29 C
Mumbai
Friday, July 5, 2024
Homeराजकीयनाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपने घ्यावी ; सचिन सावंत

नाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपने घ्यावी ; सचिन सावंत

टीम लय भारी

मुंबई :-  नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात टँकरमधून आॉक्सिजन टँकमध्ये भरताना गळती झाली होती. यामुळे रुग्णालयात पुरवठा सुरु असणाऱ्या ऑक्सिजनचा दाब कमी झाला आणि ऑक्सिजन अभावी २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही दुर्घटना घडली त्यावेळी जवळपास १५० रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. अशावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

‘भाजपचे महापौर, ३ आमदार फरार झाले काय?’

‘झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी आम्ही करतो. या घटनेला जबाबदार असलेल्यांना अटक करायला हवे. हे रुग्णालय नाशिक महापालिकेचे आहे आणि महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे भाजपने या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महापौर आणि भाजपचे ३ आमदार कुठे आहेत? ते फरार झाले काय?’ असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.

‘भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय का?’

या दुर्घटनेची चौकशी राज्य सरकारने करावी अशी आमची मागणी आहे. दरम्यान, भाजप नेते मात्र राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. पण नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्या ऑक्सिजन टाकीचे काम नुकतेच करण्यात आले होते. ते कामाचे टेंडर महापालिकेनेच काढले तसेच ऑक्सिजन पुरवठा करण्याचे टेंडर महापालिकेनेच दिले. अशावेळी सरकार कसे जबाबदार असेल?  मग आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडलेय का? अशी शंका मनात येत असल्याची टीकाही सावंत यांनी केली आहे.

आयुक्तांवर कारवाईची दरेकरांची मागणी

प्रविण दरेकर म्हणाले, “नाशिकमध्ये घडलेली घटना ह्रद्य हेलावणारी आणि व्यथित करणारी आहे. या घटनेत स्वाभाविकपणे हलगर्जीपणा सरकारचाच आहे. महापालिका असो की जिल्हा ते सरकारच्या नियंत्रणात काम करत असते. या साथीरोगात महापालिका क्षेत्रात आयुक्तांना अधिकार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी आयुक्तांची आहे. कारण अशाकाळात महापालिकांना किंवा जिल्हा परिषदांना अधिकार नसतात. आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतात. या खात्याचे नियंत्रण करणारी लोके आणि सरकार यांची ही जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारचे नियोजनच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर असते. म्हणूनच याला सरकार जबाबदार आहे आणि आयुक्त दोषी आहेत.”

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी