30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeलेखमाईबद्दल छिद्रान्वेष..!! कथित पुरोगाम्यांना शोभत नाही..!!!

माईबद्दल छिद्रान्वेष..!! कथित पुरोगाम्यांना शोभत नाही..!!!

अनाथांचे पालकत्व घेणे ही खायची गोष्ट नाही. प्रत्येक मुलात काही अनुवांशिक गुणदोष असतात. शिवाय कोणत्या वयात त्यांचे पालकत्व घेतले यावर पालकत्व घेणाराची कसरत अवलंबून असते. २०१८ मध्ये चिपळूण तालुक्यातील एका गावात व्यसनी पतीने चारित्र्याचा संशयावरुन आरक्षणामुळे सरपंच असलेल्या आपल्या पत्नीची हत्या केली. १७ वर्षांची मुलगी आणि १६ वर्षांचा मुलगा होता. मुलीने शिकण्याची इच्छा व्यक्त केली(Hoaxes about mai, not suitable for so-called progressives).

माझ्या सौभाग्यवतींनी मला फोन करुन तिच्या पालकत्वाबाबत विचारणा केली. मी एका क्षणात हो म्हटलो. आम्ही त्या मुलीचा काही महिने सांभाळ केला. नंतर तिच्या काॅलेजमधील होस्टेल मध्ये तीची राहण्या-खाण्याची सोय झाली. तद्नंतर त्या मुलीचा खर्च सुमती जांभेकर मॅडमनी बघितला. पण या दरम्यान त्या मुलीचा बुद्ध्यांक आणि अपेक्षापूर्ती करताना आमची भंबेरी उडाली. काही अनुभव असे आले की, ठरवले यापुढे पालकत्व घेतले तर फक्त आर्थिक मदत देऊ, घरी नकोच!

खरं तर हे सांगण्याचे कारण म्हणजे, अशा हजारो मुलांचे पालकत्व, शिक्षण, स्वावलंबन आणि विवाह इतके दिव्य पार पाडताना वात्सल्यसिंधू सिंधुताई उर्फ माईंनी जे काही भोगलं असेल त्याची कल्पना त्या क्षेत्रात काम न केलेली व्यक्ती करु शकत नाही. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे असे उगीच म्हटले गेलेलं नाही. तरीही त्यांच्या मृत्यूपश्चात स्वतःला सुशिक्षित, पुरोगामी म्हणवणाऱ्या गटाने काल दिवसभर जो उच्छाद मांडला तो केवळ अज्ञान आणि जातीय अहंगंडातून मांडला गेला.

पौगंडावस्थेत आलो तेव्हाच काही सनातनी भेटले आणि ब्राह्मणांबद्दल मनात कडवट भावना निर्माण झाली. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाऊन तर संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल तिरस्कार निर्माण झाला. काळाच्या ओघात पुरोगामी ब्राह्मण संपर्कात आले आणि स्वतःच्या अज्ञानातून बाहेर पडलो. शिवाय ब्राह्मण कुळात जन्मलेल्या चक्रधर आणि बसवण्णा यांनी स्थापन केलेल्या महानुभाव आणि लिंगायत पंथामुळे सगळेच ब्राह्मण एका माळेचे नसतात, यावर शिक्कामोर्तब केले.

महानुभाव यांच्या तत्वज्ञानातला ‘शरण आलेल्यास अभय’ हा समाजशांततेसाठी शाश्वत असा मंत्र राहील. या पंथाचे तत्वज्ञान विशाल विचार करणारे आहे. महानुभावपंथी देशात, थेट पाकिस्तानात आजही आहेत. ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांची आत्या पंथ प्रचारासाठी पाकिस्तानात गेल्या, तिकडेच निवर्तल्या. साताऱ्यात एक मोठा महानुभव मठ आहे. फलटण ही तर चक्रधरभूमी. श्रद्धेचा विषय ज्ञान प्राप्त दोन शिळा पण याच जिल्हयात आहेत.

या पंथातले काही लोक आज कसे व्यवहारात वागतात हा वादविषय असला तरी चक्रधर स्वामी यांचा हा पंथ बहुजन समाजाने जपलाय. असा कोणताही पंथ काही शतके उगीच जिवंत राहत नाही.

सिंधुताई सपकाळ या महानुभाव पंथी/मराठा. आयुष्यभर त्या पंथाला धरुन राहिल्या. त्यांचे अंत्यसंस्कार पण त्याच पद्धतीने झाले. त्या काही प्रचंड शिक्षित नव्हत्या. कालगतीतील सर्व प्रश्न त्यांना समजलेही नव्हते. त्यामुळे त्यांचे काही उद्गार कालसुसंगत किंवा तार्किकदृष्ट्या योग्यही नसतील. (नाव घ्यायचीही जिची लायकी नाही, मात्र उदाहरण द्यायचे म्हणून लिहितो, त्या रामतीर्थकर बाईसारख्या कडवट नक्कीच नव्हत्या.)

भाषणाच्या ओघात त्या काही बोलल्या असतील. कथित पुरोगामी किंवा फुले-आंबेडकरवादी पण नसतील त्या. पण त्या गेल्या त्यानंतर जे कोणी, ज्या पद्धतीने व्यक्त झाले ते स्वतःला फुले-आंबेडकरवादी म्हणवणाऱ्यांना शोभणारे नव्हते.

दोष प्रत्येक व्यक्तीत असतात. छिद्रान्वेषाला कुणाच्याच अंगावरचे नवे कुईट वस्त्रही अपवाद नाही.

ताई-माई जाताना अखिल महाराष्ट्राने नोंद घ्यावी अशा झोकात गेल्या. त्यांना पुनश्च एकवार भावपूर्ण श्रद्धांजली!!

-तुषार गायकवाड
कराड-चिपळूण

सिंधू ताईंच्या मुलीचे जनतेला भावनिक आवाहन

Social worker Sindhutai Sapkal, ‘mother to thousands of orphans’, passes away

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी