26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeमुंबईDiwali : मुंबईत फटाके बंदी धाब्यावर, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईत आगीच्या १५...

Diwali : मुंबईत फटाके बंदी धाब्यावर, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईत आगीच्या १५ घटना

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण टाळण्यासाठी दिवाळीत (Diwali) मुंबईत फटाके फोडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण त्याचा काहीच फायदा झालेला नसून मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले. त्याचा परिणाम म्हणून मुंबईतील प्रदूषण वाढल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोना अनलॉकमध्ये रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नसल्याने अनेकजण वाहनांद्वारे गंतव्य स्थळी जात असल्याने मुंबईतल्या सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते. यामुळे लॉकडाऊन काळात कमी झालेले प्रदुषण पुन्हा वाढत चालले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने प्रदूषण वाढत आहे. आता दिवाळीत नागरिकांनी फटाके फोडल्याने त्यात अजून भर पडली आहे. शनिवार आणि रविवारी रात्री मुंबईसह उपनगरातील अनेक भागात हवेच्या गुणवत्तेवर प्रभाव पडला असून नागरिकांनी जोरदार आतिषबाजी केली. काही समाजकंटकांनी तर मध्यरात्रीही अचानक फटाके फोडून मुंबईकरांना दचकून जागे करण्याचा वेगळाच आनंद लुटला.

राज्य सरकारने दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातली होती. असे असले तरी बहुतांश नगरिकांनी राज्य सरकारची बंदी धाब्यावर बसवत जोरदार आतिषबाजी केली. यामुळे कोरोना रुग्णांच्या समस्या वाढू शकतात असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावले होते.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबईत आगीच्या १५ घटना

 

दिवाळीदरम्यान फटक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ नोंदविण्यात येत असतानाच लक्ष्मी पूजनच्या दिवशी मुंबईत आगीच्या १५ घटना घडल्याचे कॉल मुंबई अग्निशमन दलास आले, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आली. दरवर्षी अशा घटना घडण्याचे सरासरी हे प्रमाण १५० ते २०० आहे. मात्र यावेळी झालेल्या जनजागृतीसह मुंबई अग्निशमन दल वेगाने कार्यरत असल्याने अशा घटनांवर लवकर नियंत्रण मिळविले जात आहे. शिवाय सुदैवाने अशा घटनाही कमी घडत आहेत; ही चांगली बाब आहे, असे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.

दुसरीकडे यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करून साजरी करायची आहे. यावर्षी कोरोनामुळे ब-याच कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करून यावर्षीची दिवाळी आपण साजरी करूया, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून या काळात कोरोना आणि प्रदूषण वाढणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा सण. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शुभेच्छा पेडणेकर यांनी नागरिकांना दिल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी