31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरात रंगपंचमी जल्लोषात साजरी !

नाशिक शहरात रंगपंचमी जल्लोषात साजरी !

शहरात विविध ठिकाणी रंगपंचमी < Rang Panchami > मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंचवटी व जुने नाशिक येथील रहाडीमध्ये धप्पा मारण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघायला मिळत होते तर अनेक मंडळांनी ठिकठिकाणी डीजे, रेन शॉवर ची व्यवस्था केली होती. त्या ठिकाणी तरुणाई थिरकल्याचे दिसत होते. तसेच रंगोत्सव खेळून झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास रात्री उशिरापर्यंत गोदाघाटावर अंघोळीसाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. शहरात दरवर्षी एकूण चार ते पाच रहाडी रंगपंचमीला खुल्या केल्या जातात. मात्र यावर्षी सहा रहाडी खुल्या केल्याचे समोर आले. यामध्ये शनी चौक, दिल्ली दरवाजा, जुनी तांबट गल्ली, तिवंधा चौक, मधली होळी आणि दंडे हनुमान येथील राहाडींचा समावेश असून याठिकाणी रंगपंचमीच्या दिवशी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.(Rang Panchami celebrated in Nashik city)

दुपारी दोनच्या सुमारास मानकऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यांनतर नैसर्गिक रंग या हौदामध्ये तयार करण्यात आले. त्यानंतर रहाडीमध्ये उद्या घेत रंगोत्सव साजरा करण्यात आला. ज्यांना राहाडीत जाता आले नाही त्यांनी रहाडीतून रंगाच्या बादल्या आपल्या अंगावर ओतून घेत रंगपंचमीत ओलेचिंब होण्याचा आनंद लुटला.
प्रत्येक रहाडीचे रंग ठरलेले होते त्यात दिल्ली दरवाजा येथील रहाडीत केसरी, तिवंदा पिवळा, जुनी तांबट गल्ली केसरी, शनी चौक गुलाबी, काझीपुरा केसरी असे रंग आहेत. काझीपुरा आणि दिल्ली दरवाजा येथील रहाडींमध्ये फुलांपासून तयार केलेला नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला तर . इतरांमध्ये बाजारातील रंग वापरण्यात आले होते.जुनी तांबट लेन येथील रहडीत रंग खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही दोन तासाची वेळ निश्चित करण्यात आली होती. . त्या वेळेत केवळ महिलानि रहाड रंगोत्सवाचा आनंद घेतला. तर अनेक रहाडींजवळ महिलांसाठी रंग खेळण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी शनी चौक येथील रहाडीचे मानकरी असलेले दीक्षित घराण्यातील अविनाश दीक्षित व कल्पेश दीक्षित यांच्या हस्ते रहाडीची विधिवत पूजा करण्यात आली. पूजा संपन्न झाल्यानंतर दीक्षित परिवाराने रहाडीत धप्पा मारल्यानंतर नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी देखील रहाडीत उडी घेत रंगपंचमी साजरी केली. तसेच महिलांनी देखील रंगपंचमीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रहाड महोत्सवातील आनंद द्विगुणीत केला. याशिवाय बच्चे कंपनीने देखील एकमेकांना रंग लावून तसेच रंगाच्या पाण्याने भरलेले फुगे एकमेकांवर फेकत रंगपंचमीचा आनंद लुटल्याचे पहावयास मिळाले. तर दुसरीकडे रंगपंचमी आनंदात व शांततेत पार पडावी यासाठी पंचवटी पोलिसांचा मोठा बंदोबस्त रस्त्यावर तैनात करण्यात आला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी