वयाची साठी ओलांडल्यानंतर स्मृतिभ्रंश (डिमेंशिया) या आजाराचे निदान होणार्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. हा आजार होण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत आहेत. रुग्णांपेक्षा त्यांच्या नातेवाईकांना लक्षणे लक्षात येत असल्याने, त्यांनी वेळीच धोका ओळखत रुग्णावर उपचार सुरु करण्यास सहाय्यता केली पाहिजे. योग्य निगा राखत रुग्णाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन नारायणी हॉस्पिटल चे मेंदू व मणके विकार तज्ज्ञ डॉ. आनंद दिवाण यांनी केले.कॉलेज रोडवरील डिसूझा कॉलनी येथील सखी मंडळातर्फे आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. दिवाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मिना कुलकर्णी उपस्तित होत्या.
डॉ. दिवाण म्हणाले, नजीकच्या आठवणींचा विसर पडणे, एखादी वस्तु कुठे ठेवली याचे विस्मरण होणे, एखादा निरोप विसरणे अशा छोट्या छोट्या घटनांतून नातेवाईकांना या आजाराची पूर्वकल्पना येऊ शकते. रुग्णांना ही बाब लक्षात येईलच असे नसते. काही प्रमाणात स्मृतीभ्रंश हा आजार अनुवंशिकतेवर आधारलेला असून, चुकीची जीवनशैली यामुळेही या आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे वेळेवर जेवण करणे, सकस आहार घेणे, कुठलेही व्यसन टाळणे, नियमित व्यायाम करणे. यामध्ये शारीरीक व मानसिक व्यायामावर भर देणे. आपले आवडीचे छंद जोपासणे या बाबींतून संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या रुग्णांनी वेळीच औषधे घेतांना व डॉक्टरांच्या सल्याने नियमित तपासण्या करुन घेतांना हे आजार नियंत्रणात ठेवले पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
पुढे डॉ.दिवाण म्हणाले, स्मृतिभ्रंश या आजाराचे निदान करतांना पूर्वइतिहास जाणून घेतला जातो. तसेच निदानासाठी आवश्यकतेनुसार एमआरआय, रक्तचाचण्यांचे अहवाल आदींचा आधार घेतला जातो. आजाराच्या तीव्रतेनुसार औषधोपचार ठरविला जातो. रुग्णांना साधारणतः १ ते ३ वर्षांपर्यंत या औषधोपचाराचा फायदा होत असला तरी यानंतरच्या कालावधीत रुग्णांची काळजी घेणे, त्यांचे दैनंदिन काम सुरु राहातील, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले.