महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने नाशिक शहरातील बहुचर्चित साठ किलोमीटरचा सिंहस्थ परिक्रमा बाह्य रिंगरोडवर जवळपास फुली मारली असून त्याऐवजी मनपा हद्दी बाहेरुन बायपासला(interlink) पसंती दिली आहे. हा बायपास प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीन काॅरिडारला कनेक्ट केला जाईल. मुंबई आग्रा महामार्ग व नाशिक पुणे महामार्ग यांना बायपासवर इंटरचेंझ असेल. जेणेकरुन या महामार्गावरुन शहरातून येणारी अवजड वाहने शहराबाहेरुनच मार्गक्रमण करतील व वाहतूक कोंडितून सुटका होईल.आगामी सिंहस्थ कुंभमेळा व भविष्यात शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मनपाने दोन टप्प्यात एकूण ५६ किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड तयार करण्याचे नियोजन केले होते.(Surat-Chennai interlink bypass road to be constructed near Nashik)
परंतू त्यासाठी करावे लागणारे शेकडो हेक्टर भूसंपादन व त्याचा मोबदला अदा करणे मनपाच्या आर्थिक कुवतीच्या पलीकडे आहे. शिवाय त्यापुढे जात हा काॅक्रिटचा रस्ता तयार करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च येईल. शासनाच्या आर्थिक पाठबळा शिवाय हे शिवधनुष्य पेलणे अशक्यप्राय ठरले असते. त्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंहस्थ परिक्रमा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री दादा भुसे यांनी त्याबाबत मंत्रालयात आढावा बैठकही घेतली. सर्वेक्षणाचे काम देखील सुरु झाले. मात्र नाशिक शहराचा विकास व विस्तार पाहता या बाह्य रिंगरोडची आवश्यकता नसल्याचा सूर उमटला आहे. मध्यंतरी रस्ते विकास महांमडळाने मनपा अधिकार्यांसमवेत बैठक घेतली. त्यात रिंगरोडऐवजी पंधरा किलोमीटरच्या बायपासवर चर्चा करण्यात आली. शहरात अवजड वाहनांची गर्दी ही मुंबई आग्रा महामार्ग व नाशिक पुणे महामार्गामुळे होते. ही वाहतूक कोंडी फोडण्याचे काम हा बायपास करेल. हा बायपास पूर्णत: शहर हद्दिच्या बाहेरुन असेल व प्रस्तावित सुरत चेन्नई या काॅरिडाॅरला कनेक्ट करण्यात येईल. वरील दोन्ही महामार्गावर हा बायपास इंटरलिंक केला जाईल. जेणेकरुन मुख्य शहरात प्रवेश न करता वाहने शहराबाहेरुन मार्गक्रमण करतील व वाहतूक कोंडी होणार नाही. त्यादृष्टिने रस्ते विकास महामंडळाचे प्रयत्न सुरु अाहे. त्यामुळे एकप्रकारे मनपाचे स्वप्न असलेल्या बाह्य रिंगरोडच्या स्वप्नावर पाणी फिरले जाणार आहे.
रिंगरोडवर फुलीचे कारणे
नाशिक शहराला अजून बाह्य रिंगरोडची आवश्यकता नाही
सिंहस्थाचा अपवाद वगळता बाह्य रिंगरोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतुक होणार नाही
बाह्यरिंगरोडचा दहा हजार कोटीचा खर्च वसूल कसा करायचा हा मुद्दा
सिंहस्थाला अडिच वर्ष शिल्लक असून रिंगरोड तयार होणे अशक्यप्राय बाब
असा प्रस्तावित रिंगरोडचा मार्ग
खत प्रकल्पापासून पाथर्डी शिवारातून वालदेवी नदीला समांतर पिंपळगाव खांब शिवार, वालदेवी नदीपलीकडे विहीतगाव शिवार, विहीतगावपासून पुढे नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून चेहेडी शिवारातून पंचक गाव, माडसांगवी शिवारातून महापालिका हद्दीबाहेर औरंगाबाद रोडलगत आडगाव शिवार व ट्रक टर्मिनसपर्यंत साठ मीटरचा पहिला रिंग रोड आहे.तर आडगाव ट्रक टर्मिनस येथून ३६ मीटर रुंदीचा दुसरा रिंगरोड आहे. आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, नाशिक तालुक्यातील जलालपूर, बारदान फाटा, गंगापूर रोड, ओलांडून गंगापूर उजवा तट कालवा, सातपूर एमआयडीसी, पश्चिम भागालगत त्र्यंबक रोडपर्यंत व पुढे गरवारे पॉइंटपर्यंत दुसरा रिंगरोड आहे.
रस्ते विकास महामंडळाच्या झालेल्या बैठकीत त्यांनी बाह्यरिंगरोडबाबत स्वारस्य दाखवले नाही. त्याऐवजी मनपा हद्दीच्या बाहेरुन बायपासचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबई आग्रा व नाशिक पुणे महामार्गाला इंटरचेंझ असेल. हा बायपास सुरत चेन्नई काॅरिडाॅरला जोडला जाईल.
— हर्षल बाविकस्कर, उपसंचालक
नगररचना विभाग, मनपा