29 C
Mumbai
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नाना पटोले विरूध्द भाजपचे किसन कथोरेंमध्ये लढत 

विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नाना पटोले विरूध्द भाजपचे किसन कथोरेंमध्ये लढत 

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभाध्यक्षपदासाठी महाराष्ट्र विकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले विरूध्द भाजपचे किसन कथोरे अशी लढत होणार आहे. या लढतीमुळे चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी रविवारी मतदान होणार आहे.

काँग्रेसचे साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. तर भाजपाकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या वाटपात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता. यात बदल करून उपमुख्यमंत्रीपद मिळावे, असा आग्रह काँग्रेसकडून शुक्रवारी धरण्यात आला. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावली. तरीही काँग्रेसचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरूच होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तरीही सत्तावाटपाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. आघाडीच्या बुधवारी रात्री झालेल्या चर्चेत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला, असा निर्णय झाला होता. या बदल्यात राष्ट्रवादीला एक अतिरिक्त मंत्रिपद मिळणार होते.

शपथविधीच्या दिवशी मात्र काँग्रेसने या निर्णयात बदल करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने सादर केला. मात्र, राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळून लावली होती. शुक्रवारी पुन्हा काँग्रेसने नव्याने प्रयत्न सुरू केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीने विधानसभा अध्यक्षपद घ्यावे. या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसला मिळावे, अशी मागणी करण्यात आली. काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदावर दावा केला असला, तरी आधी तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत झालेला निर्णय आता बदलणार कसा, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. काँग्रेसची बदल करण्याची मागणी मान्य करता येणार नाही, असेही अजितदादांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता महाराष्ट्र विकास आघाडीतील पदांचा घोळ संपला असल्याचे चित्र आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी