रिया संपूर्णपणे सदोष असल्याचा आरोप या ठिकाणी आलेल्या उमेदवारांनी केला आहे. त्यांनी सांगितले कि, हि भरती प्रक्रिया टीसीएस किंवा आयबीपीएस या सारख्या संस्थांकडे द्यायला हवे होते. मात्र, खासगी संस्थेकडून राबविली जाणाऱ्या प्रक्रियेमध्ये अनेक दोष, त्रुटी असून या ठिकाणी उपस्थित संस्थेचे पदाधिकारी काहीही ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नसल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप याठिकाणी आलेल्या अनेक उमेदवारांनी केला आहे. यादी जाहीर झाल्यानंतर यादीतील त्रुटी संचालक मंडळाच्या लक्षात आणून दिल्यानंतर देखील त्यांनी याबाबत दुर्लक्ष केले असल्याचा आरोपही या उमेदवारांनी केला.
तसेच, भरती प्रक्रियेसाठी अनेक उमेदवारांनी अटी शर्तींचा भंग आणि कागदपत्र अपूर्ण असताना देखील त्यांचे अर्ज स्विकारण्यात आले आहे. राज्य शासनाचा आरक्षण विषयक असलेल्या अध्यादेश २०१८ प्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येत नाही, सामाजिक आरक्षणाचा भंग केला जात आहे, मौखिक परीक्षा ऑन लाईन ऐवजी ऑफ लाईन घेतली जात आहे, ऑनलाइनच्या नावाखाली सीसीटीव्ही बसविल्याचे उत्तर दिले जात आहे असे एक ना अनेक आरोप उमेदवारांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर केले आहे.
दोनशेच्या आसपास भरती प्रक्रियेसाठी उमेदवार आणि त्यांचे पालक बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर उपस्थित होते. मात्र, सकाळपासून संध्याकाळपर्यंत या उमेदवारांना बाजार समितीच्या वतीने साधे पिण्याचे पाणी देखील उपलब्ध करून देण्यात आलेले नव्हते. या उमेदवारांचे हाल बघून येथील भाजीपाला व्यापाऱ्यांनी त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले होते.
भरती प्रक्रिया बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात राबवली जात असल्याने याठिकाणी काम करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली होती. येथील अधिकारी किंवा कर्मचारी यांचा कुठलाही हस्तक्षेप भरती प्रक्रियेमध्ये होऊ नये यासाठी हि सुट्टी देण्यात आली होती. मात्र, असे असताना देखील बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप हे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना उमेदवारांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याचे आणि भरती प्रक्रिया बाजार समितीच्या कार्यालयात का घेतली जात आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत उत्तर देण्याचे टाळत येथून काढता पाय घेतला.