30 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूजनागपूरात लॉकडाऊन! मुंबईतही लॉकडाऊनचे मुख्यमंत्री ठाकरेंकडून संकेत; पुढील दोन दिवसात निर्णयाची शक्यता

नागपूरात लॉकडाऊन! मुंबईतही लॉकडाऊनचे मुख्यमंत्री ठाकरेंकडून संकेत; पुढील दोन दिवसात निर्णयाची शक्यता

टीम लय भारी

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. त्यामुळे नागपूर शहरात लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. काही भागांत प्रशासनाने निर्बंधही लागू केले आहेत. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही भागांत लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत. याबद्दलचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबद्दल कोणत्या उपाययोजना करण्यात येणार, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरेंना विचारला. त्यावर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावा लागेल. पुढील एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास नाईलाजाने पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, कोरोनाची लस अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही भीती बाळगू नये. मनात कोणताही किंतु-परंतु आणू नका. लस घेण्यास पात्र ठरल्यानंतर निश्चिंतपणे लस घ्या. त्यासोबत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले नियमदेखील पाळा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

नागपूरात लॉकडाऊन

 

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागपूर शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

“लॉकडाऊनमध्ये कडक संचारबंदी ठेवण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय लॉकडाऊनच्या काळात खासगी कार्यालये बंद राहणार असून शासकीय कार्यालयात २५ टक्के उपस्थितीला परवानगी असेल. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा व मार्च एंडिंग संबंधित कार्यालये पूर्ण क्षमनेते सुरु राहतील. वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहतील,” असे नितीन राऊत यांनी यावेळी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये मद्यविक्री दुकाने बंद राहतील, मात्र त्यांची ऑनलाइन विक्री सुरु राहणार आहे. तसेच खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरु राहील, असे नितीन राऊत यांनी सांगितले. त्यासाठी ओळखपत्र बाळगणे आवश्यक असेल असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, लसीकरण सुरु ठेवले जाणार असून १३१ केंद्रावर अधिकाधिक लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. नितीन राऊत यांनी यावेळी लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांना लसीकरणासाठी लोकांच्या प्रवासाची सोय करण्याचे आवाहन केले.

“लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहणार आहेत. भाजीपाला, फळे, मांस, मासे, अंडी विकत घेण्यासाठी ही दुकाने सुरु राहतील. डोळ्यांचे दवाखानेही सुरु असतील,” असे नितीन राऊत यांनी सांगितले. “घरी विलगीकरणात असणा-या रुग्णांनी पूर्णवेळ घरातच असावे यासाठी प्रशासनामार्फत अचानक भेट दिली जाईल. यावेळी कोणी दोषी आढळल्यास कारवाई केला जाईल,” असा इशारा नितीन राऊत यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी