31 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमंत्रालयसचिन वाझे यांनीच केली मनसुख हिरेन यांची हत्या! देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गंभीर...

सचिन वाझे यांनीच केली मनसुख हिरेन यांची हत्या! देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत गंभीर आरोप

टीम लय भारी

मुंबई : मनसुख हिरेन यांची हत्या (mansukh hiren death case) सचिन वाझे यांनीच केल्याचा धक्कादायक आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब भर सभागृहात वाचून दाखवला आणि सर्वजण हादरले. मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबावरुन पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलिसांनी अटक का केली नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय मनसुख हिरेन हे शेवटचे धनंजय गावडे यांना भेटले. आणखी धक्कादायक आणि विशेष गंभार बाब म्हणजे गावडे आणि वाझे या दोघांना खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाला असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या दोघांविरोधात इतके पुरावे असताना अटकेची कारवाई का होत नाही, असा थेट हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

खळबळजनक, संतापजनक, चीड आणणारा प्रकार…

https://fb.watch/47itVNuE3k/

फडणवीस यांनी वाचलेला मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब

 

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या त्यांच्या जबाबानुसार, आमच्या व्यवसायाच्या निमित्ताने ग्राहक असलेले सचिन वाझे हे माझ्या पतीच्या ओळखीचे होते. त्यांना माझ्या पतीने नोव्हेंबर २०२० मध्ये ही कार वापरण्यासाठी दिली होती. ही कार ५-२-२०२१ रोजी त्यांच्या चालकामार्फत माझ्या दुकानावर आणून दिली. म्हणजे चार महिने ही कार सचिन वाझेंकडे होती. २६ -०२-२०२१ रोजी सकाळी सचिन वाझेसोबत माझे पती गुन्हे शाखेत गेले. त्यानंतर परत १०.३० ला वाझेंसोबत आले. दिवसभर त्यांच्यासोबतच होते, असे माझ्या पतीने सांगितले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला सचिन वाझेंसोबत मुंबई गुन्हे शाखेत गेले. तिथून रात्री १०.३० ला आले. त्यानंतर २८ फेब्रुवारीला सचिन वाझेंसोबत गेले. त्यांचा जबाब नोंद करण्यात आला. नोंद केलेल्या जबाबाची कॉपी घरी आणून ठेवली. त्यावर सचिन वाझेंची सही आहे. याचा अर्थ मनसुख हिरेन यांची चौकशी वाझेंनीच केली. इतर कुणीही केलेली नाही.

२ मार्चला माझे पती संध्याकाळी दुकानातून घरी आल्यानंतर ते सचिन वाझेंसोबत मुंबईत गेले होते. वाझेंच्या सांगण्यावरुन अॅड गिरी यांच्याकडून वारंवार मीडियातून आणि पोलिसांकडून फोन येत असल्याचा त्रास होत तक्रार दिली. ही तक्रार अर्जाची प्रत देत आहे. माझ्या पतीकडे मी पोलिसांनी मारहाण केली का, काही त्रास दिला का? असे विचारले असता, त्यांनी नाही असे सांगितले. पण चौकशी जबाब नोंद झाल्यानंतरही वेगवेगळ्या पोलिसांकडून फोन येत होते. त्यामुळे तक्रार अर्ज दिला.

माझे पती ३ मार्चला सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात गेले. दुकान बंद करुन ते रात्री ९ वाजता घरी आले. त्यावेळी रात्री माझे पती मला सांगत होते, सचिन वाझेंनी तू या केसमध्ये अटक हो, असे सांगितले. दोन-तीन दिवसात मी तुला जामिनावर काढतो. मी त्यावेळी पतींना सांगितले की आपण कोणाकडे सल्लामसलत करुन निर्णय घेऊ. त्यावेळी ते थोडे टेन्शनमध्ये वाटत होते. ४ मार्च २०२१ रोजी माझे पती यांनी माझ्या मोबाईलवरुन विनोद हिरेन (माझे दीर) यांना फोन करुन कदाचित मला अटक होईल, माझ्यासाठी चांगला वकीलाकडून अटकपूर्व जामिनाची बोलणी करुन ठेव असे सांगितले. त्यानंतर ते दुकानात निघून गेले.

माझे दीर विनोद हिरेन यांनी ६ मार्चला पतीच्या निधनानंतर मला सांगितले की, मी वकिलाशी बोलणी करुन ठेवली होती. वकिलांनी मला सल्ला दिला होता की, आपण गुन्हेगार नसल्याने अटकपूर्ण जामिनासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. जरी अर्ज केला तरी तो कोर्ट स्वीकारणार नाही. ही बाब त्यादिवशी माझ्या पतींना सांगितली होती. वरील एकंदर परिस्थितीवरुन माझ्या पतीचा खून झाला असावा, अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझे यांनी केला असावा, असा माझा संशय आहे. म्हणून या घटनेबाबत सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती आहे.
……………..
२०१७ ला ४० लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी अँटीसीपेटरी बेल घेतली आहे. धनंजय विठ्ठल गावडे आणि सचिन हिंदूराव वझे. मनसुख हिरेन यांच्या फोनचे शेवटचं लोकेशन धनंजय विठ्ठल गावडे यांच्या ठिकाणी आहे. ४० किलोमीटर दूर बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय, गावडेच्या इथे शेवटचे लोकेशन आहे. त्यानंतर ४० किलोमीटर अंतरावर बॉडी सापडली आहे. हे अगदी स्पष्ट आहे. यापेक्षा अजून पुरावे काय हवे आहेत.

२०१ खाली वाझेंना अटक का झाली नाही. ३०२ सोडून द्या. वाझे व गावडे कोणत्या पक्षात आहे ते मी बोलणार नाही. हा राजकारणाचा विषय नाही. इतके थेट पुरावे असताना जर २०१ खाली अटक होत नसेल तर कोण बोलवते? कशाकरिता वाचवते? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मनसुख हिरेन यांची गावडेंच्या परिसरात हत्या करण्यात आली. त्यानंतर खाडीत बॉडी फेकण्यात आली. यात चूक या ठिकाणी झाली की, त्यांना वाटलं की हायटाईड आहे आणि हायटाईडदरम्यान ही बॉडी फेकण्यात आली असती, तर ती कधीच आली नसती. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि कायद्याच्या सुदैवाने लो टाईड होता. त्यामुळे बॉडी परत आली. तात्काळ सचिन वाझेंना अटक केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी