33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeमुंबईMumbai Congress : मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीची लवकरच घोषणा, दिल्लीत हालचालींना वेग

Mumbai Congress : मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीची लवकरच घोषणा, दिल्लीत हालचालींना वेग

टीम लय भारी

मुंबई : मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) अध्यक्ष (President) नियुक्तीला (Appointment) आता वेग आला आहे लवकरच नव्या अध्यक्षांची निवड जाहिर (Announce) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीसाठी गुरुवारी (दि.17) दुपारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यात सुमारे दीड तास महत्त्वाची बैठक झाली. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंह मनहास, कामगार नेते भाई जगताप आणि माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांची नावे आघाडीवर आहेत. या बैठकीत त्यांच्या नावावर सविस्तर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत सिंग मनहास, कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी या तिघांमध्ये चूरस आहे. आजच्या बैठकीचा अहवाल काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर ठेवण्यात येणार असून मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय सोनिया घेणार आहेत.

मुंबई काँग्रेस अध्यक्षांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौ-यावर मुंबईत आले होते. त्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीबद्दल मुंबई काँग्रेसच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा केली. एच. के. पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, विद्यमान मंत्री, यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. यावेळी त्यांनी अनेकांची मते जाणून घेतली होती. या सर्वांनी डॉ. मनहास यांच्या नावाला पसंती दिल्याचे सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, विद्यमान काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या ऐवजी अन्य कोण, यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. मुंबईतले काँग्रेस नेते दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून आल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांकडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येही हालचालींना वेग आला आहे. भविष्यात मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक न लढवता स्वतंत्र निवडणूक लढावी अशी काँग्रेसच्या काही नेत्यांची इच्छा आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजप आणि शिवसेना यांना सक्षम चेहरा काँग्रेसला देणे अतिशय गरजेचे आहे.

मागील दोन महापालिका निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांची संख्या ५० वरून ३० पर्यंत खाली आली आहे. काँग्रेसला लागलेली उतरती कळा भविष्यात थांबून महाविकास आघाडीमधील सत्तेचा योग्य उपयोग करत काँग्रेसचे कात टाकत वाढवणे हे मोठे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे. त्यामुळे दिल्ली हायकमांड मुंबई अध्यक्षपदाबाबत नेमकी काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

विद्यमान अध्यक्ष गायकवाड यांना मुंबई महापालिका निवडणुकीआधी बदलावे, अशी भूमिका काही नेत्यांची आहे. गायकवाड हे अध्यक्ष असले तरी ते तितके सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी अन्य व्यक्तीची निवड करावी, असा मतप्रवाह एका गटाचा आहे. तर दुस-या गटाने गायकवाड यांनी निवडणूक काळात मुस्लिम आणि दलित मतदारांसाठी संघटनात्मक काम केल्याचा दावा हायकमांड समोर मांडण्यात आल्याची माहिती आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या वडील एकनाथ गायकवाड यांच्यासाठी लॉबिंग करत आहेत. तर अस्लम शेख हे अमरजित मनहंस यासाठी प्रयत्न करत आहेत. अशोक चव्हाण हे भाई जगताप यांच्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. पुढील काही दिवसात मुंबई प्रदेश काँग्रेस पातळीवर संघटनात्मक बदल होणे अपेक्षित असून त्याआधी वर्षा गायकवाड, अस्लम शेख दिल्लीवारी करत लॉबिंग करत आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते चरणसिंग सप्रा तसेच माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांची देखील मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी नावे चर्चेत आहेत. सुरेश शेट्टी हे दक्षिण भारतातील असून दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा विचार प्रयत्न आहे. तसेच दिलेल्या कामांमध्ये सुद्धा आता दाक्षिणात्य नेत्यांचे वर्चस्व अधिक दिसत आहे. याचा नेमका फायदा सुरेश शेट्टी यांना मिळतो का, हे पाहणे गरजेचे आहे. दुसरीकडे चरणसिंग सप्रा देखील उत्तर भारतातील नेत्यांच्या माध्यमातून मुंबई काँग्रेस अध्यक्षपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.

याआधी मुंबई काँग्रेस अध्यक्षांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौ-यावर दि. 2 व दि. 3 डिसेंबर रोजी मुंबईत आले होते. मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीबद्धल मुंबई काँग्रेसच्या पदाधिका-यांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली होती. त्यापूर्वी गेल्या ऑक्टोबर तसेच दिवाळी नंतर दुस-या दिवशी दि. 17 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईचा दौरा केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी