29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयबेफिकीर लोकप्रतिनिधी, अन् 'कोरोना'चा कहर !

बेफिकीर लोकप्रतिनिधी, अन् ‘कोरोना’चा कहर !

तुषार खरात

मुंबईतील ‘कोरोना’ ( Coronacirus ) नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिका प्रयत्न करीत आहे. अनेक ठिकाणी लोकप्रितिनिधीसुद्धा खमकेपणाने काम करीत आहेत. त्यामुळे संवेदनशील असलेल्या बऱ्याच भागांमध्ये ‘कोरोना’ नियंत्रणात आला आहे.

मात्र काही भाग असे आहेत की, त्या ठिकाणी ‘कोरोना’ वेगाने वाढत चालला आहे. मुलुंड आणि बोरिवली नंतर महापालिकेच्या एस वॉर्डमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या वेगाने ‘कोरोना’चे रूग्ण वाढत आहेत.

Mahavikas Aghadi

एस वॉर्डमध्ये तब्बल ४४३० ‘कोरोना’ रूग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. एस वॉर्डमध्ये भांडूप, पवई, विक्रोळी व कांजूरमार्ग हा परिसर येतो. विक्रोळीमधील कन्नमवारनगरमध्येही ‘कोरोना’चे रूग्ण वेगाने वाढत चालले आहेत. या मागे स्थानिक नगरसेवक यांचा निष्काळजीपणा निश्चितच कारणीभूत आहे. आणि प्रशासन सुद्धा !

कन्नमवारनगरमधील दयनीय स्थितीवर परखडपणे तेथील स्थानिक रहिवाशी व पत्रकार – लेखक चंद्रकांत साळसकर यांनी एक लेख लिहिला. हा लेख ‘लय भारी’ने प्रसिद्ध केला. चांगले काम होत असेल तर कौतुक केले पाहीजे, कामात कुचराई होत असेल तर तिथे चाबकाचे फटकारे दिले पाहीजेत, हे ‘लय भारी’चे धोरण आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व एकूणच ‘महाविकास आघाडी’ सरकार ‘कोरोना’च्या काळात आतापर्यंत तरी चांगले काम करताना दिसत आहे. ठाकरे पिता पुत्रांच्या चांगल्या कामावर ‘लय भारी’ने सतत लिखाण केले आहे. वरळीतील ‘कोरोना’ नियंत्रणात आणण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी केलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे.

अशीच कौतुकास्पद कामगिरी धारावी, देवणार या परिसरामध्येही झाली आहे. यात शिवसेनेच्या व अन्य पक्षांच्या लोकप्रतिनिधींचाही वाटा मोठा आहे. कांजूरमार्गच्या शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा करंजे अफाट कष्ट उपसत आहेत. ‘कोरोना’बाबत काळजी घेण्यासाठी सोशल मीडियातून जनजागृती करणारे व्हिडीओ पाठविणे, लिखीत मजकूर पाठविणे अशी कामे त्या करीत आहेत.

एवढेच नव्हे तर, त्यांनी सतत आरोग्य शिबीरे आयोजित करून लोकांच्या आरोग्य तपासणीचा सपाटाच लावला आहे. पण दुसऱ्या बाजूला कन्नमवारनगरचे नगरसेवक उपेंद्र सावंत झोपा काढत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या नगरसेवकांच्या निष्काळजीपणावर टीकास्त्र सोडणारा अप्रितम लेख चंद्रकांत साळसकर यांनी लिहिला.

मुळातच लोकप्रतिनिधींच्या भंपक कारभाराविरोधात सहसा कोणी लिहित नाही. बोलत नाही. नगरसेवकांच्या विरोधात लिखाण करणे म्हणजे तसे अवघडच असते. कारण अशा लोकप्रतिनिधींकडे आडदांड, उद्दामखोर, गुंड प्रवृत्ती, विवेकबुद्धी नसलेले चेले चपाटे भरपूर असतात.

अशा चेल्या चपाट्यांना दादागिरी करण्याची भारी हौस असते. आपला नेता म्हणजे साक्षात परमेश्वर. त्याने कितीही गुण उधळले तरी त्याच्या विरोधात कुणी आवाज काढायचा नाही अशी या चेल्या चपाट्यांची भावना असते. कुणी आवाज उठवलाच तर हे लोकप्रतिनिधी आपल्या चेल्या चपाट्यांमार्फत लगेचच दंडेली आणि दादागिरीवर येतात.

महापालिका, सरकारी यंत्रणा व पोलीस यंत्रणा आपली खासगी जाहिगिरी असल्याची भावना अशा उद्दामखोर लोकप्रतिनिधींची असते. त्यामुळे पोलिसी दंडूका वापरून विरोधात बोलणाऱ्यांचे तोंड बंद करण्याची हुकूमशाही ते करीत असतात. साळसकर यांच्या बाबतीत तोच प्रकार करण्याचा प्रयत्न नगरसेवक सावंत व त्यांच्या चेल्या चपाट्यांनी केला.

साळसकर यांनी लेख लिहिल्यानंतर या नगरसेवकांना व त्यांच्या चेल्या चपाट्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या. विरोधात लिखाण केले म्हणून मिरच्या झोंबणे साहजिकच आहे. त्यात वाईट काही नाही. पण मिरच्या झोंबल्यानंतर नगरसेवक न त्यांच्या चेल्या चपाट्यांनी उत्कृष्ट काम करण्यासाठी कंबर कसायला पाहीजे होती.

चंद्रकांत साळसकर यांनी लिहिलेला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वरळी, धारावी, देवणार व इतर परिसरातील लोकप्रतिनिधींनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काय केले तशा पद्धतीने कन्नमवारनगरमध्येही त्यांनी पाऊले उचलायला हवी होती. फार लांब नाही किमान बाजूच्या वॉर्डातील नगरसेविका सुवर्णा करंजे यांचा आदर्श घ्यायला हवा होता. पण तसे झाले नाही.

हे सुद्धा वाचा

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या कणखरपणामागे कार्यरत आहे पडद्यामागील ‘खास माणसां’ची फौज

Coronavirus : उद्धव ठाकरे, राजेश टोपेंचे धडाकेबाज पाऊल; राज्यातील सगळी खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी, मेस्मा कायदाही लागू

लेख लिहिला म्हणून या नगरसेवकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांकरवी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस निघाले हुशार. बहुधा नगरसेवकांचा अकार्यक्षम पोलिसांनाही ठाऊक असावा. साळसकर यांनी जे लिहिलेय त्यात अयोग्य असेच काहीच नव्हते. त्यामुळे नगरसेवकांची पोलीस ठाण्यात डाळ शिजली नाही.

हे नगरसेवक महाशय किती बिनडोक आहेत हे सुद्धा या निमित्ताने कळले. लेख झोंबलाच आहे तर स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहायला हवे होते. त्यांनी चक्क एका महिलेला व दोन तीन उडाणटप्पू कार्यकर्त्यांना पोलिसांकडे पाठवून दिले. स्वतः मात्र लगेच निघून गेले. हे जबाबदार लोकप्रतिनिधींचे लक्षण नव्हे.

व्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारिता काय असते हे ज्याला माहित नाही असे हे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात चंद्रकांत साळसकर यांना उलटसूलट बोलू लागले. राज्यात आपल्याच पक्षाची सत्ता आहे त्यामुळे वाट्टेल तसे आपण वागू शकतो ही गूर्मी त्यांच्यात असावी. अर्थात अशा तिनपाट कार्यकर्त्यांना पोलिसांनी थारा दिला नाही.

आदळआपट करणाऱ्या अन् स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी औकात दाखवून दिली ते बरेच झाले. लोकप्रितिनीधींच्या विरोधात लिहिले म्हणून जर पोलीस गुन्हे दाखल करायला लागले तर पत्रकारिताच करता येणार नाही.

मुळातच पत्रकारांनी किंवा सामान्य लोकांनी केलेली टीका एखाद्या लोकप्रतिनिधीला, राजकीय कार्यकर्त्यांना सहन होत नसेल तर अशांनी राजकारण सोडून द्यावे. राजकारणात व समाजकारणात टीका सहन करण्याची तयारी ठेवता आली पाहीजे. केलेली टीका सकारात्मक घेता यायला हवी.

हे नगरसेवक इतके अकार्यक्षम आहेत, की त्यांच्याबद्दल साळसकर यांनी लेखात ‘बसकन मारलेली म्हैस’ असा उल्लेख केला होता. हा उल्लेख अतिशय समर्पक आणि योग्य असाच आहे. अकार्यक्षम व्यक्तीची कानउघाडणी करायची असेल तर कसे शब्द वापरावेत याचा आदर्श वस्तुपाठ शिवसेनाप्रमुख व पत्रकार कै. बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांची ही शैली आजही ‘सामना’ने जपलेली आहे. त्यामुळे साळसकर यांनी ‘बसकन मारून बसलेली म्हैस’ असा जो शब्दप्रयोग केला आहे, तो योग्यच आहे. किंबहूना त्यापेक्षाही कडक शब्दांचा वापर नगरसेवक सावंत यांच्यासाठी योग्य ठरला असता.

टीका करणारा लेख छापला म्हणून लिखाण करणाऱ्यांच्या विरोधात ऊर्जा घालविण्याऐवजी कन्नमवारनगरमधील मतदारांना ‘कोरोना’पासून वाचविण्यासाठी त्यांनी वेळ व श्रम सत्कारणी लावायला हवा. दीड दमडीच्या चेल्या चपाट्यांचे ऐकून पक्षाचे नाव खराब करू नये.

पक्षाची ताकद व्यक्तीगत आकस काढण्यासाठी वापरू नये. पत्रकार त्यांचे काम करीत असतात. त्यांना ते करू द्यावे. नगरसेवक सावंत यांनी आपल्या मतदारसंघात काय ‘दिवे’ लावले आहेत, यावर नंतर आम्ही बरेच लिहू. तूर्त हा शब्दांचा मार पुरेसा ठरेल.

आपण सत्ताधारी पक्षातील लोकप्रितिनिधी आहात. त्यामुळे जबाबदारीचे भान ठेवून मिळालेल्या अधिकाराचा वापर कन्नमवारनगरमधील जनतेला ‘कोरोना’पासून वाचविण्यासाठी करण्याची सुबुद्धी सावंत यांना मिळेल. आपले नेते चांगले काम करीत असताना आपण अकारण बावळटपणा करायला नको एवढे तरी सावंतांना समजेल. चेल्या चपट्यांची बौद्धीक क्षमता तेवढी नसते. त्यामुळे नगरसेवकांनीच आपली अक्कल नीटपणे वापरायला हवी अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

पत्रकारिता व विचारस्वातंत्र्याचा गळा दाबण्यासाठी सावंत यांनी केलेला प्रयत्न पोलिसांच्या योग्य भूमिकेमुळे हाणून पाडला गेला. याबद्दल आम्ही पोलिसांचे आभार मानतो.

Laybhari appeal

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी