31 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeक्राईमअवघ्या ४७ कर्मचाऱ्यांवर म्हसरूळ पोलिस ठाण्याची मदार

अवघ्या ४७ कर्मचाऱ्यांवर म्हसरूळ पोलिस ठाण्याची मदार

गेल्या काही दिवसांपासून म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul police station) हद्दीत घरफोडी, चैन स्नॅचिंग आणि वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण करताना येथील पोलीस अधिकाऱ्यांची मोठी कसरत होताना दिसत आहे. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात हद्दीचा विस्तार त्यात कर्मचाऱ्यांची कमतरता आणि असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविताना येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. एकंदरीत विचार केल्यास या पोलीस ठाण्याची भिस्त अवघ्या ४७ कर्मचाऱ्यांवर असल्याचे दिसत आहे. यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः लक्ष घालून याठिकाणी अधिकारी आणि विशेष करून पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.(Mhasrul police station raids only 47 personnel)

सन २०१६ साली पंचवटी पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन म्हसरूळ पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत, दिंडोरी रोड, म्हसरूळ गाव, आरटीओ कॉर्नर, गोरक्षनगर, म्हसरूळ-आडगाव लिंक रोड, मखमलाबाद गाव, आसाराम बापू पूल, गांधारी, शांतीनगर, उदयनगर, अश्वमेघ नगर, तवली फाटा, राऊ चौफुली, बोरगड, प्रभात नगर, म्हसोबा वाडी, पेठरोड वरील तवली वन उद्यान, वरवंडी रोड, आरोग्य विज्ञान विद्यापीठ असा जवळपास ८५ हजार लोकवस्ती असलेला आणि ४५.२९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला विस्तीर्ण परिसर असून यामध्ये तीन ते चार स्लम परिसर आणि ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

म्हसरूळ पोलीस ठाण्यासाठी कायम नेमणुकीसाठी दोन पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, १८ सहायक पोलीस उपनिरीक्षक, ३० पोलीस हवालदार, ३० पोलीस नाईक, ४३ पोलीस कॉन्स्टेबल असे एकूण १३३ पदे मंजूर करण्यात आले होते. मात्र,सध्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह एकूण ८६ कर्मचारी काम बघत आहे. त्यातही जवळपास २६ महिला कर्मचारी असल्याने त्यांच्याकडून काम करून घेताना अडचणीचे ठरत असल्याची चर्चा येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.

आकडेवारी नुसार ८६ अधिकारी आणि कर्मचारी कागदावर दिसत असले तरी यातील काही महिला कर्मचारी गरोदर असल्याने त्या सुट्टीवर गेलेल्या आहे. काही कर्मचारी आजारी असल्याने ते शिक रजेत असून काही कर्मचाऱ्यांची साप्ताहिक सुट्टी, किरकोळ रजा, अर्जित रजा, प्रतिनियुक्तीवर, दामिनी पथक, सुरक्षा गार्ड, निवडणूक कक्ष, फ्लाईंग स्कॉड यासह काही कोर्ससाठी तर काही तपास कामी बाहेर गावी असतात. त्यामुळे संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार मोजून ४७ कर्मचाऱ्यांवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्यातही महिला कर्मचाऱ्यांना रात्रपाळीचा ड्युटी देता येत नाही किंवा गुन्हेगारांना पकडण्यासाठी पाठविता येत नसल्यामुळे मनुष्यबळ हे कागदावर दिसत असले तरी काम करताना नसल्याच्या बरोबरीत असल्याने या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चैनस्नॅचिंग आणि वाहन चोरीच्या घटना वाढल्याचे बोलले जात आहे. यावर पोलीस आयुक्त काय तोडगा काढणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

म्हसरूळ पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ ४५ . २९ चौरस किलोमीटर असून २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ८५ हजार ३८० यामध्ये मंदिरे – ८५, मज्जीद – १, दर्गा – ५, पुतळे उघड्यावरील १ आणि बंदिस्त १, सरकारी कार्यालये – ७, दवाखाने २४, बँका ७, शाळा ८, कॉलेज ३, बाजार ३, व्यायामशाळा २०, वाचनालय ५, हत्यार परवाना धारक २५,पेट्रोल पंप ५, गॅस वितरक ४, छोटे कारखाने १, हॉटेल ३८, परमिट रूम ३, लॉजेस ३ आणि धर्मशाळा १ आहे. अधिकारी आणि कर्मचारी मनुष्य बळ एकूण १३३ मंजूर पदे आहे. त्यामध्ये पोलीस निरीक्षक २, सहायक पोलीस निरीक्षक ४, पोलीस उप निरीक्षक ६, सहायक पोलीस उपनिरीक्षक ४८ आणि पोलीस नाईक ३० आणि कॉन्स्टेबल ४३ अशी पदांची संख्या आहे. मात्र,सध्या या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक १, सहायक पोलीस निरीक्षक एकही नाही, उप निरीक्षक २, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक २, सहायक पोलीस उपनिरीक्षक २ आणि पोलीस हवालदार २७, पोलीस नाईक ५, कॉन्स्टेबल २१ आणि महिला कॉन्स्टेबल २६ असे ८६ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे मंजूर पदांपैकी ३५ अधिकारी आणि कर्मचारी कमी आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकसंख्या ८५ हजार ३८० इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात जर हि जनगणना आज मितीला केली तर हा आकडा जवळपास दीड लाखांच्या घरात जाण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसिंग करण्यासोबतच कागदोपत्री वर्क आणि कर्मचाऱ्यांचे असलेले अपूर्ण संख्याबळ याकडे देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंगच्या आणि घरफोडीच्या घटना कायमच घडत आहे. चैन स्नॅचिंगचा फटका तर केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांच्या आईला देखील बसला होता. सध्या म्हसरूळ परिसरात विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षा सुरु आहे. या परीक्षांमध्ये हायटेक कॉपी प्रकरणी गुन्हे दाखल होत आहे. मात्र, याबाबत येथील अधिकाऱ्यांना तपासाबाबत विचारल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगत वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हे कायम प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संख्याबळ वाढविणे गरजेचे आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी