32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, जाणून घ्या 'ठळक'...

Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, जाणून घ्या ‘ठळक’ बाबी !

राज्यातील शिंदे-भाजप सरकारचा अखेर ३९ दिवसानंतर मंगळवारी (ता. ९) विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बंडखोर एकनाथ शिंदे गटातील आणि भाजप पक्षातील प्रत्येकी ९ आमदारांना अशा एकूण १८ नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.

राज्यातील शिंदे-भाजप सरकारचा अखेर ३९ दिवसानंतर मंगळवारी (ता. ९) विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बंडखोर एकनाथ शिंदे गटातील आणि भाजप पक्षातील प्रत्येकी ९ आमदारांना अशा एकूण १८ नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या नव्या मंत्रिमंडळात भाजपमधील राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, डॉ. विजयकुमार गावित, गिरीष महाजन, मंगलप्रभात लोढा, सुरेश खाडे, अतुल सावे तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदय सामंत, प्रा. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली गेली.

राजभवनातील दरबार हॉल येथे हा १८ नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते.

शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व आजी- माजी मंत्र्यांना संधी देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई, संजय राठोड या सात मंत्र्यांना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. तर फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद भूषविलेल्या तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांची सुद्धा या मंत्री मंडळात वर्णी लागली आहे. तर दुसरीकडे, बच्चू कडू आणि राजेंद्र पाटील यड्रावकर या दोन माजी राज्यमंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यातील विस्तारापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

शिंदे गटाकडून कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातून प्रत्येकी दोन असे एकूण आठ तर विदर्भातून एक मंत्र्याला या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतून सध्या तरी कोणालाही समाधी देण्यात आलेली नाही. शिंदे गटातून शंभूराज देसाई, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, दादा भुसे अशा चार मराठा नेत्यांना स्थान दिले गेले. तर गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, संजय राठोड हे तिघे ओबीसी- एनटी प्रवर्गातील आहे. सामंत सारस्वत ब्राह्मण असून सत्तार अल्पसंख्याक समुदायातील आहेत. सर्वसामान्यांचे सरकार म्हणवणाऱ्या शिंदे गटाला या मंत्रिमंडळ विस्तारात दलित, आदिवासी आणि महिलांना पहिल्या टप्प्यात तरी संधी देता आलेली नाही.

भाजप पक्षाकडून राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण या तीन मराठा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. तर, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, गिरीश महाजन या तीन ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. विजयकुमार गावित (आदिवासी), सुरेश खाडे (दलित) आणि लोढा (जैन) यांना सुद्धा भाजपकडून मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली आहे. भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक समतोल सुद्धा साधण्यात आला आहे. विदर्भातून सुधीर मुनगंटीवार, मराठवाड्यातून अतुल सावे, पश्चिम महाराष्ट्रातून चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, तर उत्तर महाराष्ट्रातून राधाकृष्ण विखे-पाटील (नगर), विजयकुमार गावित (नंदुरबार), गिरीश महाजन (जळगाव) असा समतोल साधला गेला आहे. तर मुंबईतून मंगलप्रभात लोढा आणि कोकणातून रवींद्र चव्हाण (ठाणे) यांची वर्णी लावली गेली आहे.

विधान परिषदेतील आमदारांना मंत्रिमंडळात सध्या तरी स्थान नाही
शिंदे-भाजप सरकारच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या विस्तारामध्ये विधान परिषदेतील एकाही आमदाराला स्थान देण्यात आलेले नाही. शिंदे गटाचा विधान परिषदेत तर एकही आमदार नाही. पण मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या भाजपच्या प्रविण दरेकर, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड या विधान परिषदेतील प्रमुख आमदार नेत्यांना सध्या तरी मंत्रिमंडळाबाहेरच थांबावे लागले आहे. या नेत्यांना दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपचे आणखी एक महत्वाचे नेते असलेले आशिष शेलार यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेल्या आशिष शेलार यांना चंद्रकांत पाटलांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी नेमण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. शेलार यांना मात्र सध्या कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी शेलार यांच्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची देखील चर्चा आहे.

शिंदे-भाजप सरकारमध्ये एकाही महिलेला देण्यात आली नाही संधी
शिंदे-भाजप सरकारमध्ये मंगळवारी १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. पण यामध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे सरकार हे महिला विरोधी आहे काय? असा सवाल सर्वपक्षीय महिलांनी सरकारला विचारला आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात महिला आमदारांना संधी दिली जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपावर दिली.

मंदा म्हात्रे (बेलापूर), मनिषा चौधरी (दहिसर), विद्या ठाकूर (गोरेगाव), भारती लव्हेकर (वर्सोवा), माधुरी मिसाळ (पर्वती), मुक्ता टिळक (कसबापेठ, पुणे), देवयानी फरांदे, (नाशिक मध्य), सीमा हिरे, (नाशिक पश्चिम), श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा (केज), मोनिका राजळे (शेवगाव) अशा १२ भाजपच्या महिला आमदार विधानसभेत आहेत. तर, शिंदे गटात यामिनी जाधव, लता सोनवणे, मंजुळा गावित आणि गीता जैन अशा ४ महिला आमदारांचा समावेश आहे. पुण्यातील माधुरी मिसाळ, मोनिका राजळे आणि यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, एकाही महिलेला मंत्रिपदाची संधी न दिल्याने सरकारवर चहूबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

गावित, राठोड, सत्तार वादग्रस्त या वादग्रस्त चेहऱ्यांना देण्यात आले मंत्रिमंडळात स्थान
भाजपचे आमदार विजयकुमार गावित, शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या वादग्रस्त चेहऱ्यांना शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे. विजयकुमार गावित हे मूळ राष्ट्रवादीचे नेते असून, काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये आदिवासी मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने त्यांच्यावर केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना पक्षात घेतले. त्यानंतर त्यांच्यावरील आरोपांचे काय झाले ? याचे जनतेला काहीच माहित नाही. आता भाजपने त्यांना थेट मंत्री केले आहे.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येला शिवसेनेचे तत्कालीन मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर भाजपने खासकरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला जोरदार लक्ष्य केले होते. आता त्याच संजय राठोडांना घेऊन भाजपला मंत्रिमंडळात बसावे लागणार आहे. अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींनी चुकीच्या पद्धतीने टीईटी घोटाळ्यात प्रमाणपत्र घेतल्याचे काल (ता. ८ ऑगस्ट) समोर आले आहे. त्यानंतरही सत्तार यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारसह भाजपवर सडकून टीका केली.

शिंदे-भाजप सरकारमधील नव्या मंत्र्यांची नावे
शिंदे गटाचे मंत्री

१) गुलाबराव पाटील
२) दादा भुसे
३) संजय राठोड
४) संदीपान भुमरे
५) उदय सामंत
६) तानाजी सावंत
७) अब्दुल सत्तार
८) दीपक केसरकर
९) शंभूराज देसाई

भाजपचे नवे मंत्री
१) राधाकृष्ण विखे पाटील
२) सुधीर मुनगंटीवार
३) चंद्रकांत पाटील
४) विजयकुमार गावित
५) गिरीश महाजन
६) सुरेश खाडे
७) रविंद्र चव्हाण
८) अतुल सावे
९) मंगलप्रभात लोढा

नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेरीस झाला असून विरोधकांनी तसेच सत्ताधाऱ्यांच्या काही लोकांनी सुद्धा या नव्या मंत्र्यांच्या नावावर प्रश्न उपस्थित केले आहेत. घोटाळ्यात नाव असलेले आणि प्रतिमा मलीन असणाऱ्या पुढाऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान दिले गेल्याने हेच का ते ‘सर्वसामान्यांचे सरकार’ असा प्रश्न जनतेकडून विचारण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी