28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या मंत्रीपदाबद्दल संजय राऊत बोलू शकत नाहीत, मी पक्षाचा अध्यक्ष आहे...

अजित पवारांच्या मंत्रीपदाबद्दल संजय राऊत बोलू शकत नाहीत, मी पक्षाचा अध्यक्ष आहे : शरद पवार

लय भारी न्यूज नेटवर्क

पुणे : अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाल्याबद्दल मी सुद्धा ऐकले आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष मी आहे. माझ्या पक्षातील मंत्रीपदे संजय राऊत ठरवू शकत नाहीत. राष्ट्रवादीमधील कुणाला मंत्रीपद द्यायचे आहे याची यादी माझ्याकडे आहे, असे सांगतानाच तिन्ही पक्षांच्या खातेवाटपाचा निर्णय झाला आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार येत्या दोन – तीन दिवसांत होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेतकरी कर्जमाफीबाबतही चर्चा झाली असून त्याबाबतच निर्णय सुद्धा लवकरच होईल. कदाजित आजच हा निर्णय होऊ शकतो. शेतकरी कर्जमाफीबद्दल भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेत त्यांनी भूमिका मांडली. पण अवघ्या सात दिवसांचे हे अधिवेशन आहे. तिथे लगेच सगळे निर्णय घेता येत नाहीत. भाजपची केंद्रात व राज्यात पाच वर्षे सत्ता होती. त्यावेळी का नाही लगेच निर्णय घेतले असा सवाल शरद पवार यांनी केला. ते पुढे म्हणाले की,  शेतकरी कर्जमाफीबद्दल माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. या बैठकीला जयंत पाटील, अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव व अर्थ सचिव उपस्थित होते. देशात यापूर्वी दोनदा कर्जमाफी झाली आहे. मी केंद्रात कृषीमंत्री असताना ७१ हजार कोटी रूपये कर्जमाफी झाली होती. त्यानंतर फडणवीस सरकारने साधारण ३१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. पण त्याचे पैसे लोकांना वेळेवर मिळाले नाहीत. अजूनही अनेकांना पैसे मिळाले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत, सहकारी बँकेतून लोकांचे कर्ज काढले आहे, तसेच काही नागरी बँकांतूनही कर्ज काढले आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँकेत कर्जमाफीचे पैसे देण्याबाबत आमची चर्चा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बँकेतील खाती कोरी होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत पुन्हा गुंतवणूक करण्यास संधी मिळेल. याबाबतचा निर्णय सरकार लवकरात लवकर घेईल. कदाचित आज सुद्धा हा निर्णय होऊ शकतो, असे पवार म्हणाले.

सुधारित नागरिक कायद्याबद्दल लोकांनी संयम ठेवावा

केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित नागरिक कायद्याबद्दल लोकांच्या तीव्र भावना आहेत. पण लोकांनी शांततेच्या व संयमाच्या मार्गाने त्या व्यक्त केल्या पाहिजेत. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार याची काळजी घ्यावी. लोकांना आवाहन आहे की, तुमच्या भावना व्यक्त करा पण त्याचा उद्रेक होऊ देऊ नका. सामाजिक सौख्य बिघडू देऊ नका. धार्मिक वाद तयार होणार नाही याची काळजी घ्यावी. अन्याय झाला हे मान्य आहे. पण कायदा हातात घेऊ नका, असे पवार म्हणाले.

नक्षलवादाचे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांची चौकशी करायला हवी

आनंद तेलतुंबडे व अन्य काही लोकांवर पुणे पोलिसांनी नक्षलवादासंबंधीचे गुन्हे दाखल केले आहेत. पुणे पोलिसांची ही भूमिका चुकीची आहे. नक्षलवादाबाबतची पुस्तके माझ्याकडे सुद्धा आहेत. म्हणून मी नक्षलवादी किंवा नक्षल समर्थक ठरत नाही. नामदेव ढसाळ यांनी एक कविता लिहिली होती. आता शहरांना आग लावू असे त्यात लिहिले होते. म्हणून काय खरोखरच शहरांना आगी लावणे हा त्यांचा हेतू नव्हता. मनातील उद्रेक व्यक्त करण्याचा अधिकार आपण कवींना देणार आहोत की नाही, असा सवाल पवार यांनी केला. सत्तेचा दुरूपयोग केला जात असल्याचे मत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले आहे. पुणे पोलिसांविषयी एसआयटी नेमायला हवी, तसेच दोषी पोलिसांना निलंबित करायला हवे असेही पवार म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याची गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिल्याबद्दल पवार म्हणाले की, आमच्या हत्येसंबंधीही सुद्धा अशा अनेकदा माहिती दिली गेली होती. पण म्हणून आम्ही त्याचा गाजावाजा केला नाही. आम्ही कुणावरही ऊठसूठ देशद्रोहाचे आरोप करून त्यांना तुरूंगात टाकू नये, असेही पवार म्हणाले.

डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यावेळी बांगलादेशांमध्ये काही लोकांवर अन्याय झाला म्हणून त्यांना भारताचे नागरिकत्व द्यायला हवे असे मत व्यक्त केले होते. म्हणून त्यांचा आताच्या कायद्याला पाठिंबा होता असा अर्थ होत नाही.

या कायद्यावरून राज्यातही आंदोलनाचा भडका उडाला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनीही चिंता व्यक्त केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र सरकारने योग्य भुमिका घेतली असल्याची पावतीही पवार यांनी यावेळी दिली.

येत्या २४ डिसेंबरला होणार मंत्रीमंडळ विस्तार

येत्या २४ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यात शिवसेनेचे १० मंत्री शपथ घेतील. त्यात ७ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ मंत्री शपथ घेतली. यांत ८ कॅबिनेट, तर ३ राज्यमंत्री असतील. काँग्रेसचे ८ मंत्री शपथ घेतील. यांत ६ कॅबिनेट व २ राज्यमंत्री असतील. एकूण २९ मंत्री यावेळी शपथ घेतील.

अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद

अजित पवार यांचा येत्या मंत्रीमंडळ विस्तारात समावेश होईल. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. सध्या शिवसेनेकडे असलेले गृह खाते राष्ट्रवादीकडे येईल. हे गृह खाते अजित पवार यांच्याकडे सोपविले जाईल असे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

जामखेडमध्ये सीएए, एनआरसी विरोधात विराट मोर्चा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ७८ हजार कोटींची गरज : नारायण राणेंनी सांगितला खर्चाचा आकडा

नारायण राणे म्हणतात; यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार हे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी