35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeटॉप न्यूजशेतक-यांचे देशव्यापी आंदोलन अधिक तीव्र होणार, लांब पल्ल्याच्या लढाईची तयारी - डॉ....

शेतक-यांचे देशव्यापी आंदोलन अधिक तीव्र होणार, लांब पल्ल्याच्या लढाईची तयारी – डॉ. अशोक ढवळे

टीम लय भारी

मुंबई / दिल्ली : शेतक-यांचे देशव्यापी आंदोलन (Nationwide agitation of farmers) अधिक तीव्र होणार, लांब पल्ल्याच्या लढाईची तयारी असल्याचे मत अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले आहे.

यावेळी डॉ. ढवळे म्हणाले की, गेली साधारण तीन दशके, म्हणजे नवउदारवादी धोरणे देशात राबवायला सुरुवात झाल्यापासून हे तिन्ही काळे शेतकरीविरोधी कायदे, देशीविदेशी नफेखोर कॉर्पोरेटस आणि त्यांचे भाट बनलेले भाजप – आरएसएसचे केंद्र सरकार यांविरुद्ध शेतीक्षेत्रातील सर्व घटक प्रथमच एकत्र आले आहेत. या प्रदीर्घ आंदोलनाने गरीब, मध्यम, एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर श्रीमंत शेतक-यांनाही एकत्र आणले आहे. केंद्र सरकारने लादलेल्या चार लेबर कोड कायद्यांचा जोरदार फटका बसलेला कामगारवर्गही या आंदोलनात शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे. एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्ग देखील आपल्या अन्नदात्यांच्या या लढाईत त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. महिला, युवा, विद्यार्थी, व्यापारी, वकील, शिक्षक अशा सर्व स्तरांतील लोक या आंदोलनात एकत्र आले आहेत. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो शेतकरी थेट दिल्लीत जाऊन सामील होणार आहेत. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली २१ डिसेंबर २०२० रोजी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्राचे हे हजारो शेतकरी दिल्लीच्या रणसंग्रामात सामील होण्यासाठी निघतील. शेकडो वाहनांमधून हजारो शेतकरी १२६६ किलोमीटरचा प्रवास करून २४ डिसेंबर २०२० रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील. इतर शेतक-यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जातील. यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले सुद्धा असतील.

Nationwide agitation of farmers

केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीजबिल विधेयक मागे घ्यावे व शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधार भावाचे संरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा अशी मागणी किसान सभा करत आहे. सांगायचे एक आणि त्याचवेळी करायचे नेमके उलट, या आरएसएस-भाजपच्या नेहमीच्या फॅसिस्ट नीतीचे हे एक उत्तम उदाहरण आहे. एकीकडे ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणत मोदी दुसरीकडे सरळ आपला देश देशी-विदेशी कॉर्पोरेटसना विकून टाकत आहेत. अगदी तसेच हे एकीकडे “लोकशाहीचा वारसा”, “भारताच्या आकांक्षांचे प्रतिक” आणि “जनता व घटना यांप्रती सतत असलेले उत्तरदायित्व” म्हणत नेमके दुसरीकडे लाखो शेतक-यांना दिल्लीच्या जीवघेण्या गारठ्यात कित्येक आठवडे ते तिष्ठत ठेवत आहेत. मात्र या आधुनिक नीरोला देशातील शेतकरी, कामगार आणि संपूर्ण जनता याच शांततापूर्ण, लोकशाही आणि संयुक्त प्रतिकाराच्या मार्गाने अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत. याची खात्री देणारे हे ऐतिहासिक आंदोलन आपल्या डोळ्यांसमोर आकार घेत आहे. शेतक-यांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला आणखी व्यापक करत तीव्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. महाराष्ट्रातील शेतक-यांनी या ऐतिहासिक चलो दिल्ली आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभा करत आहे.

या आंदोलनात किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावीत, राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य सहसचिव सुनील मालुसरे आणि सीटूचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे असणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी