32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील 'या' पक्षाचे राज्यपालांना साकडे, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

महाराष्ट्रातील ‘या’ पक्षाचे राज्यपालांना साकडे, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

टीम लय भारी

मुंबई :– उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेटर बॉम्ब टाकून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अटकेत असलेले निलंबित एपीआय सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा उल्लेख परमबीर सिंगांच्या पत्रात आहे. बार, रेस्टॉरंट यांच्याकडून ही वसुली करण्याचे सांगितले होते, असा दावा सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे. थेट गृहमंत्र्यांवर इतका मोठा आरोप केल्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.

भाजपने आक्रमक पवित्रा घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर दिल्ली भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत, सरकार बरखास्तीची मागणी केली आहे.

भाजपची मागणी

 महाराष्ट्र सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून, सचिन वाझे यांचा त्यामध्ये हात असल्याचा आरोप करत नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरुन राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार राज्यपालांना भेटणार

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही आपण राज्यपालांना भेटणार असल्याचे सांगितले. “आमची मागणी आहे राज्यपाल महोदयांनी राज्य सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे आहे. परवा आम्ही राज्यपाल यांना भेटणार आहोत. राज्यपालांनी राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत”, असे मुनगंटीवार म्हणाले.

नवनीत राणा यांचे ही पत्र

भाजप नेते नारायण राणे यांच्या पाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी या पत्रातून केली आहे. खासदार नवनीत राणा यांनी ८ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा उल्लेख केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

नवनीत राणा या अपक्ष खासदार आहेत. मात्र त्यांचे पती रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आहे. नवनीत राणा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालिन खासदार आनंदराव अडसूळ यांना हरवून, लोकसभेत पोहोचल्या.

रामदास आठवले यांची मागणी

 राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारा तिसरा पक्ष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आरपीआय पक्ष. “महाराष्ट्रात कायदा सुवस्यवस्था बिघडली असल्याने, राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी मी आज अमित शाह यांच्याकडे करणार आहे. माझ्या मागणीचे पत्र मी देणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे”, असे रामदास आठवले म्हणाले.

प्रकाश आंबेडकर राज्यपालांच्या भेटीला

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज दुपारी १२:१५ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी ते करणार आहेत.

 राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

  • देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात.
  • संविधानाच्या कलम ३५६ नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी