28 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रHoney Trap : अडकला नगरमधील बीएसएफ जवान

Honey Trap : अडकला नगरमधील बीएसएफ जवान

टीम लय भारी

अहमदनगर : अहमदनगरमधील सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये (honey trap) अडकला. पंजाबमध्ये पाक सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी प्रकाश काळे याला अटक केली आहे.

अहमदनगर तालुक्यातील ससेवाडी येथील काळे बीएसएफमध्ये कार्यरत होता. २०१९ पासून तो पंजाबमध्ये नियुक्तीला आहे. फेसबुक आणि व्हॅटस्अ‍ॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिला एजंटाशी त्याचा संपर्क झाला. त्या महिलेने त्याला गोड बोलून जाळ्यात अडकविले. त्यानंतर काळे याने बीएसएफच्या काही जवानांचा व्हॅटसॅप ग्रुप तयार केला. त्या पाकिस्तानी महिला एजंटालाही ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे ग्रुपवर पोस्ट केली जाणारी माहिती तिला आपोआप कळत होती. कोणाच्या नियुक्त्या कोठे आहेत, काय हालचाली होणार आहेत, गस्त कोठे असणार आहे. याची माहिती जवान ग्रुपवर देत असत. ती त्या महिलेला मिळत होती. ऑगस्ट २०२० पासून हा प्रकार सुरू होता.

या हेरगिरीची माहिती समजल्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांनी काळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. माहितीत तथ्य आढळून आल्यानंतर चौकशीनंतर पंजाब पोलिसांच्या स्टेट ऑपरेशन सेलने काळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

त्याच्याकडून आणखी माहिती मिळविण्याचा पंजाब पोलिसांचा प्रयत्न आहे. लष्करी जवानांना सोशल मीडियाच्या वापरासंबंधी अलीकडेच बंधने घालण्यात आली आहेत. तरीही काही जवानांकडून याचा भंग होत असल्याने कळत न कळत ते अशा हनी ट्रॅपमध्ये अडकत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी