33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईराज्यात लॉकडाउन, नाईट कर्फ्यूची आवश्यकता नाही आणि लस येईल तेव्हा येईल पण...

राज्यात लॉकडाउन, नाईट कर्फ्यूची आवश्यकता नाही आणि लस येईल तेव्हा येईल पण पुढचे सहा महिने मास्क वापरणे बंधनकारक : मुख्यमंत्री

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद (CM interacts with the public) साधला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात पुन्हा लॉकडाऊनची किंवा नाईट कर्फ्यूची गरज मला वाटत नाही. पण अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत हे विसरुन चालणार नाही, असे ते म्हणाले. तसेच कोरोनावरील लस येईल तेव्हा येईल, मात्र किमान पुढचे सहा महिने तरी मास्क वापरणे बंधनकारक असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात पूर्ण नाही, पण काही प्रमाणात नक्कीच कोरोना संसर्गाला अटकाव करण्यात यश आले आहे. तरीही सावध राहा हे माझे कुटुंब प्रमुख म्हणून सांगणे काम आहे. आता थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे थंडीचे आजार वाढ घेत आहेत. त्यामुळे आजारी पडून इलाज करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढचे सहा महिने मास्क वापरणे बंधनकारक

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले , “लॉकडाउनच्या काळानंतर आता गर्दी वाढू लागल्याने थंडीचे आजार काही प्रमाणात दिसू लागले आहेत. या सर्वांवर औषधं जरी असली तरी प्रतिबंधात्मक इलाज जो कोविडसाठी आहे तोच आहे. मास्क लावा, हात धुवा व सुरक्षित अंतर ठेवा. हे जर आपण कटाक्षाने पाळलं, तर कोविडचं काय इतर कोणतेही साथीचे आजार, आपण जर त्यांच्यापासून अंतर ठेवलं तर तेही आपल्यापासून अंतर ठेवतील. आपल्या देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल सांगितलं की, कोरोनावरील लस आली तरी मास्क तुम्हाला लावावा लागणार आहे. म्हणजेच लस आतापर्यंत आलेली नाही परंतु लस येईल तेव्हा येईल, आल्यानंतर आपल्या पर्यंत पोहचेल तेव्हा पोहचेल. परंतु ते घेतलं तरी मास्क लावणं हे बंधनकारक माझ्या मते किमान पुढील सहा महिने तरी आहेच.”

“लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं हा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे. लस किती काळापर्यंत आपल्याला सुरक्षा देईल हे येणाऱ्या काळातच निश्चित होईल. त्यामुळे मास्क लावणं तर सर्वात सोप आहे. म्हणून मास्क लावणं आणि हाताच्या स्वच्छतेवर लक्ष देणं हे आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. जर समजा लस आलीच नसती तरी आपल्याला हे करणं गरजेचंच होतं. त्यामुळे स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क लावायला कधीही विसरु नका.” असं मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल व्यक्त केलं होतं. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे.

लॉकडाउन, नाईट कर्फ्यूची आवश्यकता नाही, जनता सूज्ञ आहे

सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. असं असलं तरी कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळला नाही. “युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाउन लागू केलंय. पण कोरोनानं त्या ठिकाणी आपलं रूप बदलल्याची माहिती माझ्या समोर आली आहे. नवा विषाणू हा कोरोनापेक्षा अधिक झपाट्यानं पसरतोय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी अनेकदा गर्दी होत असते. परंतु त्या ठिकाणी आता पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून आपल्यालाही काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे. अनेकांनी मला सांगितलं की ज्या चाचण्या करताय त्या आता कमी करा. जे सुरूवातीच्या काळात झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चाचण्या करतोय. बाहेरून येणाऱ्या लोकांना जर संसर्ग झाला असेल तर त्यांच्यामुळे आपल्याला पुन्हा राज्यात संसर्ग वाढू द्यायचा नाहीये. पुन्हा लॉकडाउन नाईट कर्फ्यू करण्याची गरज नाही असं मला वाटतं. आपण अनुभवातून शिकलोय, आपली जनता सूज्ञ आहे” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“सुरूवातीला आपल्या भेटीच्या वेगाची वारंवारता जास्त होती. आता एकंदरीत परिस्थिती जगासमोर आहे. सर्वांना सरकारनं जे काही सांगितलं तरी ते अंमलात आणलंय. म्हणूनच कोरोनावर आपल्याला नियंत्रण मिळवलं. आता राज्यात सर्वकाही सुरू झालंय. मात्र कुटुंबप्रमुख म्हणून सावध राहा सांगणं हे माझं कर्तव्य आहे,” असंही ते म्हणाले. “गेल्या मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण दिसालया लागले होते. ते वाढ कशी झाली, रुग्णांची संख्या कमी कशी झाली हे आपण जगासमोर पारदर्शकपणे मांडलं. उन्हाळा आणि पावसाळ्यात कोविड व्यतिरिक्त साथींना आपण प्रतिबंध घालू शकलो. आपल्याकडे लॉकडाउन होता, मास्क लावत होतो, अंतर ठेवत होतो. आता रहदारी वाढल्यानं थंडीचे आजार दिसतायत. त्यावरही मास्क, सुरक्षित अंतर ठेवणं करावं लागणार आहे. कोरोनाची लस कधी येणार याची अजुन माहिती नाही. मास्क लावणं पुढील सहा महिनेतरी बंधकारक असणार आहे, असंच दिसत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये आता पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लॉकडाउन लागू केलंय. पण कोरोनानं त्या ठिकाणी आपलं रूप बदलल्याची माहिती माझ्या समोर आली आहे. नवा विषाणू झपाट्यानं पसरतोय. त्यांच्याकडून आपल्यालाही काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे. अनेक जण आता मास्क लावून फिरतायत. काळजी घेतायत. परंतु काही लोकं हे काळजी घेत नाहीयेत. परंतु त्यांच्यामुळे इतरांना धोका निर्माण झाला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी येताना जाताना मास्क हे शस्त्र आहे हे लक्ष ठेवा, नव्या वर्षाचं स्वागत करतना सावध राहा. आता लग्नसराई सुरू झाली आहे. त्यात कुटुंबीयांना आमंत्रण द्या पण कोरोनाला देऊ नका याची काळजी घ्या. सावधानता बाळगणं आवश्यक आहे,” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

होय! मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी

गेल्या काही महिन्यांपासन मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या कांजूरमार्ग येथील जागेवरून सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अशातच सध्या हे प्रकरण न्यायालयातही गेलं आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.

‘मी अहंकारी आहे माझ्या महाराष्ट्राच्या हितासाठी अहंकारी आहे. आरे कारशेड आपण मुंबई मेट्रो ३ची करणार होतो. त्या ठिकाणी ३० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी ५ हेक्टर जागेत घनदाट जंगल होतं. उर्वरित २५ हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर आपल्याया जंगल मारत मारत ही जागा वाढवावी लागली असती. म्हणूनच कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता,’ अशी माहिती मु्ख्यमंत्र्यांनी दिली आहे.

‘कांजूरमार्गला ४० हेक्टर जागा सरकारला मिळाली होती. ती जागा ओसाड आहे, कांजूरमार्गला मेट्रोच्या ३, ४ आणि ६ मार्गिकेच्या कारशेड करण्यात येणार होत्या. जिथे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होती तिकडे अन्य लाइनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ मेट्रोच्या एका लाइनसाठी आरेमध्ये कारशेड का?’, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

“आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. परंतु काजूरमध्ये केल्यास त्याचा वापर पुढच्या ४० वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे. आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

‘कांजूर मेट्रो कारशेडचा वाद चालला आहे तो जनतेच्या हिताचा नाहीये. माझं विरोधी पक्षाना आवाहन आहे तुम्ही या आणि हा प्रश्न सोडवा. आम्ही तुम्हाला श्रेय द्यायला तयार आहे. चर्चेदरम्यान कांजूर मेट्रो कारशेशेडचा हा प्रश्न सोडवू शकतो. हा माझ्या अहंकाराचा प्रश्न नाहीये तुमच्याही नसला पाहिजे,’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कोरोनाला ‘यायचं हं…!’ म्हणू नका

लग्नसराई, ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताचा काळ असल्यामुळे गर्दी वाढल्याने कोरोना वाढीची शक्यता असल्याच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ख्रिसमस, लग्नसराई आणि नववर्ष असल्याने मास्क काढून सेल्फी काढले जातील, गर्दी वाढेल. पण असे निष्काळजीपणे वागून चालणार नाही. लग्नात आप्तेष्टांना ‘यायचं हं…’ म्हणण्याची पद्धत आहे. पण या लग्नसराईत गर्दीकरुन कोरोनाला ‘यायचं हं…’ म्हणू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विकास कामांना वेग

कोविडचा काळ असूनही महाविकास आघाडी सरकारने आव्हानांना तोंड देत राज्यात विकास कामांना खंड पडू दिला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विकास कामांची माहिती जनतेला दिली. समृद्धी महामार्ग, सिंधुदुर्ग विमानतळ, मुंबईतील कोस्टल रोड आणि कोयना धरण प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

समृद्धी महामार्गाचे काम मी स्वत: पाहून आलो. त्यानंतर कोयना धरणावरील प्रकल्पाचीही पाहणी केली. सिंधुदुर्ग एअरपोर्टचे काम खरंतर एव्हाना पूर्ण होणे अपेक्षित होते. पण लॉकडाउनमुळे विदेशातून येणारी यंत्रसाम्रगी येऊ शकली नाही. त्यामुळे काम रखडले होते. ते काम आता पूर्ववत झाले आहे. विकास कामांना वेग देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

पैशाचं सोंग आणता येत नाही

लॉकडाउनमुळे राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचण आहे हे अगदी खरे आहे. इतर कशाचंही सोंग घेता येतं. पण पैशाचं सोंग आणता येत नाही. असं असतानाही आपण रडत बसलेलो नाही. राज्याच्या हिताचे प्रकल्प व्हायलाच हवेत यासाठी कितीही परिश्रम करण्याची सरकारची तयारी आहे, असे सांगताच उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून राज्याला येणारा निधी थकीत असल्यावरही पुन्हा एकदा बोट ठेवले.

कुटुंबप्रमुख म्हणून सावध रहा सांगत राहणं हे माझं कर्तव्य

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ”रहदारी सुरू झाली आहे. येणं जाणं सुरू झालं आहे. पण कुटुंबप्रमुख म्हणून सावध रहा सांगत राहणं हे माझं कर्तव्य आहे. मार्चपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण दिसायला लागले. त्याची वाढ कशी झाली. याची आठवण करून देण्याचं कारण आता हिवाळा आलेला आहे. पावसाळा व उन्हाळ्यात साथी पसरल्या नाहीत. पण, आता रहदारी वाढल्यानंतर थंडीतील आजार दिसू लागले आहेत. यावर एकच उपाय आहे. मास्क लावणं, हात धुत राहणं आणि डिस्टन्स पाळणं,” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. कोरोना परिस्थिती आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. या संवादावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांचा नामोल्लेख टाळत विरोधकांचा समाचार घेतला.

“आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला करायचा आहे. गेल्या २८ नोव्हेंबरला आपल्या आशीर्वादाने सरकारने… महाविकास आघाडीच्या सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. अनेक जण डोळे लावून बसले होते. आता पडेल… मग पडेल… उद्या पडेल… आता पडलंच… हे चालणारच नाही. असं करता करता आपल्या आशीर्वादाने आणि आपल्या विश्वासाने सरकारने वर्ष पूर्ण केलं. पण, वर्षपूर्तीबरोबरच जगात शंभर वर्षापूर्वी आलेल्या परिस्थितीसारख्याच स्थितीचा सामना करत आणि राजकीय हल्ले परतवत विकास कामं केली,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी