26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजDevdarshan : राज्यात देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी

Devdarshan : राज्यात देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठ महिन्यापासून बंद असलेली सर्व मंदिरे आजपासून भाविकांसाठी उघडी (Devdarshan) करण्यात आली. पहिल्याच दिवशी देवदर्शनाची ओढ लागल्याने सकाळपासूनच भाविकांची पावले मंदिराकडे वळली. अल्पावधीतच भाविकांची गर्दी वाढत गेली.

राज्य सरकारने मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याच्या निर्णयाची शासनाच्या सूचनेनुसार अमलबजावणी आज झाली. यावेळी मास्क, योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी शासनाच्या सूचनेचे पालन करावे लागणार आहे. यामुळे पहाटे मंदिरात निर्जंतुकीकरण, स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या नियमावलीचे काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

तसेच ६५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरीक, १० वर्षाखाली मुले आणि गर्भवती महिलांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

Devdarshan : राज्यात देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी

विठुरायाच्या दर्शनाने भाविकांचा आनंद द्विगुणीत

लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या परमात्मा पांडुरंग आणि रुक्मिणी मातेच्या मुखदर्शनास आजपासून सुरुवात झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिवाळी पाडवा, भाऊबीज या सणाचे औचित्य साधत फुलांची आकर्षक सजावट केली. या फुलांच्या सजावटीत देवाचे लोभस रूप भाविकांनी डोळ्यात साठवले.

१७ मार्च रोजी श्री विठ्ठल मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद ठेवले होते. त्या नंतर माघी, चैत्री आणि आषाढी वारी भाविकाविना साजरी करण्यात आली. मात्र गेल्या महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्यावर मंदिरे सुरु करा अशा मागणीने जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालत मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. या बाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने बैठक घेवून दर्शनाची व्यवस्था, नियोजन करण्यात आले. दररोज भाविकांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजे पर्यंत दर्शन देण्यात येणार आहे. श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते. मात्र या वर निर्बंध आणीत आता केवळ मुख दर्शन करता येणार आहे.

तसेच दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून दर्शनाची तारीख वेळ निश्चित करावी लागणार आहे. आणि ज्या भाविकांनी संकेतस्थळवरून दर्शनाची वेळ घेतली आहे. त्याच भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तसेच भाविकांनी ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. श्री विठ्ठल रुक्मिनी मातेचे दर्शन सकाळी ६ ते ७, ८ ते ९, १० ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १, २ ते ३, ३ ते ४, संध्यकाळी ५ ते ६, ७ ते ८ आणि ८ ते ९ या कालावधीत भाविकांना दर्शन घेता येईल अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

Devdarshan : राज्यात देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळपासून भाविकांनी एकच गर्दी केली होती. येणारा प्रत्येक भाविक सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करताना दिसले. आज सुमारे २ हजारांपेक्षा जास्त भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतले.

Devdarshan : राज्यात देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी

भाजपा कार्यकर्त्यांनी केले सोशल डिस्टंन्सिंगचे उल्लंघन

आज भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यावेळी जवळपास ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकाराचे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन केले नाही किंवा मास्क देखील अनेकांनी वापरले नव्हते. यावर मुळीक यांना विचारले असता, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करूनच दर्शन घेतले आहे. तसेच येथे गर्दी होणे हे राज्य सरकारचे अपयश असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी चरणी भाविकांची रीघ

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात आज सकाळी भक्तांना पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी प्रवेश देण्यात आला. यावेळी भाविकांची रीघ लागली होती. पुन्हा एकदा भाविकांच्या गर्दीने कोल्हापूर फुलले असल्याचे चित्र दिसून आले.

करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा ही दोन प्रमुख मंदिरे शासन निर्णयानुसार आज सकाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली.

भाविकांसाठी उघडला शिर्डीचा साई दरबार

तब्बल आठ महिन्यांनी आज भाविकांसाठी शिर्डीचे श्री साई मंदिर उघडले गेले. आज सकाळी काकड आरतीपासून शिर्डी येथील श्री साई मंदिर भाविकांसाठी खुले झाले.

दररोज येथे सहा हजार भक्तांना दर्शन दिले जाणार आहे. भक्तांच्या सुरक्षेसाठी साई संस्थान सज्ज झाले असून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिरात फुल, हार, प्रसाद नेण्यास बंदी असून भाविकांना दर्शनासाठी दोन नंबर गेटने प्रवेश दिला जात आहे. त्यानंतर द्वारकामाई-समाधी मंदिर- गुरुस्थान असा दर्शन मार्ग असून पाच नंबर गेटने भाविक मंदिराच्या बाहेर पडणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी