27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक दुर्घटनेवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

नाशिक दुर्घटनेवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

टीम लय भारी

मुंबई :-  नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती. यामुळे रुग्णालयात पुरवठा सुरु असणाऱ्या ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजन अभावी २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास १५० रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. तर, जवळपास ३० ते ३५ जण मृत्यूच्या दाढेत असल्याचा दावा केला जात आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ही दोषींना कडक शासन करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरेंचे ट्विट

“ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं,” असं राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नेमके काय झाले?

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णालयात १५० रुग्ण दाखल होते. यामधील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ जणांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. छगन भुजबळ यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उच्चस्तरीय चौकशी होणार

या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारकडून ३ सदस्यीय समितीची स्थापना केली असून यामध्ये एक आयएएस अधिकारी, एक इंजिनिअर आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. “ऑक्सिजन कसा लीक झाला याची चौकशी करणाऱ्या समितीमध्ये एक इंजिनिअर देखील मुख्यमंत्र्यांनी ठेवला आहे. याची चौकशी झाल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. पण ते शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी याची उच्चस्तरीय समितीच्या मार्फत चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत”, असे भुजबळ यांनी सांगितले.

पोलिसांचा फौजफाटा

दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस गर्दी कमी करत आहेत. याशिवाय संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत. तसेच नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी