35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रLalit Patil Drugs Case | ललित पाटीलच्या संपत्तीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Lalit Patil Drugs Case | ललित पाटीलच्या संपत्तीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई

ललित पाटील ड्रग्स प्रकरणात (Lalit Patil Drugs Case) पुणे पोलीस (Pune Police) कसून तपास करत असून आता पोलिसांनी त्यांचा मोर्चा ललित पाटीलच्या (Lalit Patil) संपत्तीकडे वळवला आहे. पोलीस या प्रकरणात मोठी कारवाई करत ड्रग्स माफिया ललित पाटील याने ड्रग्सच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणात जमा केलेल्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करत आहेत. ललित पाटील याने ड्रग्सच्या व्यापरातून कोट्यवधी रुपयांची माया जमा केली असून त्याने स्वतः आणि मित्र आणि नातेवाईकांच्या नावे फ्लॅट्स, जमिनी, सोने आणि गाड्या अशा अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. पुणे पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात येत असून पुणे पोलिसांचे एक पथक नाशिकच्या दुय्यम निबंधक कार्यालयात तळ ठोकून आहे.

पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत ललित पाटीलच्या संपत्तीवर जप्तीला सुरुवात केली आहे. ललित पाटील याने ड्रग्सच्या धंद्यातून कोट्यवधींची संपत्ती जमवली आहे. त्याच्याकडे आठ किलो सोने सापडले असून त्यातील पाच किलो पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच, त्याला सोने विकणाऱ्या सराफालाही ताब्यात घेतले आहे. याशिवाय, ललित पाटीलने फ्लॅट्स आणि जमिनीमध्ये गुंतवणूक केली असून कुटुंबीय, मित्र, नातेवाईक आणि प्रेयसी यांच्या नावावर त्याने कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची खरेदी केली आहे. पोलिसांनी त्याच्या तीन गाड्या जप्त केल्या असून यात एका फॉरच्युनरचाही समावेश आहे.

काय आहे ललित पाटील प्रकरण?

पुणे पोलिसांनी एका ड्रग्स प्रकरणात ललित पाटीलला अटक केली होती. त्यानंतर, पुण्यातील येरवडा कारागृहात तो शिक्षाही भोगत होता. परंतु, कारागृहात असताना आजारी असल्याचे नाटक करत आणि त्यासाठी उपचार घेण्यासाठी तो तब्बल 9 महिने पुण्यातील ससून रुग्णालयात होता. त्यानंतर, पुणे पोलिसांनी ललित पाटीलशी संबंधित असलेल्या व्यक्तीस कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ससह अटक केली. हे प्रकरण उघडकीस आले असता ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला.


ललित पाटील फरार झाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत ललित पाटीलशी संबंधित अनेक लोकांना ताब्यात घेतले. यात, ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलचाही समावेश होता. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथून अटक करण्यात आली होती. अखेर फरार झाल्याच्या 15 दिवसांनंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक केली होती.

हे ही वाचा 

महाराष्ट्रात ‘ड्रग’निमिर्तीचे धंदे; हेच का राज्याचे उद्योगधोरण?

ललित पाटील प्रकरणाला मोठे वळण; गिरणा नदीपत्रात मिळाले 100 कोटींचे ड्रग्ज

आरोपी अविनाश भोसले तुरुंगात की राजेशाही रुग्णालयात?

ललित पाटीलच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या 15 साथीदारांना अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी तपासाच्या उद्देशाने ललित पाटीलला नाशिकमधील त्याच्या ड्रग्स फॅक्टरीत नेले होते. त्यानंतर, पोलिसांनी अधिक तपास केला असता नाशिकच्या गिरणा नदीपात्रात कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ससाठा सापडला होता. ललित पाटीलचा वाहनचालक सचिन वाघ याच्या चौकशीतून गिरणा नदीपात्रात ड्रग्ज फेकल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास सुमारे 15 फूट खोल नदीत 3 ते 4 तास ही शोधमोहीम चालली होती. या नदीपात्रातून तब्बल दोन गोण्या ड्रग्ज पोलिसांना मिळाले होते. 40 ते 50 किलोपर्यंत असलेल्या या ड्रग्जची किंमत अंदाजे 100 कोटी असल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणातून, दिवसेंदिवस नवीन माहिती बाहेर येत असून पोलिसांच्या धडक कारवाईचा परिणाम दिसत आहे. आता, पुणे पोलिसांनी त्यांचा मोर्चा ललित पाटीलच्या संपत्तीकडे वळवला असून त्याच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई चालू आहे. तसेच ललित पाटीलने आणखी कशात गुंतवणूक केली आहे, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी