32 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 'ड्रग'निमिर्तीचे धंदे; हेच का राज्याचे उद्योगधोरण?

महाराष्ट्रात ‘ड्रग’निमिर्तीचे धंदे; हेच का राज्याचे उद्योगधोरण?

महाराष्ट्र हे ड्रग्ज निर्मितीचे आणि ड्रग्जमाफियांचे मुख्यालय बनले आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांमधील जप्त केलेले ड्रग्ज, उद्ध्वस्त केलेल्या ड्रग्जच्या फॅक्टरी पाहिल्या तर या पुरोगामी राज्याला भविष्यात ‘उडता महाराष्ट्र’ म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ऑक्टोबरमधील कारवायांवर नजर टाकली तर नाशिकमध्ये ड्रग्जच्या दोन फॅक्टरी, तसेच सोलापूर, मराठवाड्यातील पैठण आणि पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तरीही प्रश्न उपस्थित होतो की महाराष्ट्रात ड्रग्जच्या एवढी फॅक्टरी झाल्या कशा? यामागे कोणत्या शक्ती होत्या?

नाशिक – दोन ड्रग्ज फॅक्टऱ्या, ६०० कोटींचे ड्रग्ज

मुंबईपासून अवघ्या चार तासांवर नाशिक जिल्ह्यात ड्रग्जच्या फॅक्टऱ्या आहेत, हे कुणी महिन्यापूर्वी सांगितले असते, तर कुणी विश्वास ठेवला नसता. पण मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ७ ऑक्टोबरला नाशिकच्या शिंदे गावातील ललित पाटीलचा ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केला होता. ३०० कोटींचे ड्रग्ज येथून जप्त करण्यात आले. या कारवाईचा नाशिक पोलिसांना पत्ताही नव्हता. साकीनाका पोलिसांच्या कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी (८ ऑक्टोबर) याच गावातील आणखी एक ड्रग्जची फॅक्टरी नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त केली. या कारवाईतून २५० कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला.

सोलापूर – चिंचोलीमधील ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त

नाशिकप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीचा १६ ऑक्टोबर रोजी पर्दाफाश करण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई स्थानिक पोलिसांनी नाही तर मुंबई गुन्हे शाखेने केली. येथे १०० कोटींचे ड्रग्ज आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याच चिंचोली एमआयडीसी परिसरात २०१६ मध्ये एव्हॉन लाईफ सायन्सेस कंपनीवर ठाणे गुन्हे शाखेने कारवाई करत इफेड्रीन ड्रग्जचा पर्दाफाश केला होता.

मराठवाडा – पैठणमधील महालक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जची निर्मिती

२२ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज कारखान्यावर छापेसत्र राबवून २५० कोटींचे ड्र्ग्ज जप्त करण्यात आले. अहमदाबाद डीआरआय आणि अहमदाबाद पोलीस यांनी ही कारवाई केली. तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईची स्थानिक पोलिसांना खबरदेखील नव्हती. पैठण एमआयडीसीमधील महालक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जची निर्मिती केली जात होती. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. त्यातील जितेशकुमार हिन्होरिया प्रेमजीभाई हा अहमदाबादचा माफिया काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले.

पालघर – मोखाड्यातील फार्महाऊसमध्ये ड्रगची फॅक्टरी

पालघर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी (२३ ऑक्टोबर) मोठी कारवाई करत मोखाड्याच्या फार्महाऊसमध्ये सुरू असलेली ड्रगची फॅक्टरी उद्ध्वस्त केली. दीड वर्षापासून येथे ड्रग्जची निर्मिती केली जात होती. या फॅक्टरीतून ३६ कोटींचे ड्रग्ज हस्तगत करण्यात आले.

मुंबई – ७१ कोटींचे कोकेन जप्त

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी १७ ऑक्टोबरला मोठी कारवाई करत मुंबईत ७ किलो कोकेन जप्त केले.य केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी एकूण चार ठिकाणी कारवाई करून हे कोकेन जप्केत केले. मुंबई विमानतळ तसेच मुंबईतील एका घरात ही कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक – गिरणापात्रातून १०० कोटींचे ड्रग्ज हस्तगत

नाशिकच्या सटाना रोडवरील लोहणेर ठेंगोडा गावानजीक गिरणा नदीपात्रातून तब्बल १०० कोटींचा ड्रग्जसाठा हस्तगत करण्यात आला आहे. ललित पाटीलने या ड्रग्जचा साठा गिरणापात्रात टाकला होता. या शोधकार्यासाठी रायगडमधील प्रशिक्षित स्कूबांची मदत घेतली होती. अंधारात सुमारे १५ फूट पाण्याखाली चार तास शोधमोहीम चालली. या नदीपत्रातून दोन गोण्या भरून ड्रग्ज पोलिसांना मिळाले. या ड्रग्जची किंमत अंदाजे १०० कोटी रुपये आहे.

पालकमंत्री गोट्या खेळत होते का?

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात ड्रग्जवरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातल्या तरुणांना ड्रग्जच्या विळख्यातून वाचवायला हवे असे सांगतानाच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि उत्पादनशुल्क मंत्री शंभुराज देसाईवर जोरदार हल्लाबोल केला. ‘नाशिकमध्ये शेकडो कोटींचा ड्रग्ज सापडतोय. नाशिकचे पालकमंत्री गोट्या खेळत होते का?’, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी