27 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रCurfewInIndia : आरोग्यमंत्र्यांनी जनतेला लिहिले विनंतीपत्र

CurfewInIndia : आरोग्यमंत्र्यांनी जनतेला लिहिले विनंतीपत्र

CurfewInIndia : घरी बसण्यासाठी लोकांना केले आवाहन

प्रिय,
बंधू-भगिनींनो..

उद्या गुढीपाडवा! नूतन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना आपणावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी ‘मी घरी थांबणार आणि कोरोनाला हरवणार’ ( CurfewInIndia ) असा निश्चय करून विजयाची गुढी उभारूया !

कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनानेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पावले तातडीने उचलली. या विषाणूला रोखण्यासाठीचा लढा सुरू झाला आहे. त्यात आपण आपले स्वयंशिस्तीने रक्षण करून ‘मीच माझा रक्षक’ म्हणत स्वत:सोबत राज्याचं आणि देशाचंही रक्षण करोनापासून करायचं आहे. काही दिवसांपासून सोशल डिस्टंसिंग ( CurfewInIndia ) हा नवा शब्द आपल्या कानावर पडत आहे. जगभर त्याचे पालन केले जात असताना आपणही आता मागे राहता कामा नये.

गर्दी रोखण्यासाठी राज्य शासनाला काही कठोर पावले उचलावी लागली आहेत. पण हे सारं राज्यातील सामान्य जनतेच्या हितासाठी केलं जात आहे. या कठीण काळात शासनाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. सामान्यांनी हा विषय सहजपणे घेऊ नये, घरी थांबा ( CurfewInIndia ) असे आवाहन करतो.

राज्यभरातील सर्व धर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ म्हणून भूमिका बजावताना जनजगृतीचे काम करण्याचे आवाहन मी या निमित्ताने करतो. कोरोनाचे काही रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर आहेत, ही दिलासा देणारी बाब आहे. राज्यात सध्या संचारबंदी आहे म्हणून वैद्यकीय सेवांवर प्रतिबंध नसून डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवू नये.

कोरोनारुपी शत्रू आपल्या दाराबाहेर आहे. तो आपण बाहेर पडायची वाट पहात आहे. त्याचा हा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही.
आपल्या राज्यावर यापूर्वी अनेक नैसर्गिक आणि मानव निर्मित संकटे आली. आपला बाणा लढवय्या असल्याने ही संकटं आपण परतवूनही लावली, तसंच करोनाचं हे संकट आपल्या एकजुटीतून आता आपल्या राज्यातूनच नव्हे तर देशातून हद्दपार करायचं आहे. त्यासाठी तुमची भक्कम साथ लागणार आहे.

राज्य शासनाच्या सूचनांचं पालन करा. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर घरीच थांबा ( CurfewInIndia ). एरवी जगण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू असते आता जगण्यासाठी काही दिवस घरी बसा अशी सगळ्यांना विनंती आहे.

आपल्या घरातील लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या. आपल्या गावातील, शहरातील ज्यांना कोणाला कोरोनाची लागण झाली त्यांना बहिष्कृत करू नका. त्यांना मानसिक आधार द्या. जे संशयित आहेत, ज्यांना घरीच क्वारंटाईन राहण्याचे आदेश आहेत त्यांनी समाजात न मिसळता स्वत:सोबत इतरांचीही काळजी घेतली पाहिजे. मुंबई, पुण्याहून जे गावाकडे येताय त्यांच्याकडे संशयानं पाहू नका.

प्रतिबंध हेच कोरोनावर प्रभावी औषध असल्याने आपण सर्वांनी मिळून त्याला हद्दपार करण्यासाठी स्वरक्षकाची भूमिका पार पाडूया. म्हणून *‘मीच माझा रक्षक’ म्हणत आपण समाजाचे रक्षण करूया. सर्वांनी संयमाने, स्वत्यागाने, सहकार्याने, सहभागाने संक्रमणाला दूर ठेवण्याचा संकल्प करूया.
जय हिंद..जय महाराष्ट्र

आपला,

(राजेश टोपे )

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी