30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeक्राईमभोंदूबाबा साठी बिबट्याची कातडी पडली महागात ! पाच अटकेत

भोंदूबाबा साठी बिबट्याची कातडी पडली महागात ! पाच अटकेत

इगतपुरीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोंदूबाबाला बसायला बिबट्याची कातडी (Leopard skin) हवी म्हणून आरोपींनी बिबट्याला पकडत त्याची हत्या केली. त्यानतंर त्याची कातडी सोलली. आरोपींच्या या कृत्याची खबर पोलिसांना लागली. पोलिसांनी सापळा रचत सिनेस्टाईल आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर दऱ्या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला आहे. ह्या ठिकाणांवर वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयित इसम अल्पावधीत पैसे कमवण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात. नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.(Leopard skin is expensive for bhondu baba ! Five arrested)

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित इसम वन्यप्राणी बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी आज सकाळी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, सापळा रचून संशयित आरोपांना अटक केली आहे.

पोलिसांनी नामदेव दामु पिंगळे (वय ३०, रा. पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी), संतोष सोमा जाखेरे (वय ४०, रा. मोगरे, ता. इगतपुरी), रविंद्र मंगळु आघाण (वय २७, रा. खैरगाव, ता. इगतपुरी), बहिरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी (वय ५०, रा. पिंपळगाव मोर, वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी), बाळु भगवान धोंडगे (वय ३०, रा. धोंडगेवाडी, ता. इगतपुरी) यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आरोपींच्या जवळील गोणपाटातून बिबट्याची कातडी आणि एक लोखंडी कोयता जप्त केला आहे. सदरची कातडी ही परिक्षणासाठी नाशिकच्या जिल्हा पशुवैद्यकिय सर्व चिकित्सालय पाठविली असता ती वन्यप्राणी बिबट्याची असल्याचा अभिप्राय प्राप्त झाला आहे. ह्या प्रकरणी पुढील तपास इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांचे पथक करीत आहे.

या प्रकरणी सखोल तपास केला असता महत्त्वाची माहिती समोर आली. आरोपी संतोष जाखेरे याचा साथीदार संन्यासी दिलीप बाबा याला बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती, असा जबाब आरोपीने दिलाय. त्यासाठी यातील आरोपी नामदेव दामु पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे. या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या पाणी पिण्याच्या डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लजवायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याला पकडून ठार मारले. यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्याची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवत ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील संशयीत आरोपी संन्यासी दिलीप बाबा याचा पोलीस पथक शोध घेत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार गोकावे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा संदिप नागपुरे, चेतन संवस्तरकर, मेघराज जाधव, हेमंत गरूड, पोना विनोद टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानप यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी