33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeराजकीयमोठी बातमी : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेनेची एनडीएसोबत...

मोठी बातमी : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेनेची एनडीएसोबत काडीमोड

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राज्यात शिवसेनेचे भाजपसोबत पुरते बिनसले आहे. आता शिवसेनेने भाजपप्रणील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’सोबतचेही (एनडीए) संबंध संपुष्टात आणले आहेत. शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी ट्विटद्वारे राजीनाम्याची घोषणा केली आहे.

शिवसेनेने एनडीए सोबतचे सगळे संबंध तोडले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकतो, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेसने काल जाहीर केली होती. त्यानंतर सावंत यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. एनडीएमधून शिवसेना बाहेर पडल्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याचा मार्ग शिवसेनेसाठी खुला झाला असल्याचे बोलले जात आहे.

सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे ?, आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वाजता दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे.’ अशा शब्दांत सावंत यांनी भाजपवर दुगाण्या झाडल्या आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज खासदार संजय राऊत भेटणार आहेत. या भेटीअगोदरच सावंत यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करण्याचा मार्ग अधिक प्रशस्त होणार आहे. शिवसेनेने भाजपबरोबर काडीमोड घेतल्यामुळे सोनिया गांधी शिवसेनेला राज्यात पाठिंबा देण्यासाठी तयार होतील, असे बोलले जात आहे.

सोनिया गांधी व शरद पवार यांचा होकार मिळवून आज शिवसेनेचे नेते सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना भेटतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी