31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमुंबईमला युती तोडायची नाही, भाजपनेच निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे

मला युती तोडायची नाही, भाजपनेच निर्णय घ्यावा : उद्धव ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई :  स्वाभिमानातून आपला पक्ष निर्माण झाला आहे. मी मुद्दाम भाजपाची कोंडी करीत नाही. ठरल्यापेक्षा मला एक कण सुद्धा जास्त नको आहे. जे ठरले होते ते मान्य असेल तर भाजपच्या नेत्यांनी मला फोन करावा. आमची चर्चेची तयारी आहे. पण जे ठरले होते ते भाजपने मान्य करायला हवे. मला खोटं ठरविण्याचा प्रयत्न करू नका. युती तोडण्याची माझी इच्छा नाही. भाजपनेच योग्य तो निर्णय घ्यावा, अशी भावना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबतच्या बैठकीत व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी चर्चेची तयारी दाखविल्यामुळे भाजप व शिवसेनेमध्ये आता सत्ता वाटपासंदर्भात वाटाघाटी करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. परंतु सत्तेतील समान वाटपाच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांनी ताठर व ठाम भूमिका घेतली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या नवनिर्वाचित सर्व आमदारांची बैठक आयोजित केली होती. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना या बैठकीत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपची युती निश्चित करताना जे ठरले होते, त्यानुसार सत्तेचे वाटप व्हायला हवे असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, दुपारी 3 वाजता संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्याच सुमारास सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील हे सुद्धा पत्रकारांशी बोलणार आहेत. त्यामुळे शिवसेना व भाजपची भूमिका आणखी स्पष्ट होईल.

शिवसेनेने सत्तेत समान वाटा, तसेच अडीच वर्षांकरीता मुख्यमंत्रीपदाची मागणी यापूर्वी केली होती. आजच्या बैठकीतही याच मागणीवर ठाम राहण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेचे आमदार रंगशारदामध्ये

उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदा हॉटेलकडे रवाना झाले आहेत. तिथे सगळ्या आमदारांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. मुंबई व महाराष्ट्रातील सगळेच आमदार या ठिकाणी जमले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी