33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयअबब ! मंत्री बाळासाहेब पाटील यांचा 'गाढव'छाप कारभार; राष्ट्रवादीच्या नेत्यानेच उघडे पाडले...

अबब ! मंत्री बाळासाहेब पाटील यांचा ‘गाढव’छाप कारभार; राष्ट्रवादीच्या नेत्यानेच उघडे पाडले पितळ

टीम लय भारी

पुणे :  सहकारमंत्री भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा नसावा, सहकार क्षेत्राला सक्षम करणारा व सहकारातील अपप्रवृत्तीला लगाम लावणारा असावा. जनतेचा विश्वास संपादन करणारा असावा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.

विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. मंत्री बाळासाहेब पाटील हे सुद्धा राष्ट्रवादीचेच आहेत. स्वःपक्षाच्याच मंत्र्यावर लवांडे यांनी दुगाण्या झाडल्यामुळे राजकीय जाणकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापूर्वी सुद्धा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि बाळासाहेब पाटील यांच्या कार्यपद्धतीची तुलना करून लवांडे यांनी पाटील यांना कानपिचक्या दिल्या होत्या.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील मंत्रीपदावर येवून तीन वर्षे होत आली. पण पाटील यांचा ‘गाढव’छाप कारभार सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. सह्याद्री साखर कारखान्याच्या पलिकडे पाटील यांना काम करण्याची इच्छाच नाही. केवळ ‘लक्ष्मी’दर्शनासाठीच ते आपल्या खात्याचा वापर करतात, अशी अत्यंत गलिच्छ प्रतिमा पाटील यांनी करून घेतली आहे.

स्वतःच्याच पक्षाचे नेते आपल्या विरोधात का शिमगा करतात याचीही फिकीर ते बाळगत नसल्याचे दिसत आहे. त्यांचे खासगी सचिव संतोष पाटील हे भाजपच्या गोटातील आहेत. याच संतोष पाटील यांनी अजित पवार यांच्यावर कारवाई केली होती. अजित पवारांना संकटात नेणारा अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी स्वतःच्या कार्यालयात का आणून ठेवला आहे, यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी संताप व्यक्त केला होता.

‘ज्याचे खावे त्याच्याच विरोधात कारस्थान करावे’ असे बाळासाहेब पाटील यांचे पारदर्शक धोरण असल्याचे दिसत आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचेही ते ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केला.  त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. खुद्द राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीच अशी मागणी केल्याने साहजिकच राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर लवांडे हे आपल्याच पक्षाच्या नेत्यावर तोफ डागतात, यात काहीही चूक नाही. बाळासाहेब पाटील यांनी स्वतःच्याच हाताने आपली ‘लायकी’ खालच्या पातळीवर नेऊन ठेवली आहे.

लवांडे यांच्याशी ‘लय भारी’ने संपर्क साधला. त्यावर लवांडे यांनी आपले ‘मन’ मोकळे केले. पाटील यांनी गेल्या अडीच वर्षांत सहकारात कुठलाही बदल केला नाही. सहकार क्षेत्राला सक्षम करणारे काम त्यांच्याकडून झाले नाही. उलट दिवसेंदिवस भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे, असे ते म्हणाले.

सहकारमंत्र्याच्या अशा कार्यपद्धतीमुळे पक्षाचे नाव बदनाम होत असून पर्यायाने शरद पवार आणि इतर नेत्यांवर यामुळे टीका होऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. आपण राष्ट्रवादी काॅंग्रेसचे असलो तरी सहकार क्षेत्राच्या हितासाठी ही मागणी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात लवांडे यांनी पाटील यांच्याविषयीचा वैयक्तिक अनुभव सांगितला आहे. माझ्या शिंदेवाडी (ता. हवेली) येथील दोन सोसायट्यांच्या विलीनीकरणासाठी मी राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांच्यासह पाटील यांना भेटलो होतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत दोन सोसायट्यांचे विलीनीकरण होणे आवश्यक होते. त्यास हवेलीचे पुणे शहर उपनिबंधक यांनी मान्यता दिली होती. मात्र भाजपच्या काही मंडळींनी या विरोधात स्थगिती मिळवली व आदेश रद्द केला. त्याविरुद्ध मी सहकार मंत्री पाटील यांच्याकडे रिव्हीजन अर्ज केला होता.

गेल्या सात ते आठ महिन्यांत स्थानिक राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी वारंवार पाठपुरावा करून सहकार्य करण्याची अपेक्षा केली होती. शरद पवार यांनी देखील बाळासाहेब पाटील यांच्याकडे याविषयी चौकशी केली होती. परंतु त्यांनी योग्य तो निर्णय अद्याप घेतला नसल्याने त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र मंत्री पाटील यांनी उफराटी कार्यवाही केली व सहनिबंधकांना सांगून आमच्या अपेक्षेविरुद्ध निर्णय दिला.

सहकारमंत्री अकार्यक्षम व स्वतःपुरते पाहणारे आहेत. बदल्यांबाबतही सेटिंग केली जाते. महाविकास आघाडीचे सरकार येऊन तीन वर्षे होत आली. परंतु सहकार खात्याकडून एकही नवीन योजना आली नाही. त्यांनी कोणतेही नवीन धोरण आखलेले नाही. सहकारमंत्री म्हणून पाटील राज्याला वेळ न देता केवळ सातारा, कराड येथे विकास कामे करत आहेत. त्याचा राज्याला व पक्षाला फायदा होत नाही, हे माझे निरीक्षण आहे, असेही लवांडे यांनी म्हटले आहे.

या साऱ्या परिस्थितीत सक्षम व कार्तव्यदक्ष सहकारमंत्री राज्याला हवा आहे. जो राज्याला वेळ देईल आपल्या पक्षसंघटनेला महत्व देईल. सहकारातील चुकीच्या व अपप्रवृलीला रोखेल. अन्यथा पक्षाची प्रतिमा मलीन होऊ शकते, असे लवांडे यांनी पत्रात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीतूनच नाराजी

Balasaheb Patil : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयाची वेसण भाजपच्या सुभाष देशमुखांकडे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी