30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रशिवथाळी सुरू कारण ती शिवसेना कार्यकर्त्यांची मग इतराचे काय? निलेश राणेंचा प्रश्न

शिवथाळी सुरू कारण ती शिवसेना कार्यकर्त्यांची मग इतराचे काय? निलेश राणेंचा प्रश्न

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर काही दिवासांपूर्वी कडक निर्बंध लागू केले होते. परंतु तरी सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक आहे म्हणून त्यासाठी राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली आहे. या काळात संचारबंदी आदेशासह कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री हातावर पोट असणाऱ्यांसाठी एक आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. हे पॅकेज म्हणजे गरीबांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. आता माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ठाकरे सरकारवर हल्लाबोल

१५ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन केंद्र सुरु राहणार आहेत. शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यावरुन निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांचे रेस्टॉरंट बंद राहणार. घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, कोरोना होणार नाही. रिक्षा टॅक्सी फिरू द्या पण तुम्ही फिरू नका. मुंबईच्या बिल्डरांना मदत करताना हजार कोटी पण गरिबांना मदत करताना पाचशे-हजार”, असे ट्वीट करत निलेश राणे यांनी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर टीका केली आहे.

रेशनच्या घोषणेवरुनही ठाकरे सरकारवर प्रहार

त्याचबरोबर राज्यातील गरीब वर्गाला महिनाभरासाठी प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदुळ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. काल ही घोषणा केल्यानंतर आज अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे भुजबळांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. त्यावरुन ही निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलेय.

‘ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन’

मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेनच्या अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्याचे जनतेला आवाहन केले. त्यावरूनच भाजप आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करून कोरोनाची साखळी तोडा नव्हे, तर तुमचा मेंदू तपासा, असे टीकास्त्र मुख्यमंत्र्यांवर सोडले आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगलं वाटत असेल, असा टोला ही नितेश राणेंनी लगावला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी