नाशिक शहरातील विविध चौक तसेच सिग्नलच्या ठिकाणी किंवा रस्त्याच्या डिव्हायडर मध्ये फुगेंसह इतर वस्तू विकणार्या गोरगरिबांना मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटवून त्यांना टाकळी भागात एका ठिकाणी राहण्यासाठी सांगितले होते, मात्र ज्या ठिकाणी ते राहत होते तो खाजगी प्लॉट असल्यामुळे व त्यांनी दुसरा बांधकाम केल्यामुळे त्या गोरगरिबांना तेथून त्यांना हाकलण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो गोरगरीब नागरिकांनी आज मनपा मुख्यालयावर धाव घेत घराची मागणी केली.
टाकळीरोड वरुन महापालिकेच्या वतीने त्यांना आडगाव येथील एका जागेत हलविण्यात आले होते, मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण, कचरा व गवत असल्यामुळे त्यांनी तेथे राहण्यास नकार देऊन आज (दि.15) थेट महापालिकेवर आपला मोर्चा आणला होता.
संध्याकाळी चार वाजेपासून त्यांनी सुमारे एक तास महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वार गोंधळ घालून आम्हाला हक्काची घरे द्या अशी मागणी केली. या नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह आंदोलन केल्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता तर वाहतूक कोंडी देखील झाली होती. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांसह पोलिसांनी त्यांना समजावून त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितले. दरम्यान महापालिकेच्या गोंधळी कारभारामुळे या हातावरच्या कामगारांना आंदोलन करण्याची वेळ आल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता.