31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeसंपादकीयMARKAJ : मुस्लिमांचं काय करायचं ? ( संजय आवटे )

MARKAJ : मुस्लिमांचं काय करायचं ? ( संजय आवटे )

‘कोरोना’ने जगभरात आणि भारतातही थैमान घातले आहे. या आपत्तीमध्येही मुस्लिम समाजातील काहीजणांनी ‘मरकज’चे ( MARKAJ ) आयोजन केले. त्यामुळे मुस्लिम समुदायाबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर संजय आवटे यांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. ‘मुस्लिमां’बद्दल प्रेम असणाऱ्यांनी हा लेख जरूर वाचला पाहीजे.

कोरोनामुळं जग धास्तावलेलं आहे. अवघा देश संकटात आहे. एका ठिणगीचं रुपांतर अक्राळविक्राळ आगीत होईल, असं संवेदनशील वातावरण आहे. हीच ती वेळ आहे, शांतपणे विचार करत प्रत्येक गोष्टीकडे अथवा घटनेकडे पाहाण्याची. सगळे धर्मांध एकमेकांसोबत असतात आणि परस्परपूरक असतात. मोदी वाढतील, तरच ओवेसींना स्पेस मिळेल. आणि, वाइस ए व्हर्सा.

या सापळ्यात आपण अडकून चालणार नाही.

सध्या ‘मरकज’च्या ( MARKAJ ) निमित्ताने बरीच चर्चा सुरू आहे. ज्यांनी मूर्खपणा केला, त्या सूत्रधारांना शिक्षा व्हायलाच हवी. मूठभर धर्मवेडे मुस्लिम म्हणजे तमाम मुस्लिम नव्हेत, वगैरे सारे बोलणे ठीक आहे. पण, तरीही अवघ्या मुस्लिमांकडं संशयानं पाहिलं जाणं, सरसकटीकरण करणं धोकादायक आहे.

सध्याच्या भारतात ‘मुस्लिम’ म्हणून जगता येणे हेच मुळी एवढे सोपे राहिलेले नाही.

हिंदू धर्म तुलनेने उदार आणि मोकळा आहे, हे खरेच आहे. तो ‘पुस्तकी’ नसणे आणि या धर्माचे एकूणच प्रारुप लवचिक असणे त्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे. बायकांना सती प्रथेच्या नावाखाली जिवंत जाळणारा, अनेक माणसांना जनावरांचं जगणं जगायला भाग पाडणारा हाच तो धर्म. आज तो एका वेगळ्या टप्प्यावर आहे. कारण, धर्मसुधारणेची मोठी चळवळ उभी राहिली. धर्म जेवढा प्राचीन, तेवढा आव्हानांच्या आणि सुधारणेच्या प्रयत्नांचा इतिहासही मोठा. त्यामुळे आज हिंदू धर्मातील कचरा बराच साफ होत आला आहे. त्यात व्यक्तिशः माझे काही योगदान नाही. पण, त्याचा मी लाभार्थी आहे.

मुस्लिमांची कोंडी फार वेगळी आहे. एकतर, तिथे मध्यमवर्ग कमी संख्येने आहे. मागासलेपण सर्वार्थाने मोठ्या प्रमाणात आहे. महिलांची अवस्था भयावह आहे. अर्थातच, विचारी मुस्लिमांपुढील पेच महाकाय आहेत. परंपरेचे अधिष्ठान कोणालाच पूर्णपणे नाकारता येत नाही. परिवर्तनाची वाट पकडावी, तर परंपरा तुम्हाला बेदखल करते. परंपरेकडे जरा जावे, तर परिवर्तनवाद्यांची मजल तुम्हाला एमआयएमचा हस्तक म्हणेपर्यंत जाते. औरंगजेब हा खलनायक नव्हता, असे म्हणावे तर तुम्हाला देशद्रोही मानले जाते. तुम्ही ज्या ‘हिंदू प्रतिमा’ देशाच्या म्हणून ठसवल्या आहेत, त्याच्या विरोधात चकार शब्दही उच्चारता येत नाही. शिवाजी महाराजांची ‘ब्राह्मणी’ प्रतिमा पुसून ‘बहुजन’ प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न झाला. पण, त्यापेक्षा वेगळी मांडणी करण्याची स्पेस आमच्या एखाद्या इस्लामधर्मीय इतिहासकाराला मिळू शकते का?

मुळात, मुस्लिम आज इथे मुख्य प्रवाहात आहेत का? मुस्लिमांची लोकसंख्या आहे २० टक्के. पण, तुमच्या फेसबुक फ्रेंडलिस्ट वा फोन कॉन्टॅक्टमध्ये तेवढे मुस्लिम मित्र आहेत का? एखादा सुजय डहाके जातीवर प्रश्न उपस्थित करतो. आणि, सगळे पेटतात. पण, २० टक्क्यांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भारतातील टीव्ही चॅनलवरच्या मालिकांमध्ये किती मुस्लिम कुटुंबं दिसतात? मुस्लिम संस्कृती दिसते? किती वर्तमानपत्रांचे संपादक वा टीव्ही चॅनल्सवर चमकणारे अँकर्स मुस्लिम आहेत? ‘ईद मुबारक’च्या पलिकडे,  मुस्लिमांतील पोटभेद, सण, रितीरिवाज याविषयी किती माहिती आहे तुम्हाला ? मुस्लिमांनी गपगुमान हिंदू सांस्कृतिक वातावरणाचा भाग होणे म्हणजे ते भारतीय आहेत, असे म्हणायचे आहे का आपल्याला?

‘मुस्लिम शासकांच्या दरबारातील बुद्धिवैभवाच्या नखाचीही सर हिंदू राजांच्या दरबारांना नव्हती’, हे निरीक्षण स्वामी विवेकानंदांचं आहे. पण मुस्लिमांबद्दलचं परसेप्शन असं कसं बदलत गेलं? ‘ताजमहाल’चा तोरा मिरवतानाही, आपल्या सामूहिक भावविश्वातून अकबर हद्दपार झाला आणि टिपूची थोरवीही मग वाटेनाशी झाली. मुस्लिमत्व गळून गेलेले कलाम वा सलमान हवे असतात आपल्याला. पण, ‘मुस्लिम’ नको असतात. त्यांनी स्वतःचे मुस्लिमत्व फेकून द्यावे असे म्हणतानाच, मुस्लिमांना मुख्य वस्तीत घर घेताना काय सहन करावे लागते, तेही बघू या ना!

एक कलाम थोर आहेत, म्हणून मुसलमान थोर नसतात. पण, दहशतवाद्यांच्या यादीत मुस्लिम नावं दिसली की मात्र सगळे मुसलमान एकजात वाईट असतात! आसाराम बापूच्या जागी एखादा मुल्ला असता वा मल्ल्या, नीरव मोदीच्या जागी कोणी मुस्लिम असता, तर प्रतिक्रिया काय उमटल्या असत्या? हिंदूंच्या कत्तली करणारा- दंगली घडवणारा नेता राष्ट्रीय राजकारणात असा मोठा होऊ शकला असता? पण, मुस्लिमांच्या कत्तली घडवूनही यांच्या लोकप्रियतेत काही फरक पडत नाही. उलट वाढच होते.

मोदींमुळे हा विखार जन्मलेला नाही.

सुप्तावस्थेत का असेना, पण हा विखार होताच,

म्हणून मोदी विजयी होतात.

गंगा-जमनी परंपरेची वीण उसवत जाते, तेव्हा असे घडत जाते.

सामान्य मुस्लिमांना इथे जे स्थान आहे, ते सगळ्यांच्या सोईने. फक्त वापर म्हणून. माणूस म्हणून त्यांना ओळख नाही. त्यांच्याविषयी आस्था वा ममत्व नाही. नातं नाही. अपवाद वगळता हे असंच तर आहे.

मुळात, इस्लामचे प्रारुप पुस्तकी आणि तुलनेने ‘रिजिड’ आहे. जगभरात त्याला असणारे संदर्भ वेगळे आहेत. ज्यू वा ख्रिश्चनांच्या धर्मवेडेपणालाही ग्लॅमर मिळते. या जागतिक पटलावर मुस्लिमांची झालेली कोंडी आणखी वेगळी आहे. तालिबानसारखी भुते ज्यांनी पोसली, तेच आज धर्मनिरपेक्षतेचे प्रवक्ते झालेले आहेत.

स्वतंत्र भारतात मुस्लिमांची कट्टरता अणि त्यांचे मागासलेपण जोपासण्याचे प्रयत्न हेतूतः झालेले दिसतात. त्याला फाळणीची आणि ब्रिटिशांच्या तोडफोड कारस्थानाची पार्श्वभूमी होती. हळूहळू कॉंग्रेसला ती हक्काची व्होटबॅंक वाटत गेली. म्हणून तर शाहबानो प्रकरणी कॉंग्रेसच्या, अत्याधुनिक प्रतिमेच्या, पंतप्रधानाने प्रतिगामी भूमिका घेतली. कॉंग्रेसने केलेली चूक दुहेरी होती. मुस्लिमांना व्होटबॅंक मानल्याने, मुस्लिमांचा कळप हाकणारे मूलतत्त्ववादी शक्तिमान होऊन सामान्य मुस्लिम मागासलेला राहिलाच. पण, मुख्य म्हणजे मुस्लिम अनुनयाचे पर्सेप्शन तयार करणे भाजपसाठी सोपे झाले. भाजपला मुस्लिमांचा कट्टर चेहरा हवा आहे. कारण, त्याशिवाय त्यांना ‘हिंदू- मुस्लिम’ खेळता येत नाही. दोन्ही राजकीय पर्याय असे असल्याने तिस-या मूलतत्त्ववादी, धर्मांध गटाला आणखी बळ मिळते.

हिंदूंनी आपला कचरा साफ केला. मुस्लिमांनी आता तो करावा, या थिअरीला अर्थ नाही. उद्या ही थिअरी खाली जातनिहायही जाऊ शकते. मुळात, हिंदूंमधील धार्मिक सुधारणांमध्ये तुमचा वा माझा वाटा नाही. मुस्लिमांना शत्रू मानणाऱ्या हिंदूंचा तर नाहीच. ती मोठी कारणपरंपरा आहे. अनेक आव्हाने, चळवळी यातून तावून सुलाखून आजचा हा टप्पा विकसित झाला आहे. शिवाय, सत्यधर्माची स्थापना करणारे महात्मा फुले आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरीविरोधी आंदोलनाला आणि अमेरिकन माणसाच्या सदसदविवेकाला अर्पण करतात. अशा प्रेरणाही पाहिल्या पाहिजेत. सावित्रींसोबत फातिमा शेख उभी राहिली, हेही लक्षात घेतले पाहिजे. हिंदू धर्म नाकारून बुद्धाच्या वाटेवर उभे असलेले बाबासाहेब हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी संपवण्यासाठी घटनात्मक प्रयत्न करत होते. मुद्दा असा की, हा कचरा कोणा एकाचा नाही. आणि, त्या त्या जातीने वा धर्माने तो संपवण्याचा मुद्दा नाही. कोण्या नव्या हमीद दलवाईंच्या जन्माची वाट बघण्याचा नाही.

(हमीद दलवाईंचे हाल झाले हे खरे, पण डॉ. नरेंद्र दाभोलकरांना तर संपवले गेले ! कोणत्याही धर्माची चिकित्सा एवढी सोपी नसते.)

तर, सांगत हे होतो की, हा आपला सामूहिक मुद्दा आहे. मुस्लिमांचा प्रश्न हा मुस्लिमांचा आहे. त्यांचे ते बघून घेतील, या कप्पाबंद मानसिकतेतून तर ही वेळ आली आहे. हा प्रश्न भारताचा आहे, या अंगाने याकडे पाहिले पाहिजे.

मूठभर मुस्लिमांचा कडवेपणा कमी करण्यासाठी हिंदूंनी पुन्हा कडवे होणे, हे यावरचे उत्तर आहे का? उलट परिवर्तनाच्या प्रयत्नांना सर्वांनीच बळ देणे आवश्यक आहे. चिकित्सेला बळ देणे गरजेचे आहे. हा मुद्दा आर्थिक आहे, या अंगाने त्याकडे पाहाणे आवश्यक आहे. इस्लामची मालकी सांगणाऱ्या धर्मांधांना नामोहरम करणे अपरिहार्य आहे. त्यांच्यापासून सर्वसामान्य मुस्लिम तोडणे आणि या धर्मांधांना एकाकी पाडणे आवश्यक आहे. याउलट थेट पाकिस्तानी धर्मांधांशी सामान्य मुस्लिम माणसांचे नाहक नाते जोडून आपण काय करत आहोत ? आपली माध्यमे कोणत्या परिभाषेत बोलत आहेत? त्याचा परिणाम काय होत असेल? यातून कोणता भारत आपण साकारणार आहोत?

एरव्ही, धार्मिक राष्ट्रवादाच्या वाटेने जाणारे कडवे मोदी ‘ट्रिपल तलाक’च्या निमित्ताने मात्र मुस्लिमांना कट्टर खलनायक करू पाहात असतात, तेव्हा मुस्लिमांमधील मूलतत्त्ववाद आणखी वाढत जाणे स्वाभाविक असते. मुख्य प्रवाहाचा राजकीय अभिनिवेश असा आहे की, मुस्लिमांनी उदार होण्यापेक्षा आणखी आक्रसून जावे. आधुनिक, परिवर्तनवादी मुस्लिमांनीही नाईलाजाने त्या कळपात स्वतःला कोंडावे.

सो, मार्ग एकच आहे.

भारताच्या अर्थकारणाचा- समाजकारणाचा- राजकारणाचा मुख्य प्रवाह ख-या अर्थाने धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक करणे हेच यावरचे उत्तर आहे.

हे सुद्धा वाचा

Covid19 : ‘टाळ्या वाजवणे, दिवे लावायला सांगणे हे पंतप्रधानांचे काम आहे का ?’

कोरोनाविषयक केंद्र सरकारने प्रसारित केलेली अधिकृत माहिती

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी