27 C
Mumbai
Wednesday, September 25, 2024
Homeराजकीयठाकरे सरकार आज अधिवेशनाला पहिल्यांदाच सामोरे जाणार

ठाकरे सरकार आज अधिवेशनाला पहिल्यांदाच सामोरे जाणार

लय भारी न्यूज नेटवर्क

नागपूर : जेमतेम पंधरवड्यापूर्वी सत्तेत आलेले उद्धव ठाकरे सरकार पहिल्यांदाच विधीमंडळाला सामोरे जात आहे. ताकदवान विरोधी पक्ष असलेल्या भाजपशी ठाकरे सरकारशी गाठ पडणार आहे. सरकार नवे असल्याने ठाकरे मंत्रीमंडळाला धारेवर धरण्यास भाजपला फार संधी नाही. मात्र शेतकऱ्यांना मदत, सावरकर, फडणवीस सरकारच्या काळातील रद्द केलेले प्रकल्प या मुद्द्यावरून भाजप ‘महाविकास आघाडी’ सरकारला घेरण्याची संधी सोडणार नाही.

सरकारने काल आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर भाजपच्या नेत्यांनी बहिष्कार घातला होता. नव्या सरकारला आम्ही प्रश्न विचारणार नाही. परंतु त्यांनीच केलेल्या मागण्यांची पुन्हा आठवण करून देणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने प्रती हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. राहूल गांधी सावरकरांवर टीका करीत आहेत. पण सावरकरांबरोबर मांडीला मांडी लावून शिवसेना सत्तेत बसली आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. फडणवीस यांच्या काळातील अनेक प्रकल्पांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे, त्याचा दाखला देत हे ‘स्थगिती सरकार’ असल्याची संभावना फडणवीस यांनी केली आहे.

सावरकरांबद्दल शिवसेनेची काल जी भूमिका होती, तीच आज आहे आणि उद्याही असेल असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. शेतकऱ्यांना आम्ही वचन दिले आहे. ते वचन आम्ही पाळणार आहोत. लवकरच शेतकऱ्यांना चांगली बातमी देणार असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

अधिवेशन अवघ्या एका आठवड्याचे

सरकार सत्तेवर आल्यानंतर विधीमंडळाचे हे पहिलेच अधिवेशन आहे. परंतु अवघा एक आठवडा हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करणे हे सर्वाधिक महत्वाचे काम असेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी