26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमनोरंजनउज्ज्वला गलांडे-पाटील मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स २०२३ मध्ये उपविजेत्या

उज्ज्वला गलांडे-पाटील मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स २०२३ मध्ये उपविजेत्या

माणसाने मनाशी ठरवले तर कोणत्याही वयात त्याला यशाचे शिखर गाठता येते. मुंबईत प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक म्हणून ख्याती मिळवलेल्या उज्ज्वला गलांडे-पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवरील मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स २०२३ मध्ये उपविजेत्या होत ही किमया केली आहे. मूळच्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कोडवलकरवाडी रहिवासी असलेल्या उज्ज्वला गलांडे-पाटील यांनी पतीच्या अकाली निधनानंतर पुरूषांचे वर्चस्व असलेल्या बांधकाम व्यवसायात नेकीने आपले पाय रोवले असून, ‘माणसाने सकारात्मक विचार करून वाटचाल केल्यास जगात काहीच अशक्य नाही,’ असेही त्यांनी ‘लय भारी’ शी बोलताना सांगितले.

नवी दिल्लीत आयटीसी या पंचतारांकित हॉटेलमध्ये तीन दिवस ही स्पर्धा आयोजित केली होती. बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर व अमान वर्मा यांच्या हस्ते त्यांना उपविजेत्या पदाचा मुकुट घातला गेला. दरवर्षी संपूर्ण भारतातून विवाहित महिलांसाठी ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये देशभरातून ३४ स्पर्धक सहभागी झाले होते. केनिया आणि स्विझर्लंडमधून काही स्पर्धक सहभागी झाले होते. उज्ज्वला गलांडे-पाटील या मुंबईमध्ये बांधकाम क्षेत्रात व्यावसायिक म्हणून गेल्या पंधरा पेक्षा जास्त वर्ष काम करत आहेत. जी. एन. कन्स्ट्रक्शन कंपनीचे मुंबईत विविध ठिकाणी कामे सुरू आहेत.

या स्पर्धेतील यशाबद्दल बोलताना उज्ज्वला गलांडे-पाटील म्हणाल्या की, माझ्या या खडतर प्रवासात दीपस्तंभासारखे पाठीशी असणारे माझे पती, मुले, सासू-सासरे, आई-वडील, भाऊ, वहिनी, मित्र, गुरु, नातेवाईक यांचा या यशात खूप मोलाचा वाटा आहे. उज्ज्वला गलांडे-पाटील यांचा जन्म मुंबईचा, सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्याचे वडील रघुनाथ कोडलकर बीपीटीमध्ये कामाला होते. आई सुनंदा या गृहिणी आहे. उज्ज्वला गलांडे-पाटील यांनी माटुंग्याच्या एसआयईएस महाविद्यालयातून बॉटनीतून बीएससी केले. नंतर त्यांचे गोविंद गलांडे-पाटील या सिव्हील इंजिनीयरशी लग्न झाले. गोविंद हे एमएमआरडीए, मुंबई महापालिकेची कामे घेत होते. 2005 च्या महापुरात त्यांची गाडी कलिना येथे पाण्यात अडकली. त्यातच त्यांचे निधन झाले.

पतीचा अकाली निधनानंतर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन लहान मुले, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, पतीचा व्यवसाय असे सगळे काही समोर असताना त्या खचल्या नाहीत. संकटात संधी शोधता येते हे त्यांनी मनाशी पक्के केले आणि कामाला लागल्या. पतीची कंपनी टेकओव्हर करत असताना मुलांचे संगोपन त्या करत राहिल्या. मुलेही आता मोठी झाली आहेत. शिवाय कन्स्ट्रक्शन कंपनी नावारुपाला आल्यामुळे आता त्यांना त्यांचे छंद जोपासता येत आहेत.
हे सुद्धा वाचा

ट्रॅव्हल्सला आग, महिलांची धावपळ; बाळासाहेब थोरातांच्या टीमने दुर्घटना टाळली
अंधश्रद्धेला मुठमाती देण्यासाठी दाभोळकरांचे विचार घराघरात पोहचविणार; वाचा काय आहे ‘अंनिस’चा संकल्प
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप: नीरज चोप्रासहित डी. पी. मनू, किशोर जैना यांचा अंतिम फेरीत प्रवेश

यातूनच त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. कॉलेजमध्ये असल्यापासून प्रेझेंटेबल राहणे मला आवडायचे. कॉलेजमध्येच अनेक छंदाला मुरड घालावी लागली. पण आता वयाच्या 40 शी नंतर काहीतरी नवीन करावे यासाठी या स्पर्धेत भाग घेतला, असे त्यांनी सांगितले. सामान्य कुटुंबातून असूनही तुम्ही कुठल्याही क्षेत्रात, कोणत्याही वयात स्वतःला सिद्ध करू शकता हे उज्ज्वला यांनी दाखवून दिले आहे. महिलांनी घराबाहेर पडून स्वतःसाठी जगायला शिकले पाहिजे. वेळ काढणे आवश्यक आहे. त्याने बौद्धिक व शारिरीक क्षमता सुधारण्यास मदत होईल. असेही त्यांनी सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी