28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्र'छपाक'ला शिवसेनेचा पाठिंबा : संजय राऊत

‘छपाक’ला शिवसेनेचा पाठिंबा : संजय राऊत

लयभारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेनेचा दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाला पाठिंबा आहे. छपाकवर बंदी घाला, असे आवाहन सोशल मीडियावरून करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

दीपिका पदुकोणचा चित्रपटात कोणताच राजकीय मुद्दा नाही. तो एका सत्य घटनेवर आधारीत आहे. राजकारणाचा आणि चित्रपटाचा थेट काहीच संबंध नाही, असेही राऊत म्हणाले.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात उसळलेल्या हिंसाचारानंतर दीपिका पदुकोण हिने जेएनयूला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतल्या. यानंतर केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी दीपिकावर टीका करत छपाक चित्रपट बायकॉट करावा, असे आवाहन ट्विटरवरून सुरू केले. तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांनी छपाक चित्रपटला पाठिंबा दर्शविला होता. परंतु सध्या तरी वाद सुरुच आहे.

दीपिकाच्या भूमिकेचे कौतुक – संजय राऊत

दीपिका पदुकोण आणि छपाक चित्रपटाच्या बाजूने शिवसेना मैदानात उतरली आहे. दीपिका पदुकोणने उचललेले पाऊल योग्य असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. जेएनयूमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी तेथे गेली. तिच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो. दीपिकाची राजकीय भूमिका काय आहे, हे मला माहिती नाही. तिने त्याबद्दल कधी भाष्य केलेले नाही. मात्र, जेएनयूमधील विद्यार्थ्यांप्रति असलेल्या भावना तिने शांतपणे व्यक्त केल्या. केवळ या कारणामुळे तिला देशद्रोही ठरवले जात असेल आणि तिच्या चित्रपटावर बंदी घालण्याचे आवाहन केले जात असेल, तर ते सर्वस्वी चुकीचे आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

अशी स्थिती यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नाही…

जेएनयूमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. अशी स्थिती यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नाही. केंद्र सरकारच्या काही धोरणांविरोधात भूमिका मांडली की, त्यांना देशद्रोही ठरवून मोकळे व्हायचे, हेच काही दिवसांपासून चालत आले आहे. देशद्रोही ठरवलेल्या काश्मीरमधील किती जणांना तुम्ही फासावर चढवले, अशी विचारणाही राऊत यांनी यावेळी केली. ज्या लोकांवर गुन्हे दाखल करता, त्याच लोकांना बरोबर घेऊन तुम्ही सरकार स्थापन करता, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीसोबत युती करून स्थापन केलेल्या सरकारवर निशाणा साधत जोरदार टीका केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी