फॅब्रिकेशन व्यवसायिकाकडून बारा लाखांची खंडणी उकळणाऱ्या तिघा आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. ४ मार्च रोजी बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे इरटीगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांना अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवुन अपहरण करून फिर्यादींचे दोन एटीएमचा वापर करून बळजबरीने ३०,०००/- रू.काढून घेतले, तसेच फिर्यादीला धमकावून त्यांचे पत्नीकडून बारा लाखांची रक्कम खंडणी उकळून फिर्यादी यांना दुसऱ्या दिवशी देवास, मध्यप्रदेश येथे सोडले होते, त्यावरून म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
यातीळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त, गुन्हेशाखा प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा डॉ. सिताराम कोल्हे, यांनी गुन्हेशाखा युनिट १ यांना वेळोवळी सुचना देवुन मार्गदर्शन केले होते. या गुन्हयाचा तपास करीत असतांना सपोनि हेमंत तोडकर , महेश साळुके, राहुल पालखेडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्हयातील अज्ञात आरोपी यांचे नाव निष्पन्न करून हा गुन्हा तुषार खैरणार, अजय प्रसाद, आदित्य सोनवणे व त्यांचे साथीदार यांनी केला असल्याचे निष्पन्न करून हि माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन त्यांना दोन पथक तयार करून आरोपी पकडण्याबाबत मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट क. १ कडील सपोनि हेमंत तोडकर यांचेसह पोहवा /महेश साळुंके, पो.ना मिलिंदसिंग परदेशी, पोअंम विलास चारोस्कर यांनी अंबड लिंक रोड, दत्तमंदिराजवळ राहणाऱ्या आदित्य एकनाथ सोनवणे वय-२४ वर्षे रा. म्हाडा कॉलनी, अंबड लिंकरोड, नाशिक, यास पकडले असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन यामाहा कंपनीची मोपेड मो.सा., अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, दोन सोन्याच्या कानातील रिंगा, रोख रक्कम रूपये २९,५००/-रु. असा एकुण १,५९,०००/-रूपये किमतीचा मुदद्देमाल हस्तगत केला. पोउनि रविंद्र बागुल यांच्या पथकाने आरोपी १) तुषार केवल खैरनार वय-२८ वर्षे, रा. रिध्दी सिध्दी अपार्ट, म्हसरूळ नाशिक, २) अजय सुजीत प्रसाद वय-२४ वर्षे रा. अंबड लिंकरोड, नाशिक याना म्हसरूळ लिंक रोड येथे सापळा लावुन पकडले, त्यांनी गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना ताब्यातुन शेवरलेट कंपनीची कुझ कार, व्हीयो कंपनीचा मोबाईल फोन, अॅपल कंपनीचा मोबाईल फोन, रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण ३,८७,०००/- रूपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्हयामध्ये आरोपीकडून एकुण ६,१६,०००/- रूपये किमतीचा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या आरोपीना पुढील कारवाई साठी म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.